राज्यातील अतिवृष्टीचा मोठा फटका:कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतला आढावा

मुंबई ,१९ ऑक्टोबर /प्रतिनिधी :- राज्यात गेल्या काही दिवसांपासून विविध भागात सुरु असलेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीबाबत कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी आज मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी आणि विविध कृषि विद्यापीठांच्या अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला. नुकसानीचे पंचनामे वेळेवर होतील यासाठी विविध यंत्रणा समन्वयाने काम करुन शेतकऱ्यांना दिलासा देतील, यादृष्टीने काम करण्याची सूचना त्यांनी केली.

यावेळी कृषि विभागाच्या सहसचिव सरिता बांदेकर, बी. एस. रासकर, महाराष्ट्र कृषि शिक्षण व संशोधन परिषदेचे संचालक श्री. भागडे, राज्याच्या चारही कृषि विद्यापीठांचे कुलसचिव उपस्थित होते.

मंत्री श्री. सत्तार यांनी यावेळी विभागनिहाय माहिती घेतली. मोसमी पाऊस परतीच्या मार्गावर असताना राज्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला. विशेषत: काही भागात सोयाबीन, कांदा यासह विविध पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. याठिकाणी तत्काळ पंचनामे शासकीय यंत्रणेच्यावतीने करावेत. सर्व पंचनामे वेळेवर करुन राज्यात किती नुकसान झाले, याची वस्तुनिष्ठ माहिती घेण्याची सूचना त्यांनी केली.

सिल्लोड येथे कृषि भवन आणि मका संशोधन केंद्र उभारणीच्या सूचना

राज्यातील कृषि आयुक्तालयातील तसेच महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला, बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली, वसंतराव नाईक मराठवाडा विद्यापीठ, परभणी यांच्या कार्यक्षेत्रातील विविध इमारतींच्या बांधकामाचा आढावा मंत्री श्री. सत्तार यांनी घेतला. औरंगाबाद शहरात वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या मालकीची जमीन आहे. याठिकाणी कृषि विद्यापीठाचे उपकेंद्र सुरु करता येईल का, त्यासंदर्भातील प्रस्ताव सादर करण्याची सूचना त्यांनी केली.सिल्लोड येथे कृषि भवन उभारणी तसेच मका संशोधन केंद्र सुरु करण्याबाबत आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.