पालिकेच्या पथकाला मारहाण:आरोपी माजी आमदार किशनचंद तनवाणी पसार

माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी आणि व्यापारी अतिष जोजारे या दोघांना मंगळवार दि.2 मार्च रोजी पहाटे अटक

औरंगाबाद / प्रतिनिधी
विना मास्क फिरणार्‍यांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकाला मारहाण केल्याप्रकरणी क्रांतीचौक पोलिसांनी माजी नगरसेवक सुरेंद्र कुलकर्णी (56, रा. उल्कानगरी) आणि व्यापारी अतिष भगवानराव जोजारे (40, रा. दिवाणदेवडी) या दोघांना मंगळवार दि.2 मार्च रोजी पहाटे अटक केली. दोघांना गुरुवार दि.4 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश मुख्य न्यायदंडाधिकारी मंगला एम. मोटे यांनी दिले. विशेष म्हणजे गुन्ह्यातील आरोपी माजी आमदार किशनचंद तनवाणी हे पसार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.
प्रकरणात देविदास लक्ष्मणराव सुसर (42, रा. गोपाल नगर, पडेगाव) यांनी फिर्याद दिली. त्यानूसार, सुसर हे महापालिका अंतर्गत माज सैनिकाचे नागरिक मीत्र पथक या पथकात मानधनावर काम करतात. 1 मार्च रोजी गुलमंडीवर परिसरात सुसर हे पथकातील आबाराव साळुंके आणि आत्माराम गवळी यांच्यासह मास्क न लावणार्‍या नागरिकांवर कारवाई करत होते.  सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास, मॅचवेल दुकनासमोर कारवाई करित असतांना तेथे किशनचंद तनवानी, सुरेंद्र कुलकर्णी आणि अतिष जोजारे असे तिघे आले. त्यांनी पथकाला तुम्ही येथे कारवाई करु नका तात्काळ निघून जा असे बजावले. त्यावर सुसर यांनी ठीक आहे म्हणज काढता पाय घेतला असता तनवानी यांनी भोंबेसाहेबांना फोन लावू का अशी विचारणा केली असता सुसर यांनी लावा म्हणून सांगितले. त्यनंतर सुरेंद्र कुलकर्णी आणि जोजारे या दोघांनी तोंडी लागतो का म्हणत सुसरे यांच्यासह साळुंके व गवळी यांना शिवीगाळ करुन लाथा बुक्यांनी मारहाण केली. प्रकरणात क्रांतीचौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
दोघा आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहायक सरकारी वकील अशोक सोनवणे यांनी अटक करण्यात आलेल्या दोघा आरोपींवर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत. गुन्ह्यातील पसार आरोपी किशनचंद तनवानी याचा शोध घेवून त्याला अटक करणे आहे. गुन्हा राजकीय फायद‍्याच्या उद्देशाने केला आहे का, गुन्हा करण्यामागे नेमका हेतू काय याचा तपास करणे आहे. तसेच आरोपींना पोलीस कोठडी न मिळाल्यास आरोपी पुन्हा अशा प्रकारचा गुन्हा करण्याची शक्यता असल्याने आरोपींना पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली. विनंती मान्य करुन न्यायालयाने दोघा आरोपींना गुरुवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.