क्रीडापटूंना अधिक पाठिंबा देण्यासाठी ऑलिम्पिक मंच योजना राबवून ती बळकट केली जाईल: अनुराग ठाकूर

नवी दिल्‍ली, ३ सप्टेंबर /प्रतिनिधी :-केंद्रीय युवा कार्यक्रम आणि क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी पॅरालिम्पिक क्रीडा पदक विजेते सुमित अँटिल (भाला फेक F64 सुवर्णपदक), देवेंद्र झाझरिया (भाला फेक F46 रौप्य पदक), योगेश कठुनिया (थाळीफेक F56 रौप्य पदक) आणि शरद कुमार (उंच उडी T63 कांस्य पदक) यांचा आज नवी दिल्लीत सत्कार केला.

यावेळी बोलताना ठाकूर म्हणाले, “आमच्या पॅरालिम्पियन खेळाडूंच्या चमकदार कामगिरीमुळे भारत उत्साही आहे; मागील पॅरालिम्पिकच्या पदकांच्या संख्येशी आम्ही आताच बरोबरी केली आहे! पॅरालिम्पियन हे भारताचा अभिमान आहेत. भारतीय पॅरा खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे देशाला केवळ अभिमान वाटला नाही तर प्रत्येक स्वप्न साकार होण्याचे धैर्यही मिळाले आहे. टोकियो पॅरालिम्पिकमध्ये, सुमित अँटिल, देवेंद्र झाझरिया, योगेश कठुनिया आणि शरद कुमार यांच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल मी पुन्हा एकदा अभिनंदन करतो. ” सुमितने केवळ भालाफेकमध्ये सुवर्णपदक जिंकले नाही तर जागतिक विक्रमही केला. देवेंद्रने 64.35 ची वैयक्तिक सर्वोत्तम फेक करून रौप्य पदक पटकावले. पॅरालिम्पिकमधील त्याचे हे तिसरे पदक होते. योगेश कठुनिया ने थाळीफेक मध्ये रौप्य पदक आणि पुरुषांच्या उंच उडी मध्ये शरद कुमार ने कांस्य पदक पटकावले. ते सर्व लाखो लोकांसाठी आदर्श बनले आहेत, असेही मंत्री म्हणाले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी खेळाडूंना पाठिंबा देण्याच्या सरकारी दृष्टिकोनाने एक परिवर्तनकारी बदल घडवून आणला आहे. सरकार भारताच्या पॅरालिम्पियन्सना सुविधा आणि निधीसह समर्थन देत राहील जेणेकरून ते आंतरराष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करू शकतील. क्रीडापटूंना अधिक पाठिंबा देण्यासाठी लक्ष्यित ऑलिम्पिक मंच योजना राबवून ती बळकट केली जाईल, असे मंत्री म्हणाले.

देशाच्या पंतप्रधानांनी खेळाडूंशी संवाद साधण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी वैयक्तिक अभिरुची घेतली आहे हे अभूतपूर्व आहे अशा भावना त्यांच्या संवादादरम्यान, पॅरा-खेळाडूंनी व्यक्त केल्या. पंतप्रधानांच्या प्रेरणेमुळेच खेळाडूंचा आत्मविश्वास यावेळी पूर्णपणे वेगळ्या पातळीवर आहे असे खेळाडूंना वाटले. त्यांना मिळालेल्या आर्थिक मदतीमुळे आणि सुविधांमुळे, खेळाडूंना वाटले की सरकारने त्यांना दत्तक घेऊन त्यांचे समर्थन केले आहे ज्यामुळे त्यांचे मनोबल वाढण्यास प्रचंड सहकार्य मिळाले आहे.