राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक – सुधीर मुनगंटीवार

मुंबई,२८ एप्रिल  /प्रतिनिधी :-भाजप-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थापन करण्याची चर्चा २०१७ मध्ये  झाली होती; असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार यांनी केला होता. शेलार यांच्या वक्तव्याला मुनगंटीवार यांनी देखील दुजोरा दिला आहे. २०१७ मध्ये  शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत युती केली नाही ही आमची चूक झाली. त्याचे प्रायश्चित्त भोगतोय, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

मुनगंटीवार यांनी म्हटले की, २०१४ मध्ये आमच्यासोबत राष्ट्रवादीचा अदृश्य हात होता. तरी आम्ही शिवसेनेला सोबत घेऊन सरकार बनवले. राष्ट्रवादीला सोबत घेऊन सरकार बनवण्यावर चर्चा देखील झाली. पण शिवसेनेला सोडून राष्ट्रवादीसोबत सरकार बनवावे असे आमचे मत नव्हते. त्यामुळे आशिष शेलार जे म्हणाले त्यात तथ्य आहे

जीएसटी संदर्भात बोलताना मुनगंटीवार म्हणाले की, महाराष्ट्राचा पेट्रोल डिझेल वरचा कर हा केंद्रापेक्षा जास्त आहे. पण खोटे काय बोलत आहेत की आमचा जीएसटी दिला नाही. जीएसटी हा डायरेक्ट राज्याच्या अकाउंटमध्ये जातो. हा जो न दिलेला जीएसटी आहे, तो राज्यांना १४ टक्के वाढीव दिला जाणारा परतावा आहे, जो कोरोना काळात सगळ्याच राज्यांचा गेला, आम्ही सर्वात जास्त टॅक्स भरतो हे जे सांगता म्हणजे तुम्ही कर भरता का? मुंबईत सर्वच मोठ्या कंपनीचे ऑफिस आहे म्हणून आयटी रिटर्न मुंबईतून भरले जाते. पण मनात येईल ते बोलायचे, केंद्राविरुद्ध भावना भडकवायच्या, देशात आणि मुंबईत फरक करायचा, तुम्ही म्हणजे मुंबई नाही, मागच्या निवडणुकीत भाजपला शिवसेनेपेक्षा जास्त मते मिळाली आहेत, मग मुंबई आमची आहे असे आम्ही पण म्हणू शकतो, असेही मुनगंटीवार म्हणाले.