राज्यात पुन्हा निर्बंध : अनलॉकचे नियम बदलले, पाहा काय सुरू राहणार, काय बंद?

मुंबई,२६ जून /प्रतिनिधी :- राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वसन विभागामार्फत ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत 4 जून 2021 पासून लागू करण्यात आलेल्या निर्बंधांमध्ये विस्तार करताना जमाव व मेळावे, धार्मिक स्थळ, खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे, हॉटेल, पर्यटन स्थळासंदर्भात काही क्षेत्रांचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे, जेणेकरून निर्बंधांची अंमलबजावणी करताना त्यात गैरसमज किंवा अस्पष्टता  येणार नाही.

जमाव/ मेळावे

1- जमावाची व्याख्या ‘एका सामूहिक कारणासाठी पाच पेक्षा जास्त लोकांचे एकत्रित येणे’ अशी करण्यात आली आहे. यामध्ये लग्न समारंभ, पार्टी, निवडणुका, प्रचार, सोसायटी बैठका, धार्मिक कार्यक्रम, मनोरंजनात्मक कार्यक्रम, क्रीडा सामने, सामाजिक कार्यक्रम यांचा अंतर्भाव असेल. यामध्ये काही अस्पष्टता असल्यास जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्रशासन जिल्हाधिकारी अंतिम निर्णय घेतील. सदर मार्गदर्शक तत्त्वे अशा अन्य जमवासाठीही लागू पडेल की ज्याचा इथे उल्लेख करण्यात आलेला नाही.

2-आपत्ती म्हणून कोविड-19 जोपर्यंत अस्तित्वात असेल, तोपर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांच्या जमावावर पूर्णपणे बंदी असेल. फक्त स्थानिक प्रशासन आणि वैधानिक स्वरूपाच्या जमावाला यातून सूट असेल.

3– स्थानिक प्रशासन आणि वैधानिक स्वरूपाचा जमाव

1- नागरी विकास विभाग आणि ग्रामीण विकास विभागातर्फे जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वे हे 4 जून 2021 च्या आदेशानुसार अस्तित्वात असतील.

2- अत्यावश्यक कामासाठी जिल्हाधिकारी यांच्या शिफारशी अनुसार एस डी एम ए/ यु डी डी /आर डी डी यांच्याकडून पूर्वपरवानगी घ्यावी लागेल.

4- बांधकाम होत असलेल्या ठिकाणी क्षमतेच्या 50 टक्क्यापेक्षा जास्त संख्येने काम करता येणार नाही.

5 – खुल्या जागेच्या ठिकाणीही क्षमतेच्या 25 टक्के पेक्षा जास्त लोकांना काम करता येणार नाही.

6 – कोणत्याही संमेलन अथवा मेळाव्याचा कालावधी तीन तासांपेक्षा जास्त असू शकणार नाही.

7 – एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी एकापेक्षा जास्त संमेलन नियोजित केले गेले असतील तर या दोन मेळाव्यादरम्यान पुरेशा कालावधी असावा आणि तो अश्या पद्धतीचा असावा जेणेकरून येणाऱ्या आणि जाणाऱ्या पाहुण्यांमध्ये वार्तालाप आणि परस्पर संवाद होणार नाही. तसेच दोन संमेलनांच्या दरम्यान सदर ठिकाणी पूर्णपणे सॅनिटायझर  व स्वच्छता करावी लागेल.

8 – एखाद्या आस्थापनेच्या ठिकाणी संमेलने होत असतील तर तिथले कर्मचाऱ्यांचे पूर्णपणे लसीकरण केलेले असावे किंवा त्यांच्या नियतकालिक चाचण्या आवश्यक असतील.

9 – संमेलन अथवा मेळावे होत असलेल्या ठिकाणी वेळोवेळी सादर केलेले एस ओ पी यांचा काटेकोरपणे पालन करावा आणि असे होत नसल्याचे आढळून आल्यास दंडात्मक कारवाई केली जाईल. जर वारंवार मार्गदर्शक एस ओ पीं चे उल्लंघन होत असेल तर त्या स्थापनेला पूर्णपणे बंद केले जाईल आणि जोपर्यंत कोविड आपत्ती म्हणून अस्तित्वात असेल, तोपर्यंत या आस्थापनांना उघडण्याची मुभा मिळणार नाही.

10 – स्तर तीन, चार आणि पाच येथील जमाव अथवा मेळाव्यांवर पूर्णपणे बंदी असेल. फक्त चार जूनच्या आदेशामध्ये नमूद केलेल्या कारणांसाठी परवानगी असेल.

