‘मला कोरोना झाला तर….!!!

लातूरचे जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांचा लेख

काळी उठून नेहमीप्रमाणे वॉटसअपवरील मेसेज तसेच फेसबुकवरील कमेंटला रिप्लाय देत होतो. याच वेळी एक फ्रेंड रिक्वेस्टचे नोटीफिकेशन आले. जिल्हाधिकारी म्हणून मला मोठ्या संख्येने फ्रेंड रिक्वेस्ट येतात. मर्यादित संख्येमुळे मला सर्वांचीच फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट करता येत नाही. त्यातल्या त्यात चांगल्या फ्रेंडसची रिक्वेस्ट नाकारता येत नाही. फ्रेंडस रिक्वेस्ट अक्सेप्ट करण्यापूर्वी त्याच्या प्रोफाईलमध्ये जाऊन त्याची माहिती घेणे तसेच त्याने आजपर्यंत केलेल्या पोस्ट, त्याचे फ्रेंडस पाहूनच त्याची रिक्वेस्ट स्वीकारणे, असा सोशल मिडियावरील सर्वसाधारण नियम आहे. अनोळखी तसेच उपद्रव देणाऱ्या फ्रेंडची रिक्वेस्ट स्वीकारून स्वतःची प्रोफाईल बिघडून बसते. यामुळे सर्वजण काळजी घेतात तशी मीही काळजी घेतो. मात्र, सकाळी आलेली फ्रेंड रिक्वेस्ट स्वॅप करून बाजूला सारताना थोडी वेगळी दिसली. इंग्रजी नाव असल्याने उत्सुकतेपोटी मी ती उघडून पाहिली आणि मला काही तरी वेगळेच वाटले.

रिक्वेस्ट पाठवणाऱ्या फ्रेंडचे नाव होते ..COVID19..!!! नाव पाहून थोडे विचलीत झालो. स्वतःला सावरत त्याची प्रोफाईल ओपन केली. त्यात एक व्यक्ती mutual फ्रेंड होता. ही व्यक्ती माझ्या संपर्कातील होती. त्यापुढे प्रोफाईल पाहिली तर या फ्रेंडचे लातूर जिल्ह्यात २०८ लोक फ्रेंडस दिसत होते. त्यात ११ फ्रेंडस ओळखीचे वाटले. नावे वाचून पाहिली तर या काल पॉझिटिव्ह अहवाल आलेल्या व्यक्ती होत्या. टेबलावरील अहवाल पाहून मी खात्रीही केली. पुढे पोस्ट वाचायला कसे तरी वाटत होते. दुसरीकडे उत्सुकता वाढत होती. पोस्टवर सहजच नजर गेली तर दहा फ्रेंडसला भावपूर्ण श्रद्धांजली वाहिलेली होती. अनेक पोस्ट चांगल्या होत्या. या फ्रेंड अर्थात मित्राच्या सहवासात दहा दिवस राहून तब्बल १३३ जण आनंदाने घरी जाणारेही दिसले. सध्या केवळ ६५ जण मित्राच्या सहवासात दिसत होते.

मला फ्रेंड रिक्वेस्ट आल्याचे कारण कळाले आणि थोड्यावेळासाठी काय करावे ते सुचले नाही. मात्र, या फ्रेंडच्या सहवासात न येण्यासाठी व आले तर त्याच्या सहवासाचा परिणाम आपल्यावर होणार नाही, यासाठी गेल्या अनेक दिवसापासून मी मनाची पक्की तयारी केल्याने मी लगेच भानावर आलो. युपीएससी परीक्षेत माझा मानसशास्त्र विषय होता. या विषयाच्या अभ्यासामुळे मला माणसांच्या मानसिक अवस्थेचे आकलन होण्यास चांगली मदत होते. सुरवातीला कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रूग्णांसोबत संवाद साधताना मला त्यांच्या मानसिक स्थितीची जाणीव झाली होती. यामुळेच कोरोना झाला तर मनाची तयारी कशी करायची, याचे भानही आले होते. रोग प्रतिकारशक्ती व मनाची शक्ती मजबूत असेल तर कोरोनाला खात्रीने हरवू शकतो, असा विश्वास मला होता. हा विश्वास प्रत्येकांत निर्माण करण्याचा प्रयत्न मी दररज फेसबुक लाईव्ह कार्यक्रमातून करत होतो. कोरोना पॉझिटिव्ह तसेच कोरोनामुळे त्रस्त असलेल्या लोकांशी संवाद साधून त्यांचे नियमित समुपदेशनही सुरू होते. यासाठी यंत्रणा कार्यरत होती. यंत्रणेतील समुपदेशकांमुळे कोरोनाच्या सहवासातील सर्व लोकांच्या मानसिक स्थितीची इत्यंभूत माहिती मला रोजच्या रोज मिळत होती. यामुळे मनाची शक्ती वाढवण्यासाठी मला विविध उपाय सापडले होते व मी ते अवलंबलेही होते.

एवढे असूनही मला कोरोना होणारच नाही, या गैरसमजात मी कधीच वावरत नव्हतो. जिल्ह्यातील लोकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी अँटी कोरोना पोलिस, अँटी कोरोना फोर्स आदी विविध उपाययोजनांची अंमलबजावणी करताना मला कोरोना होऊ नये, म्हणून पावलापावलावर काळजी घेत होतो. नियमित व्यायाम, प्राणायाम, सुदर्शनक्रिया करतो होतो. कोरोनाशी दोन हात करण्यासाठी माझ्याजवळ असलेले दोन शस्त्र म्हणजे माझे फुफ्फुस मजबूत करत होतो. योगासन व प्राणायामातून मी या शस्त्रांची ताकद वाढवली होती. यामुळे मला कोरोना झाला तरी मी कोरोनाच्या नव्हे तर कोरोना माझ्या सहवासात दहा दिवस राहून गुपचूप निघून जाईल, याची मला व माझ्या कुटुंबियांना खात्री होती. कोरोनाला पिटाळून लावण्यासाठी मनाची सर्व तयारी झालेली होती. मनोमन नियोजनही केले होते. कोरोनाच्या लेखी परीक्षेत उत्तीर्ण झालो होतो. जिल्ह्यात माझ्या संकल्पनेतून राबवलेल्या विविध उपायोजनांचे यश पहाता कोरोनाच्या लेखी परीक्षेतील मी गुणवंत विद्यार्थी होतो. मात्र, कोरोनाची प्रात्यक्षिक परीक्षा (प्रॅक्टीकल) अद्याप दिलेली नव्हती. जिल्ह्यात १८६ पैकी १३३ जण प्रॅक्टीकल परीक्षा उत्तीर्ण झाले होते तर दहाजण त्यात नापास झाले होते. ६५ जणांची दहा दिवसाची ही परीक्षा सुरू होती.

कोरोनाची फ्रेंड रिक्वेस्ट येताच मलाही प्रात्यक्षिक परीक्षा द्यावी लागणार हे कळून आले. या परीक्षेची मनोमन तयारी केली तरी प्रत्यक्षात तिला सामोरे जाण्यासाठी अनेक गोष्टीची पूर्वतयारी करावी लागणार होती. एका क्षणात हे चित्र समोर आले. मला कोरोना झाल्याच्या येणाऱ्या बातम्या, होणारी विचारपूस, कुटुंब, नातेवाईक व हितचिंतकांची चिंता, त्यांना वाटणारी भीती, विशेष करून माझी मुलगी शाश्वतीला कसे समजून सांगायचे, कळत न कळत तिला समजल्यानंतर तिच्या प्रश्नांना समर्पक कसे उत्तरे तयार ठेवायची, जिल्हा प्रशासनाची पर्यायी व्यवस्था कशी करायची, गेली ८७ दिवस कोरोनाविरोधातील लढ्याचे नेतृत्व दुसऱ्याच्या हाती द्यायचे की कसे, कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी सुरू असलेल्या तसेच येत्या काळात राबवल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे काय होणार, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण झाले. डोक्यात विचाराचे काहूर माजले होते. मात्र, मनाची पूर्वीतयारीमुळे आणि लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याने प्रॅक्टीकल परीक्षेचा ताण तेवढा जाणवत नव्हता. कोरोनाचा सामना करताना सर्वांच्या पुढे (फ्रंट लाईन) असलेल्या डॉक्टर, आरोग्य कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांच्यासह जिल्ह्यात कोणालाही कोरोनाची बाधा झाली नव्हती. सर्वजण सुरक्षित राहून कोरोनासोबत लढाई करत होते. मात्र, मलाच कोरोना झाल्याने थोड्या वेळासाठी अपराधीपणाची भावना येऊन गेली. मात्र, पूर्वीपासूनच या गोष्टी गृहीत धरल्याने ही भावना दूर झाली.सर्वात महत्वाचे म्हणजे कळत नकळत कोरोना होऊ शकतो, हे माहिती असल्याने मला कोरोना झाल्याचा दोष कोणालाच दिला नाही. यामुळे मी क्षणात स्वतःला सावरले आणि दुसऱ्या क्षणापासून एक जिल्हाधिकारी कसा महापूर, भुकंप अशा नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन आत्मविश्वासाने करतो, अगदी त्याच पद्धतीने मी माझ्यावर कोसळलेल्या कोरोनाच्या आपत्तीचे व्यवस्थापन करू लागलो. याच वेळी अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे मेसेज take care Sir चे तसेच all are with You, dont worry… असे अंधूकपणे दिसत होते. सहकारी अधिकाऱ्यांचेही असेच मेसेज येत होते. मी ते हलकेच वाचत नियोजन सुरू ठेवले. त्यात दहा दिवस दररोज काय करायचे, याचे नियोजन करण्यासाठी जाग्यावरचे उठून पेन व कागद घेत लिहायला सुरवात केली. मी त्या mutual फ्रेंडच्या संपर्कातील व्यक्ती असल्याने मला कोरोनाची लक्षणे नव्हती. Asymptomatic असल्यामुळे मला घरी किंवा सरकारी व्यवस्थेत विलगीकरण (आयसोलेशन) व्हावे लागणार होते.

मुलगी शाश्वतीमुळे मी सरकारी व्यवस्थेत विलगीकरण होण्याचा निर्णय घेतला. यानिमित्ताने सरकारी व्यवस्थेतील विलगीकरणाचा दर्जा वाढेल व लोकांचाही त्यावरील विश्वासदेखील दृढ होईल, याचीही खात्री होती. वरिष्ठांनीही माझ्या निर्णयाच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगत बळ दिले. त्यानंतर मी दहा दिवसात काय करायचे, याचे नियोजन लिहू लागलो. कामाच्या व्यापामुळे मला आवडती पुस्तके व चित्रपट पहाता आली नव्हती. त्याचेही नियोजन केले. पुस्तकांची व चित्रपटाची यादी काढताना कुठे तरी पर्यटनाला जात असल्याचे वाटले. प्रशासनात काम करताना अनेक कायदे व नियमांचा अभ्यास लागतो. असे काही कायदे व नियमांचीही यादी तयार केली. यादीच्या कागदावर सॅनिटायझर फवारून ती सुरक्षारक्षकाकडे दिली व पुस्तके तसेच आवश्यक वस्तु संकलित करण्यास सांगितले. कामामुळे अनेक जुने मित्र व नातेवाईकांना साधा कॉल करता आला नव्हता. त्यांचीही यादी तयार करून त्यांच्याशी संवादाचे नियोजन केले आणि मित्रांसमवेत जुन्या काळात गेलो. पुन्हा सावरत दहा दिवसात आणखी काही करता येईल का, या विचार करत नियोजन पक्के केले.

रोजच्या दिनक्रमात सकाळी योगासन, प्राणायाम, सुदर्शन क्रिया करणे. त्यानंतर मुलगी शाश्वती, पत्नी, आई व वडील तसेच नातेवाईकांना व्हिडीओ कॉल करून बोलणे, प्रशासनातील अधिकारी, आरोग्य यंत्रणेतील अधिकाऱ्यांशी बोलून आढावा घेणे, संस्थात्मक क्वारंटाईनच्या ठिकाणी श्रमदान व अन्य उपक्रमांत सहभागी होणे, दहा दिवसाची रोजनिशी लिहिणे आदी गोष्टींचा समावेश होता. मुलगी श्वाश्वतीला सरकारी कामासाठी व नेहमीप्रमाणे ट्रेनिंगसाठी जात असल्याचे सांगितले. मी नियमितपणे आहार तसेच व्यायाम व प्राणायामातून करत असलेली तयारी व घेत असलेली काळजी तसेच कोरोना आजाराच्या संकल्पना स्पष्ट असल्यामुळे `मी प्रात्यक्षिक परीक्षा चांगला मार्काने उत्तीर्ण होऊन घरी येणार`, हा पत्नीचा माझ्यावर अढळ विश्वास होता. तो तिच्या डोळ्यात मला स्पष्ट दिसत होता. याचे मला मोठे बळ आले.काही वेळात मला संस्थात्मक क्वारंटाईन व्यवस्थेत नेण्यासाठी रूग्णवाहिका येणार होती. त्यापूर्वी दहा दिवसाच्या नियोजन तसेच तयारीचा आढावा घेतला. माझ्यातील उत्साह व आत्मविश्वास पाहून उपस्थित सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावरील चिंता दूर झाली. कोरोनाची दहा दिवसाची प्रात्यक्षिक परीक्षा चांगल्या पद्धतीने देऊन मला लोकांना कोरोनावर विजय मिळवण्यासाठी आणखी काय करता येईल, हे आत्मविश्वासाने सांगता येणार होते. यामुळे लोकांना कोरोनासोबत लढण्याचे सामर्थ्य येणार होते, या विचारानेही मला खूप बळ आले. कोरोनाच्या प्रात्यक्षिक परीक्षेतून अर्थात दहा दिवसाच्या विलगीकरणातून मी सर्वांसाठी एक चांगला प्रेरणास्त्रोत होणार, या भावनेनेही मी भारावून गेलो. यामुळे मी पूर्वीपासून केलेल्या मनाच्या तयारीचे क्षणभर कौतुक वाटले आणि दुसऱ्या क्षणाला मी मोबाईल हातात घेत त्या COVID19 नावाच्या फ्रेंडची फ्रेंड रिक्वेस्ट अक्सेप्ट केली….. ती दहा दिवसात त्याला अनफ्रेंड करण्याचा पक्का निर्धार करूनच..!! आता मी या फ्रेंडच्या सहवासात नव्हे तर हा फ्रेंड माझ्या सहवासात राहणार होता…!!, या आत्मविश्वासाने मी बॅग उचलली अन् रूग्णवाहिकेत पाऊल ठेवले…..

जी. श्रीकांत (भा. प्र. से.),

जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, लातूर.

(टिप – मनाची तयारी असल्यास कोणत्याही आजार, आपत्ती व संकटावर मात करण्याची ताकद मिळते, अशी माझी धारणा आहे. म्हणूनच मला कोरोना झाला आहे, अशी कल्पना केली आणि मनाची तयारी म्हणून मी काय करणार, याबाबत काल्पनिक स्वरूपात तुमच्यासमोर व्यक्त झालो आहे. आपणही कोरोनाला हरवण्याकरिता असे टेक्स्ट, लेखन, ऑडिओ व व्हिडीओच्या माध्यमातून व्यक्त होऊन मनाची तयारी करू शकता… STAY HOME… STAY SAFE AND STAY PREPARED … धन्यवाद !)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *