कोवीड-19 च्या संसर्गापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी शासन सज्ज
औरंगाबाद,दि.६,(जिमाका)- कोवीड-१९ च्या संसर्गापासून जनतेला सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्रात वेळेत सर्व उपाययोजना युद्धपातळीवर राबवण्यास सुरवात करण्यात आली असून या विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन,प्रशासन सर्वतोपरी सज्ज असल्याचे प्रतिपादन राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी आज येथे केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री.देशमुख बोलत होते . जिल्ह्यातील कोवीड १९ च्या संसर्गाबाबत करण्यात येत असलेल्या उपाययोजनांच्या आढावा बैठकीनंतर श्री.देशमुख यांनी पत्रकारांसोबत संवाद साधला.
औरंगाबाद जिल्हयात ग्रामीण स्तरापर्यंत योग्य पद्धतीने कोवीड बाबत जनजागृती तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्हा ,स्थानिक प्रशासन, आरोग्य यंत्रणेमार्फत राबवण्यात येत आहे. जिल्ह्यात अनेक आघाड्यांवर कोवीड संसर्ग रोखण्यासाठी समाधानकारक काम सुरु आहे. शहरी भागात महानगर पालिकेमार्फत आयसीएमआरच्या मार्गदर्शक सुचनांनुसार योग्य पद्धतीने काम सुरु आहे. तसेच राज्याचे उद्योगमंत्री तथा औरंगाबादचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या नेतृत्वात औद्योगिक वसाहतीत दोनशे खाटांचे विशेष रुग्णालय तयार होत असून जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेमार्फत जनतेला आरोग्य सुविधा देण्यासाठी एक अधिकचे रुग्णालय यामुळे उपल्बध होत असल्याचे, श्री. देशमुख म्हणाले.

सर्व स्तरावर शासन कोवीड- १९ चा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना राबवत आहे. आज देशात सर्वाधिक चाचण्या महाराष्ट्रात होत आहे. कमी कालावधीत आपण राज्यात ८५ चाचणी केंद्रे सुरु केले असून लवकरच चाचणी केंद्राची संख्या शंभरवर पोहचेल,असे सांगून श्री.देशमुख म्हणाले, या आरोग्य आपत्तीत सर्वात महत्वाचे आहे ते वेळेत योग्य उपचार मिळणे. त्यादृष्टीने सर्व आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर राज्य शासनाने भर दिला असून शासकीय रुग्णालयांसोबत खाजगी रुग्णालय, आरोग्य संस्था, तज्ञ यांच्यासोबत सामंजस्य करार करुन त्यांचे सहकार्य देखील कोरोनाच्या संसर्गाचा वाढता धोका वेळीच रोखण्यासाठी घेण्यात येत आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे सर्व उपचार, चाचण्या या शासकीय रुग्णालयात मोफत करण्याचे राज्य शासनाने सुरवातीलाच ठरवले, त्यानुसार सर्वत्र या उपचारांसाठी कुठल्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. तसेच इतर खाजगी रुग्णालायंतही कोरोना रुग्णांस उपचार देणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यासाठी शासनाने दरनिश्चित करुन दिले आहेत. तर आता महात्मा फुले जीवन आरोग्य योजनेची व्याप्ती वाढवण्यात आली असून त्यात आता सर्वांचा समावेश करण्यात आला आहे. आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर्स, नर्सेस, आशा सेविका व इतर सर्व संबंधित यांच्या जीवीत, आर्थिक सुरक्षेला प्रथम प्राधान्य आहे. आपत्तीच्या काळात जनसामान्यांच्या पाठिशी उभे राहण्याचं उत्तम उदाहरण या संकटात शासनाने लोकांसमोर ठेवले आहे. जनतेने आपल्या जीवीताचे संरक्षण करण्यासाठी योग्य ती खबरदारी घेत मास्क, सॅनिटायजर, सोशल डिस्टंन्सिंग या नियमांचे पालन करुन शासन-प्रशासनाच्या प्रयत्नां सहकार्य करावे. मधुमेह, रक्तदाब, ह्दयरोग या आजाराची पार्श्वभूमी असलेल्या रुग्णांत तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये हा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे, अशा सर्वांनी आरोग्याला जपत नियमांचे पालन करावे. खाजगी डॉक्टर्सनी या लढ्यात सहभागी होत रुग्ण सेवा सुरु करावी. सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांतून आपल्यालाही ही कोवीड-१९ ची लढाई जिंकायची आहे, त्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन श्री.देशमुख यांनी यावेळी केले.
शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या अडचणी लवकरच सोडवणार
औरंगाबाद, दि. 06 : औरंगाबादच्या शासकीय कर्करोग रुग्णालयास वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी आज भेट देऊन येथील अडचणी जाणून घेतल्या. त्या लवकर सोडविण्यात येतील, अशी ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली. याप्रसंगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) व शासकीय कर्करोग रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर यांनी कर्करोग रुग्णालयाविषयी सविस्तर माहिती दिली. कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्याधिकारी डॉ.अरविंद गायकवाड , सर्जिकल ऑन्कोलॉजी विभागप्रमुख डॉ.अनघा वरुडकर, किरणोपचार विभागप्रमख डॉ.बालाजी शेवाळकर, डॉ.अदिती लिंगायत, डॉ.वर्षा देशमुख, डॉ.हेमंत कोकांडकर, डॉ.अमित पाटील, डॉ.संगिता पाटील, डॉ.अजय बोराळकर, डॉ.मुक्ता खापरखुंटीकर, परिचारिका श्रीमती कांता खांडेभराड, श्रीमती अनुराधा कुळकर्णी यांच्यासह विविध विभागाचे अध्यापक, परिचारिका, तृतीय व चतुर्थश्रेणी कर्मचारी आदी यावेळी उपस्थित होते.