मंदिरात अन्य धर्मियांना प्रतिबंध करता येणार नाही- मद्रास हायकोर्ट

चेन्नई : अन्य धर्मातील व्यक्तींना हिंदू मंदिरात प्रवेशावर प्रतिबंध घालण्याची मागणी करणारी जनहित याचिका मद्रास उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. न्या. पी. एन. प्रकाश आणि न्या. हेमलता यांच्या खंडपीठाने हिंदू देवांवर श्रद्धा असणाऱ्या अन्य धर्मियांना मंदिरात येण्यापासून रोखता येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

याचिकाकर्ते सी. सोमण यांनी मद्रास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करून तिरुवत्तर येथील अरुलमिघु आदिकेसव पेरुमल तिरुकोविल येथे कुंबाबीशेगम उत्सवात बिगर हिंदूंना सहभागी होण्यास परवानगी देऊ नये, असे निर्देश देण्याची विनंती केली होती.

कुंबाबीशेगम उत्सवाच्या आयोजनासाठी प्रसिद्ध केलेल्या निमंत्रण पत्रिकेत एका मंत्र्याच्या नावाचा उल्लेख आहे. ते मंत्री ख्रिश्चन असून हाच धागा पकडून इतर धर्मियांना प्रवेश प्रतिबंधित करण्याची मागणी करणारी याचिका दाखल करण्यात आली होती.

मद्रास उच्च न्यायालयाने निर्णय देताना महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदवले. न्यायालयाने म्हटले की, जन्माने ख्रिश्चन असलेल्या डॉ. के. जे. येसुदास यांनी गायलेली भक्तिगीते विविध हिंदू मंदिरांमध्ये वाजवली जातात. नागौर दर्गा आणि वेलंकन्नी चर्चमध्ये कुणाच्याही हस्तक्षेपाशिवाय मोठ्या संख्येने हिंदू भक्त नियमितपणे भेट देतात. शिवाय मोठ्या धार्मिक उत्सवात प्रत्येक व्यक्तीची धार्मिक ओळख तपासणे आणि नंतर त्याला मंदिरात प्रवेश देणे अधिकाऱ्यांना अशक्य आहे, असेही न्यायालयाने म्हटले आहे.

अन्य धर्मातील व्यक्ती विशिष्ट हिंदू देवतेवर विश्वास ठेवत असेल, तर त्याला रोखले जाऊ शकत नाही किंवा मंदिरात प्रवेश करण्यास प्रतिबंध केला जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले आहे.