नांदेड बंदला गालबोट,तणावाचे वातावरण

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांचे शांततेचे आवाहन

नांदेड,१२ नोव्हेंबर /प्रतिनिधी:- त्रिपुरा राज्यात मुस्लीम समाजावर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आयोजित मोर्चाला राज्यात काही ठिकाणी हिंसक वळण लागले आहे.

नांदेड मध्ये पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. काही ठिकाणी दगडफेकीच्या घटना घडल्या. मुस्लीम संघटनांनी बंदचे आवाहन केलं होतं. दुपारी अडीचच्या सुमारास शिवाजीनगर भागात काही तरुणांनी सुरू असलेल्या दुकानांवर दगडफेक केली. 

नांदेडमध्ये 5 ते 6 दुकानांचे यात नुकसान झालं आहे. या भागातून जाणाऱ्या एका इनोव्हा गाडीवर तुफान दगडफेक करण्यात आली. भाग्यनगर आणि देगलूर नाका भागात तुफान दगडफेक झाली. नांदेडमध्ये 5 ते 6 गाड्यांवर दगडफेक झाली, एक दुचाकीही जाळण्यात आली.  अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे आणि पोलीस निरीक्षक साहेबराव नरवाडे जखमी झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडाव्या लागल्या. 

त्रिपुरा इथे घडलेल्या कथित घटनेच्या निषेध व्यक्त करण्यासाठी मुस्लिम समाजाकडून शुक्रवारी बंद पुकारण्यात आला होता. तसंच निषेध मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जमावाकडून शिवाजीनगर परिसरातील मुख्य रस्त्यावर अचानक दगडफेक सुरु करण्यात आली. या दगडफेकीत अनेक चारचाकी गाड्या, दुचाकीचे  नुकसान करण्यात आले . तसंच परिसरातील दुकानांवरही मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. दुकानातील काचा फोडून वस्तूंचे मोठे  नुकसान झाले.

नांदेडमध्ये मुस्लिम बांधवांनी काढलेल्या मोर्चाला गालबोट लागले  आहे. जमावाकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक, तोडफोड आणि काही भागात जाळपोळ करण्यात आलीय. नांदेडमध्ये दुपारी जमावाने देगलूर नाका, शिवाजीनगर, कलामंदिर, पावडेवाडी नाक्यासह अनेक भागात दगडफेक केली. त्यात अनेक वाहनं, दुकानांचं मोठं नुकसान झाले  आहे. दरम्यान, पोलिसांकडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

अशोक चव्हाण यांचे शांततेचे आवाहन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मल्हार पुलाच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने ६ कोटी निधीस मान्यता – सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण

मुंबई,१२ नोव्हेंबर/प्रतिनिधी:- त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात महाराष्ट्रात काही ठिकाणी तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले आहे.

याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना श्री. चव्हाण म्हणाले की, त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात काही ठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले आहेत. निषेध नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचे आहे. या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांततेचे पालन करावे, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.