आरोग्य परीक्षेत हेराफेरी, सहाही आरोपींच्या कोठडीत वाढ

औरंगाबाद / प्रतिनिधी
सार्वजनिक आरोग्य खात्याकडून घेण्यात येणार्‍या परीक्षेत हेराफेरी केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सहाही आरोपींच्या कोठडीत शनिवार दि.6 मार्चपर्यंत वाढ करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी गुरुवारी दि.4 दिले.
मदन बहुरे, राहुल बहुरे, फुल बेग, रमेश बमनावत, संतोष रगडे आणि स्वप्नील बाहेकर अशी आरोपींची नावे आहेत.
गेवराई तांडा येथील धनश्री महाविद्यालयात सकाळी परीक्षा सुरू असताना केंद्रापासून काही अंतरावर चार जण टी-शर्टवर संशयीतरित्या असून ते केंद्रात परीक्षेसाठी बसलेल्या उमेदवारांना पेपर सोडविण्यासाठी मदत करित असल्याची माहिती चिकलठाणा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांना मिळाली. त्यावरुन पोलिसांनी छापा मारुन वरील सहा आरोपींच्या मुसक्या आवळल्या. तर गुन्हा उघडकीस आल्यापासून उत्तर पुरविणारा पवन कवाळे (रा. नेहालसिंगवाडी ता. अंबड जि. जालना) हा पसार आहे. प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सहाही आरोपींची पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील निता किर्तीकर यांनी गुन्ह्यात आरोपींना इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस व इतर साहित्य कोणी पुरवले याचा तपास करणे आहे. आरोपींच्या पसार साथीदारांना अटक करणे बाकी असल्याने आरोपींच्या कोठडीत वाढ करण्याची विनंती न्यायालयाकडे केली.