राज्याचे पावसाळी अधिवेशन आजपासून:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना डिवचले

मुंबई ,१७ ऑगस्ट  /प्रतिनिधी :- राज्याचे विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरु होणार आहे. ते २५ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. यामध्ये तीन दिवसांच्या सुट्ट्या आहेत. त्यामुळे अधिवेशनाचे प्रत्यक्ष कामकाज हे सहा दिवसांचे असणार आहे. शुक्रवार १९ ऑगस्ट रोजी दहीहंडी सुट्टी आणि दिनांक २०, २१ ऑगस्ट या सार्वजनिक सुट्या आहेत. या दिवशी कामकाज होणार नाही. २४ ऑगस्ट रोजी विधिमंडळ कामकाजात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगीची झलक पाहायला मिळाली. आजच्या चहापानावर विरोधकांनी बहिष्कार टाकला.  आधीच्या निर्णय़ांना स्थगिती आणि ओल्या दुष्काळावरून विरोधक आक्रमक झाले आहेत. तर महाविकास आघाडी सरकारपेक्षा वेगानं निर्णय़ घेत असल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.

ओला दुष्काळ जाहीर करा, या मागणीवर विरोधक ठाम आहेत. हेक्टरी ७५ हजार रुपये मदत करा, अशी मागणी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली आहे. तर ओला दुष्काळ जाहीर करता येणार नाही, असं कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी म्हटलंय. त्यामुळे ओल्या दुष्काळ्च्या मुद्द्यावरुन अधिवेशनात संघर्ष पेटणार आहे. 

राज्यात गेल्या महिन्यात तुफान पाऊस पडला. विदर्भात गडचिरोलीत पूर आला. तेथील जनजीवन विस्कळीत झालं होतं. आम्हाला वातावरणाअभावी हेलिकॉप्टरने जायला जमलं नाही. तर आम्ही कारने तिथे पोहोचलो. कारण आमचं सरकार फिल्डवर जाऊन काम करणारे आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार पूर ओसरल्यावर तिथे पोहोचले हा फरक जनतेने लक्षात घ्यायला हवा, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अजितदादांना डिवचलं तसेच त्यांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिलं.

दुसरीकडे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्र्यांनी काही महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहे. यंदाच्या दहीहंडीत गोविंदांना १० लाखांचे विमाम कवच असणार आहे.  ७५ वर्षांवरच्या व्यक्तींना एसटी प्रवास मोफत करण्यात येणार आहे. त्याचबरोबरलता मंगेशकर संगीत अकादमीचं काम पूर्ण होत आलंय. ही संगीत अकादमी २८ सप्टेंबरला सुरू होईल, असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. 

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. राज्य सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्यात आला आहे. ऑगस्ट २०२२ पासून ही वाढ लागू होणार आहे.

राज्य विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सन २०२२

प्रस्तावित विधेयके व अध्यादेशप्रस्तावित विधेयके :- ९

सभागृहाच्या पटलावर ठेवावयाचे अध्यादेश :- ६

१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) अध्यादेश, २०२२.

२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) अध्यादेश, २०२२.

३) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) अध्यादेश, २०२२.

४) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) अध्यादेश, २०२२. 

५) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) अध्यादेश, २०२२.

६) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या ( दुसरी सुधारणा) अध्यादेश, २०२२.

प्रस्तावित विधेयके :- ९

१) महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (सुधारणा) विधेयक, २०२२.

२) महाराष्ट्र नगरपरिषदा, नगर पंचायती व औद्योगिक नगरी (सुधारणा) विधेयक, २०२२.

३) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, २०२२.

४) महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, २०२२.

५) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, २०२२.

६)  महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या (दुसरी सुधारणा) विधेयक, २०२२.

७) महाराष्ट्र वस्तु व सेवा कर (सुधारणा) विधेयक, २०२२.

८) महाराष्ट्र (द्वितीय पुरवणी) विनियोजन विधेयक, २०२२.

९) महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकार व विनियमन) (सुधारणा) विधेयक, २०२२ (बाजार समित्यांमध्ये  शेतकऱ्यांना जास्तीत जास्त प्रतिनिधीत्व देण्यासाठी समितीच्या कार्यक्षेत्रात राहणाऱ्या शेतकऱ्यांनी      बाजार समितीवर त्यांचे प्रतिनिधी निवडून देण्याबाबतची तरतूद करणेबाबत)