राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन होणार

सामाजिक न्याय विभागाचा पुढाकार ,पंधरा दिवसात कक्ष स्थापन करा- आयुक्त  डॉ प्रशांत नारनवरे  औरंगाबाद,२३ जुलै /प्रतिनिधी :-राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध प्रश्नांबाबत शासन गंभीर असून ज्येष्ठ नागरिक धोरणाच्या अनुषंगाने त्यांचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी आवश्यक ती मदत करण्यासाठी सामाजिक न्याय विभागाने पुढाकार घेतला आहे. राज्याचे समाज कल्याण मंत्री  धनंजय मुंडे यांच्या निर्देशानुसार राज्यात जिल्ह्याच्या ठिकाणी तात्काळ ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्यात यावा व पंधरा दिवसात प्रत्येक जिल्ह्यात ज्येष्ठ नागरिक कक्ष स्थापन करण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश राज्याचे समाज कल्याण आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी दिले आहेत. दिनांक १६ जुलै २०२१ रोजी पुणे येथे समाज कल्याण विभागाच्या सर्व प्रादेशिक उपायुक्त समवेत राज्यस्तरीय आढावा बैठकीचे आयोजन आयुक्त नारनवरे यांच्या अध्यक्षतेखाली बार्टी येथे करण्यात आले होते त्या प्रसंगी त्यांनी आदेशित केले आहे. कोरोना साथ रोगाचा  समाजातील सर्वच घटकांना  फटका बसला असून ज्येष्ठ नागरिकांचे देखील अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत, त्यांच्या सर्व  अडीअडचणीचे तात्काळ निवारण करण्यासाठी जिल्हा कक्षाच्या माध्यमातून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे डॉ. नारनवरे यांनी यावेळी सूचित केले. जिल्ह्यात निर्माण करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक कक्षाचे लवकरच मंत्री महोदयांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार असल्याचे आयुक्त यांनी यावेळी सांगितले. संपूर्ण दिवसभर चाललेल्या या राज्यस्तरीय आढावा बैठकी प्रसंगी सामाजिक न्याय विभागाच्या अनेक योजनांचा आढावा घेण्यात आला. त्यात प्रामुख्याने विविध योजनांची करण्यात येत असलेल्या  मार्गदर्शिकेबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली, तसेच समाज कल्याण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची ऑनलाइन संगणक प्रणाली विकसित करणेबाबत देखील यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली. येणाऱ्या 25 वर्षातील विभागाची वाटचाल कशी राहील याबाबत व्हिजन डॉक्युमेंट तयार करण्यात येत असून या व्हिजन डॉक्युमेंटबाबत देखील प्रादेशिक उपायुक्त यांनी  त्या त्या विभागाचे व्हिजन डॉक्युमेंटचे सादरीकरण केले. आयुक्त डॉ. प्रशांत नारनवरे यांनी क्षेत्रीय अधिकारी यांच्या  कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत सामाजिक न्याय विभागाच्या योजना पोचण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करावे, असेही सुचित केले. बैठकीस अतिरिक्त आयुक्त दिलीप डोके, सहआयुक्त भारत केंद्रे ,सहआयुक्त वृषाली शिंदे, उपायुक्त प्रशांत चव्हाण, उपायुक्त रवींद्र कदम पाटील, जलील शेख, प्रादेशिक उपायुक्त, समाज कल्याण,औरंगाबाद यांच्यासह राज्यातील सर्व प्रादेशिक उपायुक्त, तसेच आयुक्तालयातील सर्व अधिकारी  यावेळी उपस्थित होते.

Read more