कोविड रुग्णांच्या उपचारांना प्राधान्य; उद्योगांचा ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होणार – उद्योगमंत्री सुभाष देसाई

मुंबई, दि. ६ : राज्यातील कोरोनाची स्थिती हळुहळु सुधारत असून पुढील पंधरा दिवसांत उद्योगांना लागणारा ऑक्सिजन टप्प्याटप्प्याने सुरळीत करण्याचे संकेत उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी आज येथे दिले. दरम्यान, करोना रुग्णांसाठी ऑक्सिजनची कमतरता पडू दिली जाणार नाही, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.

श्री. देसाई यांच्या अध्यक्षतेखाली आज ऑक्सिजन पुरवठादार व उद्योजक यांच्यासोबत ऑनलाइन बैठक झाली. यावेळी उद्योगांना जाणवणाऱ्या ऑक्सिजन टंचाईवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी एमआयडीसीचे सीईओ पी. अन्बलगन, उद्योग विभागाचे विकास आयुक्त हर्षदीप कांबळे, गॅस असोशिएशनचे अध्यक्ष साकेट टिकू यांसह उद्योजक उपस्थित होते.

राज्य शासनाने महिनाभरापूर्वी कोविड रुग्णांसाठी ८० टक्के ऑक्सिजन राखीव ठेवण्याबाबत आदेश काढले. यामुळे उद्योगांना ऑक्सिजनची मोठी टंचाई जाणवत आहे. असे असले तरी महिनाभराच्या कालावधीत कोरोनाची स्थिती सुधारत चालली आहे. त्यामुळे रुग्णालयाप्रमाणे उद्योगांनाही ऑक्सिजन सुरू राहण्यासाठी आढावा घेतला जाईल. आरोग्य विभागाचा ऑक्सिजन पुरवठा अविरत ठेवून उद्योगांना देखील मुबलक ऑक्सिजन पुरविण्याचा प्रयत्न करावा, अशा सूचना श्री. देसाई यांनी केल्या.

राज्यातील उद्योगांना ८७० मेट्रिक टन प्रतिदिन ऑक्सिजनची गरज आहे. त्यापैकी ६०० मेट्रिक टन ऑक्सिजन उद्योगांना लागतो. राज्यात सध्या एक हजार मेट्रिक टन ऑक्सिजनची निर्मिती होत आहे. नवीन उद्योगांतून पाचशे मेट्रिक टन ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. आपली उत्पादन क्षमता १३०० मेट्रीक टन इतकी आहे. त्यामुळे उद्योगांनी ऑक्सिजनचा तुटवडा भरून काढण्यासाठी प्रयत्न करावा, अशी सूचना श्री. देसाई यांनी केली. दरम्यान, कोरोना रुग्णांची गरज जसजशी कमी होईल, तसतशी उद्योगांसाठी ऑक्सिजनची उपलब्धता वाढेल. मात्र, या क्षणी प्राधान्य रुग्ण उपचारांनाच देण्यात येत आहे. ते प्राधान्य कायम राहील, असेही श्री. देसाई यांनी स्पष्ट केले.