11 – जर एखाद्या ठिकाणी खाण्या -पिण्या सह संमेलन असेल आणि त्या ठिकाणी मास्क काढावे लागत आतील, तर अशा ठिकाणी उपाहारगृहांसाठी जारी केलेले मार्गदर्शक तत्त्वे यांची अंमलबजावणी केली जाईल. (तीन, चार आणि पाच स्तर साठी परवानगी नसेल. स्तर दोन  साठी क्षमतेच्या 50 टक्के लोकांसाठी जेवण आणि स्तर एक साठी नियमित असेल.)

धार्मिक स्थळ

1 – स्तर तीन, चार आणि पाच मध्ये सर्व धार्मिक स्थळे अभ्यागतांसाठी बंद असतील.

2 – अभ्यागतंसाठी धार्मिक स्थळ स्तर दोन मधून पूर्व परवानगी घेतल्यानंतर उघडले जातील.

3 – जमावाचे सर्व नियम पाळून स्तर एक मधील अभ्यागतांना धार्मिक स्थळे खुले असतील.

4 – धार्मिक स्थळांच्या परिसरात राहणाऱ्या व धार्मिक विधी पार पाडणारे कर्मचारी यांच्यासाठी धार्मिक स्थळे उघडे असतील, परंतु कर्मचाऱ्यांसाठी ‘आयसोलेशन बबल’ आवश्यक असेल.

5 – स्तर तीन, चार आणि पाच मध्ये बाहेरून येणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी ही धार्मिक स्थळे बंद असतील.

6 – असे धार्मिक स्थळ की, जेथे लग्नकार्य आणि अंतिम संस्कार केले जात असतील, त्या ठिकाणी जमावासाठी लागू असलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाईल.

7 – कोणत्याही धार्मिक कार्य किंवा पवित्र दिवसाच्या निमित्ताने काही विशेष कार्य असल्यास त्या धार्मिक स्थळाला सर्व नियमांचे पालन करून ते पार पाडावे लागतील.

खाजगी प्रशिक्षण वर्ग कौशल्य केंद्रे

शाळा, महाविद्यालय किंवा इतर शैक्षणिक संस्थांसाठी असलेले नियम खाजगी प्रशिक्षण वर्ग अर्थात कोचिंग क्लासेस आणि कौशल्य केंद्रांसाठी लागू असेल. यासाठी एस डी एम ए वेगळे मार्गदर्शक तत्त्वे जारी करतील, तोपर्यंत अस्तित्वात असलेल्या नियमांचे पालन केले जाईल.

अपवाद:- कोविड-१९ च्या व्यवस्थापनासाठी, वैद्य कौशल्याचे प्रशिक्षण अभ्यासक्रम चालवणारे कौशल्य केंद्रे हे अपवाद असतील. अशा प्रकारच्या वर्गांवर कोणतेही निर्बंध नसतील. परंतु त्यांना कोविड सुयोग्य वर्तन यांचे पालन करावे लागेल आणि वेळोवेळी जारी केलेल्या एस ओ पी चे पालन करावे लागेल.

हॉटेल

1 – पाहुण्यांना प्रवेशासाठी सर्व स्तरांच्या हॉटेलांना उघडे ठेवण्याची परवानगी असेल.

2 – वेगवेगळ्या स्तरातून येणाऱ्या पाहुण्यांच्या निर्बंधांबद्दल अंकुश ठेवण्याची जबाबदारी ही त्या हॉटेलांच्या आस्थापनेवर असतील. जर एखाद्या हॉटेल स्थापनेला एखादा पाहुणा निर्बंधांच्या विरुद्ध प्रवास करून आल्याचे समजल्यास डी डी एम ए यांना तात्काळ माहिती द्यावी लागेल. (आवश्यक सेवेत असलेले कर्मचारी तसेच वैद्यकीय आपतकालीन स्थितीत काम करणारे कर्मचारी यांना येण्याजाण्याची मुभा असेल)

3 – जर एखादा पाहुणा राज्याच्या बाहेरून आला असेल तर हॉटेल आस्थापनेला खात्री करावी लागेल की तो संवेदनशील ठिकाणाहून आलेला नाही. यासाठी एस डी एम ए यांनी मार्गदर्शक तत्त्वे जारी केले आहेत आणि जर तो अशा संवेदनशील ठिकाणाहून आला असेल तर त्या संबंधीच्या सर्व मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी करावी लागेल. जर एखादा पाहुणा या मार्गदर्शकांच्या पालन करत नसेल तर त्याची माहिती तात्काळ डी डी एम ए यांना द्यावी.

