नऊ तासांच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना अखेर अटक

मुंबई ,३१ जुलै /प्रतिनिधी :- शिवसेना खासदार संजय राऊत यांना अखेर ईडीने अटक केली आहे.पत्राचाळ पुनर्विकास प्रकरणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर नऊ तासांच्या चौकशीनंतर ईडीने ताब्यात घेतलं आणि त्यांना ईडी कार्यालयात घेऊन आले होते. दादर येथील गार्डन कोर्ट इमारतीतील फ्लॅटवर देखील ईडीचे सर्च ऑपरेशन सुरु आहे.

काही वेळातच ईडी कार्यालयात नेण्यात आले तिथे अटकेची कारवाई करण्यात आली. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने छापा मारला होता.खासदार संजय राऊत यांची गेल्या ९ तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु होती. पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती आहे. ईडीच्या सात अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितलेराऊतांच्या खोलीमधील कागदपत्रे आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जात आहेत. याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. या दरम्यान, ईडीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली.

संजय राऊत यांना आता सोमवारी सकाळी जे.जे रुग्णालयात तपासणीसाठी नेलं जाणार आहे. त्यानंतर त्यांना कोर्टात हजर केलं जाणार आहे. आज संजय राऊत यांच्या निवासस्थानी ईडीला 11 लाख 50 हजार रुपये मिळाल्याची देखील माहिती आहे. याआधी संजय राऊत यांना ED ने चौकशीसाठी तीन वेळा समन्स बजावला होता. मात्र ते हजर राहिले नव्हते. त्यानंतर रविवारी सकाळी ED अधिकारी थेट त्यांच्या घरी पोहोचले होते. दुपारी ताब्यात घेतल्यानंतर जवळपास 9 तासानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.

ईडीकडून केले गेलेले आरोप खोटे असल्याचं सुनिल राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही घाबरणार नाही. भाजप संजय राऊत यांना घाबरली आहे असा आरोप देखील त्यांनी केला आहे.

दुसरीकडे संजय राऊत यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम 504, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. स्वप्ना पाटकर यांनी आज वाकोला पोलीस ठाण्यात जावाब नोंदवला. त्यानंतर पोलिसांनी हा एफआयआर दाखल केला. स्वप्ना पाटकर यांनी जीवे मारण्याची धमकी दिली होती अशा प्रकारची लेखी तक्रार पोलिसांना दिली होती.