कुऱ्हाडीने वार करुन खून,आरोपी चुलत्यासह दोघा चुलतभावांना अटक 

औरंगाबाद/प्रतिनिधी
शेतीच्या बांधावरुन चुलत भावांनी कुऱ्हाडीने वार करुन त्याचा खून केल्याची घटना 5 जून रोजी सायंकाळी चिकलठाणा परिसरातील चिंचोली शिवारात घडली. प्रकरणात पोलिसांनी आरोपी चुलत्यासह दोघा चुलतभावांना  शनिवारी (दि. 6) पहाटे गजाआड केले. तिघा आरोपींना मंगळवारपर्यंत (दि. 9) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृगांरे/तांबडे यांनी दिले.
लक्ष्मण नागोजी वाघ (58), उद्धव लक्ष्मण वाघ (32) व अंकुश लक्ष्मण वाघ (28, सर्व रा. चिंचोली ता.जि. औरंगाबाद) अशी आरोपींची नावे आहेत.
प्रकरणात मयत कृष्णा रामराव वाघ (37) यांचा भाउ बाबासाहेब रामराव वाघ (33, रा. परदरी रोड चिंचोली) याने तक्रार दिली. तक्रारीनुसार, बाबासाहेब वाघयांच्या कुटूंबीयांची गावात 14 एकर शेती आहे. त्यापैकी शेत गट नं 25,52 मध्ये शेताच्या बांधावरुन वाद आहे. घटनेच्या 15 दिवसांपूर्वी गट नं 52 मध्ये बाबासाहेब व कृष्णा असे दोघे जमीनीवरील नदीकाठच्या बोरीच्या काट्या काढत असताना तेथे चुलता लक्ष्मण वाघ व त्याचे मुले उध्दव, अंकुश हे कुऱ्हाड  घेवुन मारण्यासाठी आले मात्र बाबासाहेब व कृष्णा हे काहीच न बोलता तेथुन निघुन गेले. वाद वाढु नये यासाठी बाबासाहेब यांच्या वडीलांनी पोलिसांत तक्रार दिली होती.
दरम्यान 5 जून रोजी दुपारी दोन वाजता बाबासाहेब हा गट नं 25 मधील शेतात तर कृष्णा हे प्रभाकर वाघ यांच्या शेतात ट्रक्टरने फनाटा मारत होते. बाबासाहेबचे काम अटपल्यानंतर तो गट नं 22 येथील शेतात बाजरीचा चारा गोळा करण्यासाठी गेला होता. साडेचार वाजता कृष्णा गट नं 25 मध्ये ट्रक्टर घेवुन गेला तेंव्हा आरोपी हे पण त्याच गटातील शेतात ट्रक्टरने फनाटा मारत होते. पाच वाजेच्या सुमारास आरोपी कृष्णा शिवीगाळ करुन मारहाण करु लागले. आवाज आल्याने बाबासाहेब धावत गेला मात्र उद्धवने हातातील कुर्हाडीने कृष्णावर दोन तीन वार केल्यामुळे कृष्णा जमीनीवर कोसळला होता. बाबासाहेब वाचविण्यासाठी गेला असता तिघा आरोपी बाबासाहेबच्या दिशेने पळाले, त्यामुळे घाबरुन बाबासाहेबने घराकडे धाव घेत सर्व घटना सांगितली. कृष्णाला उपचारासाठी घाटीत आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. प्रकरणात चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान तिघा आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपींकडून गुन्ह्यात वापरेली कुऱ्हाड  जप्त करणे आहे. गुन्हयात आरोपींना कोणी प्रोत्साहन दिले, आरोपीचे आणखी कोणी साथीदार आहेत का याचा तपास करणे असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने वरील प्रमाणे आदेश दिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *