तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-राज्यातील शासकीय महाविद्यालये/ संस्था, अशासकीय अनुदानित महाविद्यालये तसेच अभियांत्रिकी, वास्तुशास्त्र, औषधनिर्माणशास्त्र, व्यवस्थापन व कला महाविद्यालये यामध्ये मंजूर पदे ही सेवानिवृत्ती वा अन्य कारणामुळे रिक्त आहेत.  मात्र विद्यार्थ्यांच्या अध्यापनात खंड पडू नये यादृष्टीने रिक्त पदांवर तासिका तत्वावर अध्यापकांची नियुक्ती करण्यात येते. तासिका तत्त्वावरील अध्यापकांच्या मानधनात वाढ करण्यास वित्त विभागाने मान्यता दिल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे सांगितले.

उच्च शिक्षण संचालनालय

कला, वाणिज्य, विज्ञान पदवी अभ्यासक्रमाकरिता रु.625 वरुन रु.1 हजार प्रति तास व पदव्युत्तर अभ्यासक्रमाकरिता रु.750 वरुन रु. 1 हजार प्रति तास.

शिक्षणशास्त्र / शारीरिक शिक्षण / विधी (पदवी / पदव्युत्तर) या व्यावसायिक अभ्याक्रमांकरिता रु. 750 वरुन रु.1 हजार प्रति तास.

तंत्र शिक्षण संचालनालय

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ अभियंता यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान रु. 1 हजार वरुन रु. 1 हजार 500 प्रति तास.

पदवी / पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी मानधन दर रु. 600 वरुन रु. 1 हजार प्रति तास.

पदविका अभ्याक्रमांसाठी मानधन दर रु. 500 वरुन रु.800 प्रति तास.

कला संचालनालय

उद्योग व्यवसाय क्षेत्रातून निमंत्रित तज्ज्ञ / अनुभव संपन्न ज्येष्ठ व्यवस्थापक यांचे व्याख्यान मानधन दर रु. 750 वरुन रु.1 हजार 500 प्रति तास.

कला शिक्षण पदविका तसेच पदवी/पदव्युत्तर पदविका / पदव्युत्तर पदवी अभ्याक्रम मानधन दर रु. 625 वरुन रु.1 हजार प्रति तासाप्रमाणे सुधारित करण्यात येत आहे.

सहायक प्राध्यापकप्राचार्यशारीरिक शिक्षण संचालकग्रंथपाल पदे भरण्यास वित्त विभागाची मान्यता – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हीत आणि महाविद्यालयाच्या प्रशासनिक बाबींवर होणारा विपरीत परिणाम विचारात घेऊन सहायक प्राध्यापक, प्राचार्य, शारीरिक शिक्षण संचालक, ग्रंथपाल ही पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली असून ही पदे भरण्यात येणार असल्याची माहिती, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिली.

मंत्री श्री. पाटील म्हणाले, वित्त विभागाने २ हजार ८८ सहायक प्राध्यापक पदांच्या पदभरतीवरील निर्बंध शिथिल करून ही पदभरती करण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार ही पदभरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तसेच, १०० टक्के रिक्त होणारी प्राचार्य संवर्गातील पदे भरण्यासदेखील मान्यता देण्यात आली आहे. याशिवाय उच्चस्तरीय सचिव समितीने मंजूर केलेल्या पदांपैकी उर्वरित ग्रंथपाल – १२१ आणि शारीरिक शिक्षण संचालक – १०२ अशी एकूण २२३ पदे भरण्यास दिलेली स्थगिती शिथिल करण्याबाबत वित्त विभागास विनंती करण्यात आली होती. या प्रस्तावास वित्त विभागाची मान्यता प्राप्त झाली असून त्यानुसार पदभरतीस मान्यता देण्यात आल्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री श्री. पाटील यांनी विधानसभेत सांगितले.