औरंगाबाद जिल्हयातील दहावी, बारावी वगळता इतर वर्ग 20 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे जिल्हाधिकारी यांचे आदेश

पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग पुर्वीप्रमाणे ऑनलाईन व दुरस्थ पध्दतीने सुरु राहणार

औरंगाबाद, दि. 04 : कोविड-19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थिीचा विचार करता जिल्हयातील (महानगर पालिका क्षेत्र वगळुन) ग्रामीण भागातील इ.10 वी व इ.12 वीचे वर्ग वगळून 20 मार्चपर्यंत सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमाच्या शाळा बंद करण्यात येत आहेत, असे आदेश प्र.जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे यांनी दिले आहेत.पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग पुर्वीप्रमाणे ऑनलाईन व दुरस्थ पध्दतीने सुरु ठेवण्यात येत आहे. इ.10 वी व इ.12 वी चे वर्ग नियमित सुरु ठेऊन सदरील विद्यार्थ्याची दररोज थर्मल गन व ऑक्सिमीटर द्वारे तपासणी करुन त्याची विद्यार्थीनिहाय नोंद ठेवण्यात यावी. सर्व शिक्षकांनी दर आठवडयाला RT-PCR चाचणी करणे बंधनकारक राहील. जर एखाद्या शाळेत, महाविद्यालयात शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी अथवा विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास सदर शाळा, महाविद्यालय किमान चार दिवसांसाठी बंद ठेवण्यात यावे. सर्व शिक्षकांची RT-PCR चाचणी करण्यात यावी व अहवाल प्राप्त होत नाही तोपर्यंत शाळा सुरु करण्यात येऊ नयेत.इ.10 व इ.12 वी च्या वर्गावरील अध्यापन करणारे शिक्षक वगळुन इतर वर्गावरील शिक्षकांची 50% उपस्थिती अनिवार्य राहील. इ.10 व इ.12 वी चे वर्ग नियमित सुरु असल्याने संदर्भिय शासन परिपत्रकामधील सुचनांचे काटेकोरपणे पालन करणे अनिवार्य राहील. 100% शिक्षकांच्या उपस्थितीचा अनावश्यक आग्रह शाळा व्यवस्थापनाने करु नये. 10 वी, 12 वीच्या विद्यार्थ्याना व शिक्षकांना मास्क परिधान केल्याशिवाय शाळेत प्रवेश देण्यात येऊ नये. तसेच हात धुणे, सामाजिक अंतर राखणे आणि शाळा इमारतींचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य राहीलया आदेशाचे काटेकोरपणे पालन करण्यात यावे. या आदेशाचे पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्‍यास संबंधितावर आपत्‍ती व्‍यवस्‍थापन कायदा 2005 चे कलम 51 व 56 अन्‍वये कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असेही डॉ.गव्हाणे यांनी आदेशात नमूद केले आहे.