राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू होणार

मुलांना शाळेत पाठवण्यासाठी पालकांची संमती असणे महत्त्वाचे आहे
शाळांमध्ये कुठल्याही खेळांना परवानगी नसणार

मुंबई, २४ सप्टेंबर /प्रतिनिधी :-महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण, राज्यातील शाळा अखेर सुरू  करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार आता येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्यातील शाळा सुरू होणार आहेत. शिक्षण विभागाने शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव पाठवला  होता. या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांची मान्यता मिळाली आहे.

राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी पत्रकार परिषद घेत शाळा सुरू करण्याच्या संदर्भात सविस्तर माहिती दिली आहे. ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग तर शहरी भागात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत.

अ) प्रत्येक शाळेमध्ये हेल्थ क्लिनिक सुरु करणे :

• शक्य असल्यास क्लिनिक सुरु करावे.

• विद्यार्थ्यांचे नियमितपणे टेम्परेचर तपासावे.

•शक्य असल्यास यासाठी इच्छूक डॉक्टर पालकांची मदत घेण्यात यावी.

• सर्व शाळा आरोग्य केंद्राशी संलग्न कराव्यात.

• हेल्थ क्लिनिकमध्ये स्थानिक आरोग्य केंद्रामधील डॉक्टर व परीचारीकांची मदत घ्यावी.

उपरोक्त कामासाठी CSR किंवा स्थानिक निधीतून खर्च करण्यात यावा.

ब) शाळेत येताना घ्यावयाची काळजी :

• मुलांना शाळेत पायी येण्यासाठी शिक्षकांनी प्रोत्साहित करावे.

ज्या शाळांमध्ये स्कूलबस / खाजगी वाहनाद्वारे विद्यार्थी येतात, अशा वाहनांमध्ये एका सिटवर एकच विद्यार्थी बसून प्रवास करेल याची दक्षता घेण्यात यावी. विद्यार्थी बसमध्ये चढताना व उतरताना विद्यार्थ्यांच्यासुरक्षिततेसाठी वाहन चालक / वाहक यांनी विद्यार्थ्यांना सॅनिटायझरचा वापर करण्यास प्रोत्साहित करावे.

क) शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी नवीन मार्गदर्शक सूचना:

• जेवण व इतर बाबी केल्यानंतर साबण किंवा सॅनिटायझरने हात धुण्याबाबत

विद्यार्थ्यांना सतत सूचना दयाव्यात.

• विद्यार्थ्यांनी गृहपाठ ऑनलाईन पध्दतीने सादर करण्याबाबत निर्देश दयावेत,

जेणेकरुन विद्यार्थ्यांमध्ये पुस्तकांची अदलाबदल होणार नाही.

• वेळ असल्यास गृहपाठ शक्यतो वर्गांमध्येच करुन घ्यावा.

ड)खेळाच्या मैदानाबाबत मार्गदर्शन:

• सद्य:स्थितीत कोणत्याही प्रकारचे खेळ घेण्यात येवू नयेत.

• कोरोना विषयक परिस्थिती सर्वसामान्य झाल्यानंतर काही खेळ घेण्यास हरकत

नाही. तथापि असे खेळ घेत असताना खालीलप्रमाणे काळजी घेण्यात यावी.

• खेळाचे साहित्य नियमित सॅनिटाईज करावे.

• खेळ खेळणाऱ्या विद्यार्थ्यांकडे शिक्षकांनी लक्ष दयावे, विशेषतः थकलेल्या व

दमलेल्या विद्यार्थ्याकडे लक्ष असावे.

• विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मास्क असावा व त्यांच्यामध्ये २ मीटरचे अंतर असावे.

• जवळचे संबंध येणारे खेळ जसे, खो-खो, कबड्डी इत्यादी टाळावे. क्रिकेट, शारीरिक

शिक्षण अशाप्रकारचे खेळ/ कार्य करण्यास हरकत नाही.

इ) आजारी विद्यार्थी शोधणे :

• ताप, सर्दी, जोरात श्वासोच्छवास करणारे, शरीरावर ओरखडे, डोळे लाल झालेले,ओठ फुटलेले व लाल झालेले, बोटे, हात आणि सांधे सुजलेले,

उलटया – जुलाब व पोटदुखी असलेले विद्यार्थी वर्गात असल्याचे लक्षात  आल्यानंतर

त्यांना डॉक्टरकडे नेण्याची व्यवस्था करावी व डॉक्टरांच्या सल्ल्याने विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावे.

फ) विद्यार्थ्यांवरील मनोसामाजिक परिणामांबाबत शिक्षकांना अवगत करणे-

खालील लक्षणे दर्शविणाऱ्या विद्यार्थ्यांची शिक्षकांनी विशेष काळजी घ्यावी.

• जास्त चिडचिड करणारे, रागीट व छोटयाशा गोष्टीने निराश होणारे,

• वर्गात नेहमी शांत बसणारे व कोणत्याही गोष्टीत स्वारस्य न दाखविणारे,

• वयाशी विसंगत वर्तणूक दर्शविणारे उदा. अंगठा चोखणे इ.,

•खाण्याच्या व झोपण्याच्या सवयीत बदल दर्शविणारे,

• शालेय शिक्षणात असामान्य घट दर्शविणारे,

• असहाय्य झालेले व सतत रडणारे विद्यार्थी.

• अशी लक्षणे असणाऱ्या विद्यार्थ्यांची विशेष काळजी घ्यावी व त्याच्याशी संवाद

साधावा.

ग) विद्यार्थ्यांच्या मनोसामाजिक स्वास्थ्याबाबत शिक्षकांना मार्गदर्शन :

• पहिल्या १ ते २ आठवडयामध्ये थेट शिक्षणावर भर न देता विद्यार्थ्यांस शाळेची सवय होवू दयावी.

• प्रत्येक विद्यार्थ्याची पार्श्वभूमी अवगत करुन त्यानुसार विद्यार्थ्यांशी परस्पर संवाद

साधावा.

• कोविड होवून गेलेल्या विद्यार्थ्यांशी सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणे वागावे,

• विद्यार्थी व पालकांशी ऑनलाईन / ऑफलाईन पध्दतीने संपर्कात राहणे.

ह) शिक्षक-पालक बैठकीत चर्चा :

कोविड आजाराबाबत माहिती व सदर आजार टाळण्याबाबत माहिती देणे, • पालकांच्या प्रश्नांना योग्य संवादाने उत्तर दयावे, पालकांनी पुरेसे

मास्क तयार करणे व सदर मास्क दररोज धुणे,

मुलांना मोबाईलची सवय लागू नये अशा पध्दतीने पालकांनी लक्ष ठेवण्याबाबत

पालकांना मार्गदर्शन करणे.

• लवकर उठून शाळेच्या वेळेत मुलांना तयार करणे,

• मुलांना कमीत कमी पुस्तके /वहया न्याव्या लागतील अशी व्यवस्था असावी.

ज) घरात प्रवेश करताना घ्यावयाची काळजी :

• घरात आल्यानंतर थेट स्नानगृहामध्ये जाणे,

• स्नान करुन युनिफॉर्म बदलणे,

• आंघोळीनंतर युनिफॉर्म साबणाच्या पाण्यात बुडवून ठेवावा किंवा संबंधित शाळेने

विद्यार्थ्यांना युनिफॉर्म ऐच्छिक करावा. मास्कसुध्दा साबणाच्या पाण्याने धुवून बाहेर वाळत ठेवावा, पालकांनी मुलांना शाळेचे उपक्रमाबाबत अवगत करुन त्यांना पुढील दिवसासाठी तयार करावे.

ल) सीएसआर निधीचा उपयोग करणेबाबत :

• शाळांना फॅन, सॅनिटायझर या गोष्टी सीएसआर निधीमधून उपलब्ध करुन

घेण्यास हरकत नसावी, वैद्यकीय उपकरणे जसे, ऑक्सीमीटर, इन्फ्रारेड थर्मामीटर, औषधे, मास्क इ.

सीएसआर मधून उपलब्ध करुन घेण्यास हरकत नसावी.

४. वरील मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे.