अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिला-भगिनींच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांचा मेळघाटातील दुर्गम गावांत दौरा; महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला संवाद

अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, शासन खंबीरपणे महिला-भगिनींच्या पाठीशी – महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर

अमरावती, दि. १८ : महिला कर्मचाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा छळ, अन्याय मुळीच सहन करता कामा नये. अन्यायाचा वेळीच प्रतिकार केला पाहिजे. कुठेही गैरप्रकार होत असल्यास वेळीच तक्रार द्यावी. शासन महिला-भगिनींच्या खंबीरपणे पाठीशी उभे आहे, असा संवाद राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांशी साधला.

मेळघाटातील महिला वनकर्मचाऱ्यांना काम करताना येणाऱ्या अडचणी, वरिष्ठांकडून होणारा जाच याबाबत प्राप्त तक्रारींची दखल घेऊन पालकमंत्र्यांनी मेळघाटातील दुर्गम भागातील विविध ठिकाणी सतत दोन दिवस गोपनीय दौरा केला व महिला वनकर्मचाऱ्यांशी थेट संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या व त्यांचे मनोबल वाढविले. प्रकल्प अधिकारी मिताली सेठी, उपवनसंरक्षक अविनाशकुमार, नवलकिशोर रेड्डी, पीयुषा जगताप आदी यावेळी उपस्थित होते. महिला व बालविकासमंत्र्यांनी धारणी तालुक्यातील मांगीया, हरिसाल, बोरी, लवादा, चित्री, चिखलदरा तालुक्यातील जैतादेही, मोथा, आमझरी, शहापूर या गावांबरोबरच अकोट वन्यजीव परिक्षेत्रातील धारगड येथेही भेट दिली.

 महिला वनकर्मचाऱ्यांशी संवाद

महिला व बालविकासमंत्री ॲड. ठाकूर म्हणाल्या, महाराष्ट्रात महिला-भगिनी अनेक क्षेत्रांत आघाडीने कार्यरत आहेत. अशा ठिकाणी त्यांना काम करताना संरक्षक वातावरण निर्माण होणे गरजेचे आहे. महिला वनकर्मचाऱ्यांशी बोलताना अवमानजनक भाषेचा वापर होणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याऐवजी ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावणे, त्यांना आपले म्हणणे मांडण्याची संधी न देणे, कॅम्पवर स्वतंत्र स्वच्छतागृह नसणे, मानसिक छळ, विशेष व्याघ्र संरक्षक दलातील वनकर्मचाऱ्यांचे पगार वेळेत न होणे  अशा गंभीर तक्रारी या भगिनींकडून होत आहेत. वन प्रशासनाने त्यांची तात्काळ दखल घेऊन तक्रारींचे निराकरण करावे, असे निर्देश त्यांनी वन प्रशासनाला दिले.

विशाखा समितीचे कार्य योग्यरित्या चालवा

महिलांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी महिला तक्रार निवारण समितीचे कार्य योग्यरित्या चालणे आवश्यक आहे. प्रत्येक तक्रारीची वेळीच दखल घ्यावी. महिला वनकर्मचाऱ्यांना आपले म्हणणे मांडण्यासाठी संधी द्यावी व त्यासाठी त्यांना परवानगीची गरज पडू नये, असे निर्देश त्यांनी वनाधिकाऱ्यांना दिले.

महिला वनकर्मचाऱ्यांचे मनोबल उंचावण्यासाठी मेडिटेशन कॅम्प घेण्याचीही सूचना त्यांनी केली.

अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधा

महिला वनकर्मचाऱ्यांना कुठलीही अडचण असल्यास थेट माझ्याशी संपर्क साधावा. माझ्या फेसबुक पेजवर मोबाईल नंबर जाहीर केला आहे. मला व्हाट्सॲपवर संदेशही पाठवता येईल. निर्भिडपणे आपली समस्या मांडा. अन्यायाचा वेळीच प्रतिकार करा, असा संवाद त्यांनी महिला-भगिनींशी साधला.

मागण्यांबाबत मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा करणार

विशेष व्याघ्र संरक्षण दलातील कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळावा, बालसंगोपन रजा केंद्राप्रमाणे महिला वनकर्मचाऱ्यांनाही मिळावी व इतरही समस्यांसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात येईल, असा दिलासा महिला व बालविकास मंत्र्यांनी यावेळी दिला.