प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे यांना ‘पद्मविभूषण’ तर प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’

महाराष्ट्राला १० पद्म पुरस्कार; महाराष्ट्र ठरला एक पद्मविभूषण तर दोन पद्मभूषणचा मानकरी    

नवी दिल्ली,२५ जानेवारी / प्रतिनिधी :-  देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारांची आज घोषणा करण्यात आली. प्रतिभावंत गायिका प्रभा अत्रे यांना ‘पद्मविभूषण’ तर  प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला.आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना मरणोत्तर ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाला असून त्यांच्यासह राज्यातील अन्य सहा मान्यवरांना ‘पद्मश्री पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.

केंद्रीय गृहमंत्रालयाच्यावतीने दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्व संध्येला देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात येते. गृह मंत्रालयाकडून आज या मानाच्या पद्मपुरस्कारांची घोषणा करण्यात आली. यावर्षी एकूण ४ मान्यवरांना ‘पद्मविभूषण पुरस्कार’ जाहीर झाले असून महाराष्ट्रातून प्रतिभावंत गायिका,संगित रचनाकार,लेखिका,प्राध्यापिका आणि विदुषी प्रभा अत्रे  यांना कला  क्षेत्रातील उल्लेखनीय  योगदानासाठी हा मानाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच,  प्रसिध्द उद्योजक नटराजन चंद्रशेखरन आणि सायरस पुनावाला यांना उद्योग व व्यापार क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाला आहे. देशातील एकूण १७ मान्यवरांना ‘पद्मभूषण पुरस्कार’ जाहीर झाले आहेत.काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांना पद्म भूषण पुरस्काराने सन्मानित केलं जाणार आहे. 

सात मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार

प्रसिध्द आयुर्वेदाचार्य डॉ. बालाजी तांबे यांना वैद्यकीय क्षेत्रातील बहुमूल्य योगदानासाठी मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यासोबतच डॉ. भिमसेन सिंघल, डॉ. विजयकुमार डोंगरे आणि डॉ. हिंमतराव बावस्कर यांना वैद्यकीय क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी  पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कला क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानासाठी ज्येष्ठ लावणी गायिका व पार्श्वगीत गायिका सुलोचना चव्हाण आणि प्रसिध्द पार्श्व गायक सोनू निगम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. विज्ञान व अभियांत्रिकी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी  अनिलकुमार राजवंशी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

यावर्षी  एकूण १२८ पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत. यामध्ये ४ ‘पद्मविभूषण’, १७ ‘पद्मभूषण’ आणि १०७ ‘पद्मश्री’ पुरस्कारांचा समावेश आहे. पुरस्कार घोषित झालेल्या मान्यवरांमध्ये ३४ महिलांचा समावेश आहे. १० अप्रवासी भारतीयांना हे मानाचे पुरस्कार जाहीर झाले असून १३ मान्यवरांना मरणोत्तर पद्म पुरस्कार जाहीर झाले आहेत .

उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. तर हेलिकॉप्टर अपघातात निधन झालेले देशाचे पहिले सीडीओ जनरल बिपिन रावत आणि राधेश्याम खेमका या तिघांनाही मरणोत्तर पद्मविभूषण जाहीर झाले आहे.  एकूण १२८ जणांना पुरस्कार जाहीर झाले आहेत. 

महाराष्ट्रासाठी जाहीर झाले पद्म पुरस्कार

पद्मविभूषण

कला – प्रभा अत्रे

पद्मभूषण

उद्योग – नटरंजन चंद्रशेखरन

आरोग्य – सायरस पुनवाला

पद्मश्री

आरोग्य – हिंमतराव बावस्कर

आरोग्य – विजयकुमार विनायक डोंगरे

कला – सुलोचना चव्हाण

कला – सोनू निगम

विज्ञान आणि इंजिनियरिंग – अनिलकुमार राजवंशी

आरोग्य – भीमसेन सिंघल

आरोग्य – बालाजी तांबे (मरणोत्तर)