कोरोना प्रतिबंध:पुणे जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये २८ फेब्रुवारीपर्यंत बंद

पुणे जिल्ह्यातील कोरोना प्रादुर्भाव परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला आढावा

पुणे, दि. 21 : पुणे जिल्ह्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालये 28 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्यात येतील. रात्री 11 ते सकाळी 6 या वेळेत नियंत्रित संचार राहिल, याची अंमलबजावणी करा. गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न समारंभ होतील, याची दक्षता घ्या, असे निर्देश देऊन कोरोना प्रतिबंधासाठी जिल्ह्यात सोमवार दिनांक 22 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासून या नियमांची कडक अंमलबजावणी करण्याचे स्पष्ट निर्देश उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.

Image

पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी व वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत कोरोना परिस्थिती उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला कामगारमंत्री दिलीप वळसे-पाटील, सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे (दूरदृश्य प्रणालीद्वारे), खासदार गिरीश बापट, खासदार श्रीरंग बारणे, खासदार वंदना चव्हाण, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, पिंपरी चिंचवडच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, जिल्हा परिषद अध्यक्ष निर्मला पानसरे, जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी तसेच विभागीय आयुक्त सौरभ राव, पुणे महापालिका आयुक्त विक्रमकुमार, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त राजेश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास दिवसे, पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख,  जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, आरोग्य विभागाचे निवृत्त महासंचालक डॉ. सुभाष साळुंके, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मुरलीधर तांबे, डॉ.डी. बी.कदम आदींसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

———————————————————————————————————————————————————–

ठळक मुद्दे
  • जिल्ह्यात लॉक डाऊन नाही; मात्र नियमांची कडक अंमलबजावणी
  • 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम
  • रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी (अत्यावश्यक सेवा- वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे वगळून)
  • हॉटस्पॉट भागावर अधिक लक्ष केंद्रित करा
  • मायक्रो कंटेन्मेंट झोन तयार करुन उपाययोजना प्रभावीपणे राबवा
  • जिल्ह्यात कोविड केअर सेंटर सुरु करा
  • नमुना तपासण्यांची संख्या वाढवा
  • मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा
  • नियम पाळून नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

————————————————————————————————————————————————————-

कोरोना विषाणूची सद्यस्थिती व प्रशासनाच्या वतीने करण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत, तसेच लसीकरणाबाबत उपमुख्यमंत्री श्री. पवार यांनी बैठकीत माहिती जाणून घेतली. त्याचबरोबर आवश्यक ते उपाय सुचवून त्यांची तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवणे गरजेचे आहे. यासाठी नियमांची कडक अंमलबजावणी करा. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याकरिता सूक्ष्म नियोजन करा. शहर व ग्रामीण भागात हॉटस्पॉटनिहाय अधिकाऱ्यांवर जबाबदारी सोपवा. सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्रात प्रभावी उपाययोजना राबवा. संपर्क शोध मोहीम (कॉन्टॅक्ट ट्रेसिंग) अधिक प्रभावीपणे राबवा. शासकीय आणि खाजगी प्रयोगशाळांमध्ये पूर्ण क्षमतेचा वापर करुन नमुना तपासण्या वाढवा. आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत गृहभेटीद्वारे सुपर स्प्रेडर व सारी रुग्णांचे सर्वेक्षण करा, असे सांगून कोरोना रुग्णांवर वेळेत उपचार होऊन संसर्ग रोखण्यात खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी त्यांनी फ्लू सदृश रुग्णांची तपासणी करुन घ्यावी, असेही सांगितले.

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी नागरिकांनी गर्दीत जाणे टाळणे, सामाजिक अंतर पाळणे, मास्क, सॅनिटायझरचा वापर आदी प्रशासनाने घालून दिलेल्या सूचनांचे पालन करणे गरजेचे आहे, असे सांगून उपमुख्यमंत्री श्री. पवार म्हणाले, 200 व्यक्तींच्या मर्यादेत लग्न, कौटुंबिक व राजकीय कार्यक्रम होतील याची दक्षता घ्या. जिल्ह्यातील सर्व शाळा महाविद्यालये २८ फेब्रुवारी पर्यंत बंद ठेवावीत. मात्र अभ्यासिका निम्या क्षमतेने नियम पाळून सुरू राहतील याची खात्री करा. हॉटेल, बार रात्री ११ पर्यंतच सुरु राहतील याची दक्षता घ्या, असे सांगून रात्री 11 ते सकाळी 6 दरम्यान नियंत्रित संचाराची अंमलबजावणी करा. वृत्तपत्र, दूध, भाजीपाला, फळे, औषधे या अत्यावश्यक सेवांना सूट द्या. जिल्ह्यात सर्वत्र कोविड केअर सेंटर तात्काळ सुरु करा. मास्क न वापरणाऱ्या व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या. आरोग्य व्यवस्था सक्षम होण्याच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना गतीने करा, असे सांगून ससून रुग्णालयाला आवश्यक मनुष्यबळ व यंत्र सामुग्री पुरविण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

कामगारमंत्री दिलीप वळसे- पाटील म्हणाले, शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील कोरोना नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात. त्याचबरोबर ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्था सक्षम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी सांगितले.

महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले, कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढतच आहे, अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयांबरोबरच खासगी रुग्णालयांचेही सहकार्य आवश्यक आहे.

खासदार गिरीश बापट म्हणाले, कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य विभागाने सूक्ष्म नियोजन करुन रुग्णांना वेळेत सेवा-सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात.

डॉ. सुभाष साळुंके यांनी कोविड नियंत्रणासाठी आवश्यक असणाऱ्या उपाययोजनांबाबत माहिती दिली.

विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीची माहिती दिली. जुन्या हॉटस्पॉट भागात कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण वाढत आहे. 25 सप्टेंबर 2020 ते 31 जानेवारी 2021 पर्यंत कोरोनाचा रुग्ण दर नियंत्रणात होता. तथापि, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यापासून कोरोना बाधित रुग्णांची टक्केवारी वाढून दहा टक्क्यांवर गेली आहे. प्रशासनाच्या वतीने प्रभावी उपाययोजना करण्यात येत आहेत, पण नागरिकांनीही नियमांचे पालन करुन प्रशासनाला सहकार्य करणे गरजेचे आहे.

जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी ग्रामीण भागातील कोविड-19 ची सद्यस्थितीची माहिती देऊन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.