रेशनिंग वाटपाचा रायगड पॅटर्न : रेशनकार्ड नसल्यास ‘ईझीफॉर्म्स’’

रेशनकार्ड नसलेला मजूर, कामगार उपाशीपोटी झोपू नये म्हणून शासन अहोरात्र प्रयत्न करीत आहे. काेरोनाच्या काळात रोजगार नसल्यामुळे बऱ्याच जणांवर उपासमारीची वेळ आली होती.  परंतु शासनाने कोणताही नागरिक उपाशी राहणार नाही, याची सर्वोतोपरी काळजी घेतली आहे, अजूनही घेत आहे. 

रेशनकार्ड नसलेल्या नागरिकांना धान्य देण्याबाबत शिवभोजन ॲप अथवा नवीन ॲप्लिकेशन तयार करण्याच्या सूचना शासनाने दिल्या होत्या.  यासाठी जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा पुरवठा विभागाचे जिल्हा पुरवठा अधिकारी मधुकर बोडके आणि सहाय्यक पुरवठा अधिकारी गोविंद वाकडे यांच्या पुढाकारातून व  पुणे येथील अभिनव आयटी सोल्यूशनच्या सहकार्याने “ईझीफॉर्मस्” हे मोबाईल ॲप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. 

या ॲप्लिकेशनमध्ये लाभार्थी व्यक्तीचे नाव, मोबाईल नंबर, आधारकार्ड व इतर माहिती भरुन घेतली जात आहे.  ही माहिती भरुन झाल्यानंतर त्वरित लाभार्थी व्यक्तीला धान्य दिले जात आहे.  “ईझीफॉर्मस्” हे ॲप्लिकेशन तयार केल्यानंतर ते शासनाकडे मंजूरीसाठी पाठविण्यात आले अन् त्याला शासनाने मंजूरी दिली.  या मोबाईल ॲप्लिकेशनची उपयुक्तता पाहून ते इतर जिल्ह्यातील वापरण्याचे निर्देश शासनाने दिले आहेत.

रेशनकार्डधारकांना जसे स्वस्त आणि मोफत धान्य वितरीत तर करण्यात येत आहेच, मात्र करोना काळात ज्याच्याकडे रेशनकार्ड नाही अशा मजूर, कामगार नागरिकांचीही जबाबदारी शासनाने घेतली असून त्यांच्यासाठी रेशन दुकानातून प्रत्येकी पाच किलो तांदूळ देण्याची योजना लागू केली आहे.

“ईझीफॉर्मस्” हे ॲप्लिकेशन जिल्ह्यातील सर्व रेशनिंग दुकानदार यांना देण्यात आले आहे.  जिल्ह्यातील 1 लाख 85 हजार मजूर, कामगार व्यक्तींना यांचा लाभ मिळणार असून दि.22 मे पासून या ॲपद्वारे 1  हजार 185 गरजू नागरिकांनी याचा लाभ घेतला आहे.  जिल्ह्यात रेशनकार्ड नसलेल्यांसाठी मे व जून या दोन महिन्यांकरिता 926 मे.टन धान्य आलेले आहे. या ॲप्लिकेशनद्वारे रेशन दुकानातून गरजूंना धान्य वितरीत केले जात असल्याने  त्यांची संभाव्य उपासमार टळली असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. याकरिता त्यांनी शासनाचे मन:पूर्वक आभार मानले आहे.  

हे ॲप्लिकेशन राज्यातील अन्य 18 जिल्ह्यातही कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यामुळे रायगड पोलिसांनी तयार केलेल्या ई-पास प्रणालीप्रमाणेच रायगड जिल्हा पुरवठा विभागाचे “ईझीफॉर्मस्” हे ॲप्लिकेशनही संपूर्ण राज्यासाठी मार्गदर्शक आणि उपयुक्त ठरले आहे.

मनोज शिवाजी सानप

जिल्हा माहिती अधिकारी

रायगड-अलिबाग

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *