जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते रजिया महिला स्वयंसहाय्यता बचतगटास लाखांचा धनादेश

परभणी,९ जुलै /​​प्रतिनिधी ​:-​ महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) परभणी ,द्वारा अल्पसंख्याक महिला सक्ष्मीकरण कार्यक्रमअंतर्गत रजिया महिला बचत गटाला उद्योग व्यवसाय करीता एकुण ९ लाख रुपयांचा बँकेच्या कर्जाचा धनादेश परभणीचे जिल्हाधिकारी दी.म.मुगळीकर यांच्या हस्ते देण्यात आला.

जिल्हाधिकारी कार्यालयातील त्यांच्या कक्षात झालेल्या या  कार्यक्रमास  महापालिका आयुक्त देविदास पवार, माविमच्या जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती निता अंभोरे, मौलाना आजाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे परभणी जिल्हा उपव्यवस्थापक एकनाथ कांबळे,  कार्यक्रम अधिकारी प्रकाश दवणे, नयी रोशनीच्या व्यवस्थापक श्रीमती जयश्री टेहरे, श्रीमती मीरा कराळे यांच्यासह रजिया महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा श्रीमती रजिया बेगम शेख रफीक, सचिव श्रीमती अख्तर बेगम शेख आदी उपस्थित होते.

नई रोशनी लोक संचलित साधन केंद्र परभणीद्वारे  स्थापित हा बचत गट आहे. आतापर्यंतची सर्वात जास्त रक्कम रजिया महिला स्वयंसहायता बचत गटास मिळाली आहे. 

महिला बचत गट विविध  प्रकारचे उद्योग करून स्वावलंबी होताना दिसून येत आहेत ही समाधानाची बाब आहे. बचत गटांना कोणकोणत्या अडचणी येतात त्या अडचणी निश्चितच सोडवू असे जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी सांगितले. 

यावेळी बचत गटाच्या महिलांनी त्यांच्या वस्तीतीला नवीन अंगणवाड़ी देण्यात यावी अशी मागणी केली.  यावेळी जिल्हा समन्वय अधिकारी निता अंभोरे यांनी महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) काम करत असलेल्या बचत गटातील उद्योगांची सविस्तर माहिती दिली. तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती जयश्री टेहरे यांनी केले.