आपत्कालीन परिस्थितीतही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरुच!

शालेय शिक्षण विभागातर्फे दिले जाते ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण

मुंबई, दि.९: कोरोना (COVID-१९) विषाणूच्या जगभरातील वाढत्या प्रादुर्भावामुळे देशात व संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. अशा आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यातील सर्व शाळा, महाविद्यालये बंद करण्यात आले. असे असले तरी,  संचारबंदीच्या कालावधीमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी आपत्कालीन परिस्थितीमध्येही विविध माध्यमांद्वारे विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरु असून त्यासाठी शालेय शिक्षण विभागातर्फे ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन दिली जाते आहे.

गुगल क्लासरुमच्या माध्यमातून विविध शाळांचे  शिक्षक व विद्यार्थी यांच्यामध्ये होणारे परस्परसंवादी शिक्षणाचे व्हीडिओ ऑफलाईन स्वरूपामध्ये देखील इतर विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देता येणार आहेत. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग या आपत्कालीन परिस्थितीमध्ये विविध माध्यमांद्वारे विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण विभागामार्फत देण्यात आली आहे.

मोबाईल, इंटरनेट नसणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शासनाचे दुर्लक्ष, लाखो विद्यार्थी शिक्षणापासून दूर; भाजपा शिक्षण आघाडीचा शासनावर आरोप”. राज्यातील सर्वच विद्यार्थ्यांकडे ऑनलाईन शिक्षण घेण्यासाठी मोबाईल, लॅपटॉप आहे, असे गृहीत धरून जिओ व गुगल क्लासरूमद्वारे शिक्षण देणाऱ्या शालेय शिक्षण विभागाचे ऑनलाईन सुविधा नसलेल्या राज्यातील लाखो विद्यार्थ्यांकडे दुर्लक्ष होत आहे. अशा आशयाचे वृत्त, प्रसिद्धी माध्यमातून प्रकाशित झाले आहे. हे वृत्त हे अर्धवट माहितीवर आधारित असून, वाचकांची दिशाभूल करणारे आहे. या विषयीचे स्पष्टीकरण करणारा विस्तृत खुलासा शालेय शिक्षण विभागाने केला आहे.

ऑफलाईन आणि ऑनलाईन शिक्षण

सध्याच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहामध्ये ठेवण्याच्या दृष्टीने शासनामार्फत विविध शिक्षण माध्यमांचा वापर केला जात आहे. DIKSHA App वरील ई- साहित्य इयत्तानिहाय व विषयनिहाय दररोज अभ्यासमालेच्या माध्यमातून पर्यवेक्षीय यंत्रणा तसेच शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपर्यंत पोहचविले जात आहे ज्याचा वापर जास्तीत जास्त विद्यार्थ्याच्या मार्फत ऑफलाईन स्वरूपात देखील केला जात आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना स्मार्टफोन किंवा इंटरनेट अभावी शिक्षण प्रक्रियेत सहभागी होता येत नसेल यासाठी टी. व्ही वरील सह्याद्री वाहिनीच्या माध्यमातून इयत्तानिहाय व विषयनिहाय शिक्षण विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून दिले जात आहे. यानुसार विद्यार्थ्यांच्या  शिक्षणामध्ये सातत्य राहण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही केली जात आहे.

घरपोच पाठ्यपुस्तकांचे वितरण

शिक्षण विभागामार्फत राज्यातील विद्यार्थ्यांना घरपोच पाठ्यपुस्तके वितरण करण्यात आलेले आहेत. या पाठ्यपुस्तकांच्या आधारे विद्यार्थी या काळामध्ये आपले शिक्षण सुरु ठेवत आहेत. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या व्हॉटसअप समूहाच्या माध्यमातून प्राप्त पाठ्यपुस्तकांचा उपयोग विद्यार्थ्यांच्या गृह शिक्षणासाठी होत असल्याचे दिसून येत आहे.

इयत्ता १ ली ते ८ वी साठी आनंददायी शिक्षण

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्यामार्फत अभ्यासमालेच्या माध्यमातून विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. याचबरोबर राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांचे मार्फत शैक्षणिक दिनदर्शिका विकसित करण्यात आलेली असून याच्या आधारे ‘दीक्षा अॅप’ च्या सहाय्याने विद्यार्थी ऑफलाईन स्वयंअभ्यास करू शकतात. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहचण्याच्या दृष्टीने दिनांक २० जुलै, २०२० पासून सह्याद्री वाहिनीवर एमकेसीएल फाउंडेशन व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र यांच्या मार्फत इयत्ता १ ली ते ८ वी साठी आनंददायी शिक्षण सुरु करण्यात आले आहे.

दुर्गम भाग व कोरोना प्रादुर्भाव कमी आहे किंवा नाही अशा ठिकाणी प्रत्यक्ष शिक्षण सुरु

याचबरोबर दुर्गम भाग व कोरोना प्रादुर्भाव कमी आहे अथवा नाही अश्या ठिकाणी शिक्षक स्वतः सोशल डिस्टन्सिंग (सामाजिक अंतराचे) चे नियम पाळून विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. ज्यामध्ये शिक्षक विद्यार्थ्यांच्या गृह भेटी देऊन आवश्यक गृह अध्यापन करून विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करीत असल्याचे आढळून येत आहे. तसेच काही शिक्षक शाळेमधील गावामध्ये लाउडस्पीकर च्या मदतीने देखील विद्यार्थी शिक्षण सुरु ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत.

गावामधील शिक्षणप्रेमी, सुशिक्षित ग्रामस्थ व तरुण हे गावामध्ये स्वयंसेवकाच्या भूमिकेतून गावामधील विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचा प्रयत्न करीत आहे यासाठी आवश्यक सर्व कार्यप्रणाली शिक्षकामार्फत तयार केली जात आहे. याचबरोबर शालेय व्यवस्थापन समिती व माता – पालक संघ यांच्या मदतीने देखील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या प्रवाहात ठेवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *