अश्विन आणि अक्षर पटेलकडून इंग्लंडची दाणादाण ,भारताने ३-१ ने कसोटी मालिका जिंकली

Image

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा भारताचा मार्ग मोकळा

अहमदाबाद: भारत विरुद्ध इंग्लंड चार सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघानं दणदणीत विजय मिळवला आहे. 25 धावांनी भारतीय संघानं चौथ्या सामन्यात इंग्लंडवर विजय मिळवला. अहमदाबादमध्ये झालेल्या चौथ्या कसोटीमध्ये भारतीय संघाच्या गोलंदाजांनी इंग्लंड संघाला जेरीस आणलं. दुसऱ्या डावात केवळ 135 धावा करण्यात इंग्लंडच्या संघाला यश मिळालं आहे. 

 भारताने पहिल्या डाव्यात १६० धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लंड संघाचे फलंदाज आर अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीच्या जाळ्यात अडकले. दोघांनीही प्रत्येकी पाच विकेट घेत भारताच्या नावावर अजून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. या सामन्यासोबतच भारताने चार सामन्यांची ही कसोटी मालिका ३-१ ने जिंकली आहे. या विजयासोबतच भारत वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशिपसाठी पात्र झाला आहे.

तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु झाल्यानंतर वॉशिंग्टन आणि अक्षर पटेल यांनी पुन्हा एकदा इंग्लंडच्या गोलंजांसमोर विकेट मिळवण्यासाठी आव्हान निर्माण केलं होतं. दोघांनी मिळून एकूण १०० धावांची भागीदारी केला. मात्र ४३ धावांवर असताना अक्षर पटेल रन आऊट झाला आणि अर्धशतकाची संधी हुकली. दुसरीकडे वॉशिंग्टन सुंदरकडे मात्र शतकाची संधी होती. पण इशांत आणि सिराज यांनी आपली विकेट गमावल्यामुळे शतकाची संधी पुन्हा एकदा हुकली. वॉशिंग्टन ९६ धावांवर नाबाद राहिला. ३६५ धावांवर ऑल आऊट झालेल्या भारतीय संघाने १६० धावांची आघाडी घेतली होती.

Image

इंग्लंड संघ चहापानानंतर मैदानात उतरताच अश्विनने क्रॉलीची विकेट घेत इंग्लंडला पहिला धक्का दिला. यानंतर आलेला ब्रेनस्टॉ खातंही उघडू शकला नाही. अश्विनने रोहित शर्माच्या हाती त्याला झेलबाद केलं. यानंतर अक्षरने सिब्ले आणि बेन स्टोक्सची विकेट घेत इंग्लंडसमोर पराभवाचं संकट निर्माण केलं आहे. इंग्लंडची धावसंख्या २० ओव्हर्सनंतर ४० धावांवर ४ बाद अशी झाली होती. यानंतर अश्विन आणि अक्षरने जो रुट आणि पोपची विकेट घेत इंग्लंडवर पराभवाचं संकट निर्माण केलं. डॅन लॉरेन्स वगळता इंग्लंडचा एकही फलंदाज मोठी धावसंख्या उभी करु शकला नाही. लॉरेन्सने अर्धशतक आणि जो रुटने केलेल्या ३० धावा या सर्वाधिक धावसंख्या ठरल्या. सहा फलंदाज एक अंकी धावसंख्येवरच तंबूत परतले.

अक्षर पटेल आणि आर अश्विनचा तुफान गोलंदाजीनं इंग्लंडच्या बड्या फलंदाजांची दांडी गुल झाली आणि भारतीय संघानं मालिका आपल्या खिशात घातली. भारत विरुद्ध इंग्लंड 4 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 3-1 ने विजय मिळवला आहे. अहमदाबादमधील शेवटची कसोटी जिंकल्यानंतर टीम इंडियाने एकूण 520 गुण जिंकले आहेत आणि 72.2 टक्के गुण जिंकले आहेत. अशाप्रकारे, आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम पॉईंट टेबलमध्ये भारत अव्वल स्थानी पोहोचला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याचा भारताचा मार्ग मोकळा झाला आहे. हा अंतिम सामना न्यूझिलंड विरुद्ध होणार आहे. न्यूझीलंडने यापूर्वीच आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये 70% पॉईंटसह त्यांचे स्थान निश्चित केले होते. 

या अंतिम टप्प्यानंतर ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसला असून अहमदाबादच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताच्या पराभवाची अपेक्षा होती. मात्र ही अपेक्षा हवेतच विरली आणि भारतीय संघानं या मालिकेवर दणदणीत विजय मिळवला आहे.