‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याच्या निर्णयाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विधानपरिषदेत अभिनंदन

अंधारलेल्या इतिहासाला प्रकाशात आणल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिनंदन

नागपूर ,२८ डिसेंबर/ प्रतिनिधी :- देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली, त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानपरिषदेत प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन केले. महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने बाबा जोरावर सिंह आणि बाबा फतेह सिंह यांच्या शौर्याला नमन करतानाच अंधारलेल्या इतिहासाला प्रकाशात आणण्याचे मोठे कार्य केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी प्रधानमंत्र्यांचे अभिनंदन केले.

प्रधानमंत्री श्री. मोदी यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधानपरिषदेत मांडला. त्यावर बोलताना मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले की, गुरु गोविंद सिंगजी यांचे पुत्र साहिबजादे बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग या बालकांनी वीर मरण पत्करले. मोगलांसारख्या कट्टर धर्मांधांपुढे ते झुकले नाहीत. केवळ सहा आणि नऊ वर्षांच्या या बालकांनी मुघलांच्या अत्याचाराला जुमानले नाही. त्याची शिक्षा म्हणून त्यांना भिंतीत गाडून मारण्यात आले. हा बलिदानाचा इतिहास एकीकडे अंगावर काटा आणणारा आहे पण दुसरीकडे, त्यांच्यावर जे उच्च कोटीचे संस्कार झाले होते, त्यासाठी नतमस्तक करणारा आहे. एकीकडे क्रूरतेने सर्व मर्यादा तोडल्या, तर दुसरीकडे संयम, शौर्य आणि पराक्रमाचे उदाहरण होते. हे उदाहरण आम्हाला शतकानुशतके प्रेरणादायी असल्याचेही मुख्यमंत्री म्हणाले.

“गुरु गोविंद सिंग हे शीख धर्मियांचे दहावे गुरु होते आणि त्यांनी खालसा पंथाची स्थापना केली. अन्याय, अधर्म आणि अत्याचाराविरोधात त्यांनी दिलेला लढा अजरामर आहे. त्यांच्यासारख्या निडर आणि देशाच्या स्वाभिमानासाठी जगणाऱ्या गुरूंच्या पुत्रांनी केलेले बलिदान, नवीन पिढीने विसरून जाऊ नये म्हणून ‘वीर बाल दिवस’ साजरा करण्याचा उद्देश आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या या कार्यक्रमास मी स्वतः देखील उपस्थित होतो”, असे सांगतानाच स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतांना ज्यांनी देशासाठी आपले जीवन समर्पित केले होते, त्या लोकांचा सन्मान  होत असल्याचे मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

“आपल्या देशाच्या तरुण पिढीने भूतकाळात देश आणि धर्माचे कसे संरक्षण केले, त्याचा इतिहास नवीन पिढीला कळणे फार महत्त्वाचे आहे.  महाराष्ट्र आणि पंजाब यांचे एक नाते आहे. चाफेकर बंधू महाराष्ट्राचे होते, भगतसिंगाबरोबर असलेले राजगुरू महाराष्ट्राचे होते.  पंजाबच्या घुमानमध्ये संत नामदेवांचे निवासस्थान होते आणि नांदेडमध्ये गुरु गोविंद सिंग यांची समाधी आहे. ऑक्टोबर २००८  मध्ये नांदेडमध्ये आपण श्री गुरु गोविंद सिंग यांच्या ३०० व्या पुण्यतिथीनिमित्त गुरु-ता-गद्दी सोहळा मोठ्या प्रमाणावर साजरा केला होता. शेतीपासून ते सीमेवर रक्षण करण्यापर्यंत आणि संस्कृतीपासून राजकीय नेत्यांपर्यंत पंजाबी-मराठी संस्कृतीचा एकमेकांशी खूप घट्ट संबंध आहे”, असेही मुख्यमंत्री श्री. शिंदे म्हणाले.

“महाराष्ट्र हा देखील लढवय्यांचा प्रदेश आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे त्यांच्या देशभक्तीसाठी आणि मुघलांविरुद्धच्या त्यांच्या अविस्मरणीय धाडसासाठी ओळखले जातात. गुरु गोविंद सिंग आणि छत्रपती शिवाजी महाराज या दोघांनाही धैर्य आणि संयमाची परीक्षा द्यावी लागली होती. छत्रपती संभाजी महाराजांनादेखील या अत्याचारांना सामोरं जावं लागलं होतं”, असं सांगून देश आणि धर्मासाठी बाबा जोरावर सिंग आणि बाबा फतेह सिंग  यांच्या पराक्रमी बलिदानाचे स्मरण करुन त्यांना मुख्यमंत्र्यांनी श्रद्धांजली अर्पण केली.