अक्षय्य तृतीयेला मनसेची महाआरती

विविध विषयांवर झाली मनसेच्या बैठकीत चर्चा

मुंबई ,१९ एप्रिल /प्रतिनिधी :- मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या दोन सभा झाल्यानंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. मशिदींवरील भोंग्यासंबंधी ३ मे पर्यंत अल्टिमेटम दिल्यानंतर आता त्यांनी ५ जून रोजी अयोध्या दौऱ्यावर जाणार असल्याचे जाहीर केले आहे. यापार्श्वभूमीवर आज मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत अयोध्या दौरा, भोंगा वाद, राज ठाकरेंची सुरक्षा ते अक्षय्य तृतीयेला महाआरती या महत्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बैठक पार पडल्यानंतर मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी पत्रकारांशी संवाद साधत याबाबत माहिती दिली.

राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असे म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी मनसेला दिला होता. यानंतर राज ठाकरेंच्या सुरक्षेबाबत गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पत्र लिहलेय, असे नांदगावकर म्हणाले. त्यामुळे मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता आहे.

May be an image of 1 person and text that says "जय श्रीराम 一与團 三0天不 चला अयोध्या! महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष मा. श्री. राजसाहेब ठाकरे यांचा अयोध्या दौरा. # ऐतिहासिक दिवस दि. MNS Adhikrut २०२२"

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास सुरुवात केली असून अयोध्या दौऱ्यासाठी जोरदार तयारी करण्याचे आदेश राज ठाकरेंनी मनसे पदाधिकाऱ्यांना आजच्या बैठकीत दिले आहेत. तसेच अयोध्या दौऱ्यासाठी मनसे १० ते १२ रेल्वे आरक्षित करणार, विशेष रेल्वेसाठी रेल्वेमंत्री रावसाहेब दानवेंना पत्र लिहल्याची माहिती बाळा नांदगावकरांनी दिली आहे. शिवतीर्थ वरील मनसे पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत ‘जय श्रीराम’ चा नारा देखील देण्यात आल्याचे समजते. तसेच अक्षय्य तृतीयेला राज्यभरात महाआरती करण्याचे आदेशही राज ठाकरेंनी यावेळी मनसे पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.

“धार्मिक स्थळांवरील भोंग्यांबाबत आज वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे. त्यांनी अहवाल दिल्यानंतर मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. आयबी आणि रॉ यांच्याशीही बातचीत करु. त्यानंतर अंतिम निर्णय घेतला जाईल. निर्णय घेताना परिणामही तपासले पाहिजेत,” अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. “परंतु हा निर्णय कधी होणार, ३ तारखेच्या आधी होणार की ३ तारखेच्या नंतर होणार ते मी आज सांगू शकत नाही,” असंही ते म्हणाले. यावर भोंग्याबाबत सरकारने योग्य निर्णय घ्यावा असे आवाहन राज ठाकरेंनी केले असल्याचे बाळा नांदगावकर यावेळी म्हणाले.