पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी दिल्या ‘लोककलांच्या माध्यमातून जागर’ मोहिमेस शुभेच्छा

बीड,१२ मार्च / प्रतिनिधी :-  सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित लोककलांच्या माध्यमातून जागर जनजागृती मोहिमेअंतर्गत कार्यक्रमास बीड येथे भेट दिली. यावेळी त्यांनी या मोहिमेस शुभेच्छा दिल्या. त्यांच्या समवेत आमदार संदीप क्षीरसागर, आमदार संजय दौंड, जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अजित पवार आदी मान्यवर उपस्थित  होते.

पालकमंत्री धनंजय मुंडे जिल्हाधिकारी कार्यालय येथे एका कार्यक्रमासाठी आले होते. त्यावेळी तांबवेश्वर कलापथकाच्या कलाकारांनी लोककलांच्या माध्यमातून जागर मोहिमेतून गेल्या दोन वर्षात राज्य शासनाने घेतलेले निर्णय व योजनांचे शाहिरी कलेतून सादरीकरण केले. ‘दोन वर्षपूर्ती आघाडी सरकारची, केली पूर्तता दिलेल्या वचनाची’, हे गीत यावेळी शाहीर तुकाराम ठोंबरे व अन्य कलाकारांनी सादर केले. पालकमंत्री धनंजय मुंडे यांना जिल्हा माहिती अधिकारी संप्रदा बीडकर यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या या मोहिमेविषयी व बीड जिल्ह्यातील विविध ठिकाणी कलापथकाच्या माध्यमातून होणाऱ्या कार्यक्रमांची माहिती दिली. या मोहिमेंतर्गत शासनमान्य यादीवरील 3 कला पथकांच्या माध्यमातून जिल्ह्यातील 11 तालुक्यांतील तालुका गावे व दुर्गम ठिकाणी एकूण 63 कार्यक्रम नियोजित आहेत. त्यापैकी आजअखेर जवळपास 40 कार्यक्रम संपन्न झाल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. माहिती अधिकारी किरण वाघ यांनी आभार मानले.

दरम्यान, जिल्हाधिकारी कार्यालयातील कार्यक्रमानंतर जिल्हाधिकारी राधाबिनोद शर्मा यांनी स्वतंत्ररीत्या या कार्यक्रमास भेट दिली. तसेच, सहाय्यक आयुक्त, समाजकल्याण सचिन मडावी, कोषागार अधिकारी श्री. घोळवे यांनीही तांबवेश्वर कलापथकाच्या सादरीकरणाला भेट देऊन पुढील कार्यक्रमांसाठी शुभेच्छा दिल्या.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाला दोन वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्रिमहोदयांच्या तसेच सामाजिक न्याय विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या विभागातर्फे दोन वर्षात राबविलेल्या विविध योजना आणि लोककल्याणार्थ घेतलेल्या निवडक निर्णयांबाबत या मोहिमेतून जिल्ह्यात जनजागृती करण्यात येत आहे. मोहिमेत शाहिरीकला, वासुदेव, पोतराज आदि कलाप्रकारांच्या माध्यमातून शाहीर, गायक व कलाकार योजना व विकासाच्या वाटचालीची माहिती देत आहेत. 15 मार्चपर्यंत ही मोहीम सुरू राहणार आहे.

दरम्यान “लोककलांच्या माध्यमातून जागर” जनजागृती मोहिमेंतर्गत जिल्ह्यात दि. 12 मार्च रोजी एकूण 12 कार्यक्रम सादर करण्यात आले. शिरूर कासार, किल्ले धारूर, अंबाजोगाई आणि बीड तालुक्यात तीन कलापथकांनी कार्यक्रमांचे सादरीकरण केले.

जयभवानी प्रतिष्ठान कलापथकाने आज सकाळच्या सत्रात धारूर तालुक्यातील भोपा व किल्ले धारूर, सायंकाळच्या सत्रात अंबाजोगाई येथे येथे कार्यक्रम सादर केले. समता कलापथकाने शिरूर कासार तालुक्यात सकाळच्या सत्रात हिवरसिंगा, शिरूर कासार येथे आणि सायंकाळच्या सत्रात गोमलवाडा येथे कार्यक्रम सादर केले. तांबवेश्वर कला पथकाने बीड तालुक्यात सकाळच्या सत्रात मांजरसुंबा, दुपारच्या सत्रात बीड, सायंकाळच्या सत्रात नेकनूर येथे कार्यक्रम सादर केले.