बँकेच्या व्यवस्थापकाला लुटल्याप्रकरणी एका आरोपीला अटक

औरंगाबाद:
मुंबईतील एसबीआय बँकेच्या व्यवस्थापकाला बीडबायपासवर लुटल्याप्रकरणी पोलिसांनी आणखी एका आरोपीला शुक्रवारी (दि. 5) सायंकाळी पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता सोमवारपर्यंत (दि. 8) पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही.डी. सृगांरे यांनी शनिवारी (दि. 6) दिले. किशोर अंबादास पवार (24, रा. संजयनगर, मुकुंदवाडी) असे आरोपीेचे नाव आहे.
मुंबईतील तुर्भे एमआयडीसी शाखेत व्यवस्थापक असलेले प्रशांत सुरेश शिरभाते (३५, रा. नेरुळ, नवी मुंबई) हे २३ मे रोजी दुपारी चारच्या सुमारास पत्नी प्राची व मुलगी श्रीजा असे तिघे कारने (एमएच-२७-बीव्ही-२५५५) नागपूरच्या दिशेने निघाले. रात्री पावणेअकराच्या सुमारास शिरभाते बीडबायपासवरुन जात असताना मुलगी श्रीजा हिला उलटी झाली. म्हणून त्यांनी राम मंदिरापासून थोड्या अंतरावर कार थांबविली. तेवढ्यात तीन लुटारु कारजवळ आले. त्यांनी शिरभाते यांच्या हातातील कारची चावी हिसकावून घेतली. त्यानंतर पैसे मागत अचानक मारहाणीला सुरूवात केली. याप्रकारामुळे शिरभाते यांच्या पत्नी प्राची प्रचंड घाबरुन गेल्या. त्यांनी लगेचच पर्समधील बारा हजार रुपयांची रोकड या लुटारुंना दिली. याचवेळी लुटारुंना प्राची यांच्या हातात चार ग्रॅमची अंगठी आणि पर्समध्ये चार तोळ्याच्या सोन्याच्या पाटल्या दिसल्यामुळे त्यांनी त्या देखील बळजबरी हिसकावून घेतल्या. त्यानंतर शिरभाते यांना कारची चावी दिली. प्रकरणात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान प्रकरणात यापूर्वी पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली असुन त्यांनी आरोपी किशोर पवार याच्या साथीने चोरी केल्याची कबुली पोलिसांना दिली होती. त्यानुसार पोलिसांनी आरोपीला अटक केली. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले असता आरोपीकडुन गुन्ह्यातील उर्वरित ऐवज हस्तगत करणे असल्याने आरोपीला पोलिस कोठडी देण्याची विनंती सहाय्यक सरकारी वकील सुनिल जोंधळे यांनी न्यायालयाकडे केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *