जगातील सर्वात मोठे मोटेरा स्टेडियम नववधू प्रमाणे सजले

अहमदाबाद,दि. 23 : संपूर्ण अहमदाबाद शहर क्रिकेटच्या विविध छटांनी  रंगलेले दिसत आहे. क्रिकेटचा ज्वर शिगेला पोहचला असून अव्वल क्रिकेटपटू जवळपास एक महिना या शहरात राहणार आहेत. दुसरी कसोटी जिंकल्यानंतर क्रिकेटचा आनंद गगनाला भिडला असून इंग्लंडविरुद्ध आणखी एका शानदार विजयाची लोक आतुरतेने वाट पाहत आहेत. जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन हे आणखी एक आकर्षण आहे.  राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या हस्ते मोटेरा स्टेडियमच्या उद्घाटनासाठी विशेष व्यवस्था केली आहे. राष्ट्रपती राम नाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौर्‍यावर आहेत. आज गांधीनगरमधील गुजरात केंद्रीय विद्यापीठाच्या  तिसर्‍या पदवीदान समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर ते उद्या दिवस रात्र खेळल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यापूर्वी मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे उद्घाटन करतील. यासाठी  स्टेडियमजवळ एक विशेष डोम उभारण्यात आला आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री  किरेन  रिजिजू, राज्यपाल आचार्य देवव्रत आणि इतर मान्यवरांच्या उपस्थितीत नवीन स्पोर्ट्स एन्क्लेव्हचा शिलान्यासही करण्यात येईल. डोमच्या ठिकाणाहून राष्ट्रपती या मोटेरा क्रिकेट स्टेडियमचे व्हर्चुअल उदघाटन करतील.