विद्यार्थ्यांच्या प्रगतीला महत्त्व देणारा अर्थसंकल्प – शालेय शिक्षणमंत्री प्रा.वर्षा गायकवाड

मुंबई, दि. 8 : कोरोनाच्या पार्श्वभूमीमुळे राज्याच्या महसुलामध्ये घट असतानाही शालेय शिक्षण विभागाला विविध योजनांसाठी गेल्या वर्षी 2000 कोटी वरून 2140 कोटींची तरतूद करून विद्यार्थ्यांच्या प्रगतीला महत्त्व दिले असल्याची प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियान

राजमाता जिजाऊ शैक्षणिक गुणवत्ता विकास अभियानअंतर्गत राज्यातील जिल्हा परिषदेच्या जीर्ण झालेल्या, मोडकळीस आलेल्या इमारतींची, वर्गखोल्यांची पुनर्बांधणी व दुरूस्ती याकरिता तीन हजार कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

या अभियानाअंतर्गत विद्यार्थ्यांची गुणवत्ता व सुरक्षित वातावरणात उत्कृष्ट दर्जाचे शिक्षण देण्यासाठी राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांचे सक्षमीकरण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास करण्यासाठी आनंददायी वातावरण, द्विभाषिक पुस्तके, ग्रंथालये उभारणी, शारीरिक व क्रीडा विकास, स्पर्धा परीक्षा शिष्यवृत्ती परीक्षांचे कलचाचणी, डिजिटल शिक्षण, कौशल्य विकसित करणे. नियमित मुल्यांकन उत्कृष्ट  शिक्षकांचे मार्गदर्शन याद्वारे शाळांचा शैक्षणिक व गुणवत्ता वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत.

स्टार्स योजना

राज्यातील शिक्षण पद्धतीची अध्यापन, अध्ययन व परिणाम यांचे बळकटीकरण करण्यासाठी पूर्व प्राथमिक ते बारावी दर्जेदार शिक्षण देणे, अध्ययन निष्पत्तीमध्ये वाढ करणे, सामाजिक, लिंग भेदभाव न करता शिक्षणाचा दर्जा राखणे या सर्व बाबींचा समावेश सर्व पातळीवर करून ठराविक दर्जाचे शिक्षण देणे अंतर्भुत केले. विशेष गरजा असलेली बालके, मुली, आणि वंचित समुदायातील विद्यार्थी यांच्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.

यामध्ये शिक्षकांचा विकास शाळेच्या वर्गातील अध्ययन पद्धतीत सुधारणा, शाळेचे नेतृत्व, शाळा ते काम / शाळा ते उच्च शिक्षण हे संक्रमण सुलभ करणे, प्रगत सेवा पुरवण्यासाठी प्रशासन व विकेंद्री व्यवस्थापन करणे अशा गोष्टी यामध्ये समाविष्ट केल्या आहेत. 967 कोटी 39 लाख किंमतीच्या योजनेस अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे.

सातारा सैनिकी शाळेचे आधुनिकीकरण

सैनिकी शाळा सातारा या शाळेचे आधुनिकीकरण स्वर्गीय यशवंत चव्हाण यांच्या संकल्पनेतून आणि प्रयत्नातून 1961 मध्ये सातारा येथे सैनिकी शाळेची स्थापना करण्यात आली. या शाळेच्या स्थापनेपासून अनेक विद्यार्थ्यांची सैन्य दलामध्ये  निवड झालेली आहे. अशा या शाळेचे आधुनिकीकरण करण्यासाठी 300 कोटी चा विकास आराखडा तयार करण्यात आला असून सन 2021-22 साठी 100 कोटी नियतव्यय मंजूर करण्यात आले आहे. या विकास आराखड्यामध्ये मुलांचे दर्जेदार वसतीगृह, आधुनिक इमारती व दर्जेदार शारीरिक शिक्षणाचे क्रीडांगण व अन्य बाबींचा विकास करण्यात येणार आहे.

भारतरत्न राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क

विद्यार्थ्यांमध्ये व नागरिकांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे, विज्ञानातून आनंद व मौज निर्माण करणे. 21 व्या शतकातील कौशल्ये विकसित करणे यासाठी ‘राजीव गांधी विज्ञान व तंत्रज्ञान पार्क’ उभारण्यास परवानगी देण्यात आली असून प्रकल्प दोन वर्षात पूर्ण करण्याचे नियोजित आहे, अशी माहिती प्रा.गायकवाड यांनी दिली आहे.