हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट -माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांचा विधानसभेत आरोप

मुंबई,२० मार्च  /प्रतिनिधी :-हिंदू देवस्थानांच्या जमिनींची लूट राज्यात सुरू आहे. देवस्थानांच्या जमिनी हडप करण्याचे षडयंत्र गेल्या काही वर्षांपासून सुरु असल्याचा आरोप माजी मंत्री आ. जयंतराव पाटील यांनी विधानसभेत केला. अशा जमिनींबाबत झालेल्या घोटाळ्यांची माहिती त्यांनी सभागृहात सादर केली. या सगळ्यामागे अधिकारी कोण आहेत, राजकीय नेते कोण आहेत, याचा लाभ कोणाला झाला, याचा खुलासा व्हावा अशी मागणी त्यांनी केली. एका महिन्याच्या आत विशेष अधिकारी नेमून दूध का दूध पानी का पानी करावे आणि जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली.

औंधच्या संस्थांनाने स्वातंत्र्यपूर्वीच आपला संस्थानाचा कारभार जनतेच्या हाती दिला होता. औंध संस्थानाचे गांधींनीही कौतुक केले होते. संस्थांनाने जमिननी अनेक देवस्थानांना दिल्या. त्याच्या नोंदी उपलब्ध आहेत. पण याच जमिनी लुटण्याचे काम सुरू आहे.

आमच्या सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यात औंध संस्थानाच्या अशा चार जमिनी आहेत. यात गैरव्यवहार झाला आहे. जमिनी लाटण्याचा प्रकार सुरू आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातही तसाच प्रकार घडला आहे. काही बड्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून विठोबा देवस्थानांची जमीन लाटली गेली. एका चित्रपटाला लाजवेल अशी स्क्रिप्ट करून हा प्रकार केला गेला.

आष्टीला पिंपळेश्वर महादेव देवस्थान आहे. ट्रस्टच्या जमिनीवर भव्य बांधकाम करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणांची चौकशी झाली पाहिजे. कोण अधिकारी आहेत? कोण राजकीय व्यक्ती आहेत? या सर्व गोष्टींचा एका महिन्याच्या आत छडा लावा. कठोरात कठोर कारवाई करा.

गायरान जमिनींची स्थितीही फारशी वेगळी नाही. एकीकडे गावातील लोक गायरान जमिनी विकत आहेत तर दुसरीकडे ज्यांना राहायला जागा नाही असे गोरगरीब नाईलाजाने या जमिनींवर अतिक्रमण करून तिथे राहात आहेत. त्यांच्या राहण्याच्या प्रश्नाचीही दखल घ्यावी.

नोकरभरती नसल्याने अनेक युवक पीडब्ल्यूडी मध्ये परीक्षा देऊन घरी बसले आहेत. २०२० च्या एमपीएससी बॅचच्या मुलांना अद्याप कामात रुजू केलेले नाही. त्यामुळे फक्त निवडणुकीपूर्वीची घोषणा न राहता लवकर नोकरभरती करावी, अशी विनंती जयंतराव पाटील म्हणाले.

कांदा उत्पादक, कापूस शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. शेतकऱ्यांना एक रुपयात पीक विमा योजना सरकार आणत आहे. पण विम्याचे हप्ते भरण्यास शेतकऱ्याने कधीच नकार दिलेला नव्हता. त्यांचा आक्षेप जाचक अटींबाबत आहे. या जाचक अटी दुरुस्त करण्याची गरज आहे. यामुळे शेतकरी विम्याच्या विरोधात आहेत. आता एक रुपया भरून विमा घेणाऱ्या शेतकऱ्यांना विमा कंपन्या दारातच उभे करणार नाहीत. त्यामुळे सरकारची भूमिका शेतकऱ्याला फसवणारी आहे, अशी टीका जयंतराव पाटील यांनी केली.