4 – हॉटेलमधील उपहारगृहे हे त्या ठिकाणी राहणाऱ्या पाहुण्यांसाठी मर्यादित असेल. तेही क्षमतेच्या 50 टक्के अटीवर आणि सर्व एस ओ पी यांचा पालन करून. बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांसाठी लागू असलेल्या निर्बंधांचा पालन करून सेवा देते येईल. उदाहरणार्थ पार्सल अथवा होम डिलिव्हरी’ इत्यादी.

5 – हॉटेल मधील क्रीडा अथवा जलतरण पूल यासारख्या सामायिक सुविधांचा उपयोग लागू केलेल्या निर्बंधांना अनुसरूनच करावा लागेल. ते आवश्यक सेवेमध्ये येत नसल्याने व नियमित सुविधांमध्ये नसल्यास ‘इन हाऊस’ पाहुण्यांसाठी खुला नसेल.

6 – नियमांचे उल्लंघन झाल्यास दंड करण्यात येईल व वारंवार उल्लंघन केल्यास कोविड-19 आपत्ती असल्याची सूचना अस्तित्वात असेपर्यंत पूर्णपणे बंद करण्यात येईल.

पर्यटन स्थळे

एस डी एम ए यांची पूर्वपरवानगी घेऊन डी डी एम ए  कोणत्याही प्रतिष्ठित पर्यटन स्थळांना वेगळे प्रशासकीय घटक म्हणून घोषित करू शकते. या घोषणेनंतर डी डी एम ए त्या ठिकाणासाठी वेगळे स्तर देऊ शकते आणि हे या ठिकाणच्या कोविड-19 परिस्थितीवर अवलंबून असेल. तिथल्या विविध घटकांवर हा निर्णय निर्भर असेल आणि यासाठी पॉझिटिव्हिटी रेट किंवा भरलेले ऑक्सीजन बेड हे निकष नसतील. हॉटेल जवळपासच्या प्रशासकीय घटकांच्या तुलनेत एक स्तरापेक्षा जास्त कमी असता कामा नये. जर डी डी एम ए यांना वाटल्यास ते अश्या पर्यटन स्थळ आणखी जास्त निर्बंध ही लावू शकतात.

2 – थर्मल स्कॅनिंग किंवा लक्षणे चाचणीसाठी डी डी एन ए सीमेवर चेक पोस्ट लावू शकतात. तसेच येणाऱ्या पाहुण्यांवर त्याचे चार्ज लावू शकतात.

3 – अशा ठिकाणच्या पायाभूत सुविधा आणि पाहुण्यांची वर्दळ याच्या आधारे डी डी एम ए अशा या ठिकाणी जास्त निर्बंध लावू शकतात.

4 – या पर्यटन स्थळांच्या परिसरातील सर्व हॉटेलांसाठी हॉटेलचे मार्गदर्शक तत्त्वे लागू असतील. त्याच प्रमाणे डी डी एम ए जास्त दक्षता घेतील आणि वेळोवेळी यावर नजर ठेवतील.

5- जर हे स्थळ स्तर पाच मध्ये असेल तर  ई पास शिवाय कोणत्याही अभ्यागतांना तिथे येण्याची परवानगी नसेल.

6 – जर येणारे पाहुणे स्तर पाच प्रशासकीय घटकांमधील असेल तर त्यांना एक आठवड्यासाठी विलगीकरणात रहावे लागतील.

7 – पाहुणे सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे काटेकोरपणे पालन करत आहेत की नाही याची खात्री करण्याची जबाबदारी त्या हॉटेल अथवा होम स्टे किंवा पर्यटक आस्थापनेची असेल. निष्काळजीपणा केल्या पाहुणे तसेच आस्थापना व्यवस्थापना विरोधात दंडात्मक कारवाई केली जाऊ शकते. या मार्गदर्शक तत्त्वांचे पाहुण्यांकडून किंवा हॉटेल, होम स्टे, पर्यटक आस्थापने कडून उल्लंघन झाल्यास त्यांची परवानगी काढून घेतली जाऊ शकते आणि जोपर्यंत कोविड-19 आपत्ती म्हणून अस्तित्वात असेल, तोपर्यंत त्यांना पुन्हा चालू करण्याची मुभा राहणार नाही.

8 – एस डी एम ए यांना वाटल्यास ते एखाद्या पर्यटन स्थळाचे वेगळ्या प्रशासकीय घटकांमधून काढू शकतात

वरील सर्व मुद्दयांबाबत राज्य आपत्ती व्यवस्थापन, मदत आणि पुनर्वास विभागामार्फत परिपत्रक प्रसिद्धीस देण्यात आले आहे.