सान्या सामर्थ्य प्रिमियर क्रिकेट लीग साई ॲडव्होकेटस् विजेता 

अंतिम सामन्यात रेयॉन सामर्थ्य वॉरिअर्सचा ७९ धावांनी पराभव

औरंगाबाद, ता. २१ : ‘सान्या सामर्थ्य प्रिमियर लीग’मध्ये ‘रेयॉन सामर्थ्य वॉरिअर्स’ विरुद्धच्या अंतिम सामन्यात साई ॲडव्होकेटस् डॉमिनेटर्स संघाने ७९ धावांनी विजय मिळवत ‘एसपीएल-३’ वर मोहोर उमटवली. ५८ चेंडूत १०२ धावा करणारे अजय शितोळे सामनावीराचे मानकरी ठरले. एमजीएमच्या क्रिकेट मैदानावर रविवारी (ता. २१) स्पर्धेतील अंतिम सामना झाला.


स्पर्धेचे हे तिसरे वर्ष होते. सात दिवसांपासून साखळी आणि उपांत्य सामने याठिकाणी झाले. अंतिम सामना रविवारी खेळवण्यात आला. प्रथम फलंदाजी करताना साई ॲडव्होकेटस् डॉमिनेटर्स संघाने २० षटकात चार बाद २०४ धावा केल्या होत्या. अजय शितोळे यांनी १०२ धावांची वादळी खेळी केली. मात्र, बाहेर जाणारा चेंडू खेळताना ते झेलबाद झाले. ज्ञानेश्‍वर पाटील यांनी २३ चेंडूत ५५ धावांची नाबाद खेळी केली. प्रत्युत्तरात डॉ. अमित राजळे यांनी २९ धावा, अतिश जोगदंड (१७) तसेच बालाजी पाटील (२८) आणि गिरीष (१२) यांनी नाबाद खेळी केली. पण संघ निर्धारित षटकात आठ बाद १२५ धावसंख्येपर्यंत पोहचला. जगदीश घनवट यांनी तीन तर जगदीश बनसोड यांनी दोन गडी बाद केले.


स्पर्धेतील सहा सामन्यात २२६ धावा करणारे अजय शितोळे सर्वोत्कृष्ट फलंदाज ठरले.

११ गडी बाद करणारे जगदीश घनवट सर्वोत्कृष्ट गोलंदाज, राहुल घोगरे यांनी १३ गडी बाद केल्याने सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षक ठरले. या स्पर्धेत १८ सामने खेळवण्यात आले. यात ३२१६ चेंडूत, ४२५० धावा, २२८ गडी बाद, ३०६ अतिरिक्त धावा, ३७१ चौकार, १०९ षटकार, ११ अर्धशतके, दोन शतके, १२३७ निर्धाव चेंडू तर ८० झेल पकडण्यात आले.


विजेत्या, उपविजेत्या संघाला रोख पारितोषिक आणि चषक देण्यात आले. उद्योजक सचिन मुळे, अजीत मुळे, श्रीराम शिंदे, डॉ. प्रविण सुर्यवंशी, सुनिल किर्दक, श्रीधर नवघरे, डॉ. गिरीष गाडेकर, आशिष गाडेकर, कुंदन देशमुख, नारायण पवार, वैभव धोंडे, रोहित नाईकवाड, संग्राम पठारे, गिरीश उबाळे, दुष्यंत पाटील, किरण जगताप, राजेंद्र मगर, राहुल घोगरे, अभिषेक शेळके यांची उपस्थिती होती.