पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकासासाठी निधी उपलब्ध करणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई ,२४ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- परभणी जिल्ह्यातील पाथरी येथील साईबाबा तीर्थक्षेत्र विकासाचा 149 कोटींचा आराखडा मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील उच्चस्तरीय समितीसमोर सादर करण्यात येत आहे. या समितीच्या मान्यतेनंतर मुख्यमंत्री अध्यक्ष असलेल्या शिखर समितीसमोर हा आराखडा मान्यतेसाठी सादर करण्यात येईल. त्यानंतर आर्थिक तरतूद विचारात घेऊन चालू आर्थिक वर्षात पहिला हफ्ता दिला जाईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत याबाबतच्या प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

सदस्य अब्दुल्लाखान दुर्राणी यांनी यासंबंधीचा प्रश्न उपस्थित केला होता.

या प्रश्नाबाबत अधिक माहिती देताना श्री. देसाई म्हणाले, याबाबत 18 ऑगस्ट रोजी बैठक घेण्यात येणार होती. तथापि, अधिवेशन संपल्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत हा आराखडा मंजूर करून निधी उपलब्ध करून देण्यात येईल.

या विषयासंबंधी झालेल्या चर्चेत सदस्य सर्वश्री शशिकांत शिंदे, जयंत पाटील यांनी सहभाग घेतला.