जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

तापोळा ता. महाबळेश्वर येथे ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्र्यांचा नागरी सत्कार

सातारा ,१२ ऑगस्ट  /प्रतिनिधी :-  ‘मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर अनेक जिल्ह्यांना भेटी दिल्या. यावेळी विविध मान्यवरांकडून माझा सत्कार करण्यात आला. पण, माझ्या जन्मभूमीत झालेला माझा सत्कार ही आनंदाची बाब असून जनतेच्या हिताचे निर्णय घेताना प्रेरणादायी ठरेल’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

तापोळा ता. महाबळेश्वर येथे तापोळा ग्रामस्थांच्या वतीने मुख्यमंत्री श्री. शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री  बोलत होते. याप्रसंगी खासदार श्रीकांत शिंदे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांच्यासह तापोळा गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासनाने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. अतिवृष्टीमुळे तीन  हेक्टरपर्यंत झालेल्या पिकांची नुकसान भरपाई दुपटीने देण्यात येणार आहे. राज्याचा सर्वांगीण  विकास करण्याचा प्रयत्न राहणार असून राज्यात मोठे उद्योग उभारण्यावर भर देण्यात येणार आहे. महाबळेश्वर-तापोळा रस्त्यासह पश्चिम महाराष्ट्र कोकणाला कसा जोडला जाईल, यासाठी दळणवळण यंत्रणा अधिक सक्षम केली जाईल, असेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दरे ग्रामस्थांना तिरंगा वितरण

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच आपल्या दरे ता. महाबळेश्वर या मूळगावी
आले असता येथील ग्रामस्थांशी संवाद साधला व हर घर तिरंगा उपक्रमामध्ये सहभागी होण्याचे आवाहन करुन दरे गावातील ग्रामस्थांना तिरंगा ध्वजाचे वितरण केले.

यावेळी ग्रामस्थांनी देखील आपल्या गावातील सामान्य शेतकरी कुटुंबातील व्यक्ती मुख्यमंत्री झाल्याबद्दल आनंद व्यक्त करुन मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी आमदार मकरंद पाटील, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, महाबळेश्र्वरच्या तहसीलदार सुषमा पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी व नागरिक उपस्थित होते.