उर्फी जावेदच्या अडचणीत होणार वाढ; चित्रा वाघ यांनी उचलले ‘हे’ पाऊल

मुंबई,१ जानेवारी  / प्रतिनिधी :-अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेदच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. भाजप प्रदेश महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा वाघ यांनी तिच्या पोशाखावर केलेल्या टीकेनंतर आता थेट मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी उर्फी जावेदवर मुंबई पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. चित्रा वाघ यांनी ट्विट करत याबाबत माहिती दिली. याआधीही चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदच्या अटकेची मागणी केली होती.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केलेल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मुंबईच्या रस्त्यांवर सार्वजनिक ठिकाणी बिभत्स व किळसवाणे अंगप्रदर्शन करत फिरणाऱ्या उर्फी जावेद वर तात्काळ कायदेशीर कारवाई करावी यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि सहआयुक्त कायदा व सुव्यवस्था यांची भेट घेतं मागणी केली.” सदर ट्विटमध्ये त्यांनी आयुक्तांसोबतचा फोटो आणि त्यांना दिलेल्या पत्राचाही फोटो शेअर केला आहे.

यापूर्वी चित्रा वाघ यांनी ट्विट करत उर्फी जावेदवर टीका केली होती. त्या म्हणाल्या होत्या की, “अरे..हे काय चाललंय मुंबईत? ही बाई सार्वजनिक ठिकाणी नंगटपणा करत आहे. तिला रोखण्यासाठी मुंबई पोलिसांकडे काही कलमे आहेत की नाही? उर्फी जावेदला तात्काळ बेड्या ठोकाव्यात. एकीकडे निष्पाप महिला/मुली विकृतांच्या शिकार होताहेत. तर ही बया अजून विकृती पसरवत आहे,”