कोरोनाविषयक सर्व उपायोजना राबवून साहित्य संमेलन यशस्वी करणार

साहित्यप्रेमी व नागरिकांना सहकार्य करण्याचे नाशिकचे पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांचे आवाहन

नाशिक दि. 21: साहित्य संमेलनाचे आयोजन करताना कोरोनाविषयक सर्व उपाययोजना करण्यात येणार आहेत. यासाठी महानगरपालिका व शासनाच्या आरोग्य विभागाचे सहकार्य घेण्यात येणार आहे. तसेच नाशिकमध्ये होणारे 94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी सर्व साहित्यप्रेमी व नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री व संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी केले.

भुजबळ फार्म येथे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांचेसमवेत आढावा बैठकिनंतर पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील, लोकहितवादी मंडळाचे विश्वस्त व माजी आमदार हेमंत टकले, माजी खासदार तथा संमेलन समन्वय समीर भुजबळ, संमेलनाचे मुख्‍य समन्वयक विश्वास ठाकूर, मुकुंद कुलकर्णी,शंकर बोऱ्हाडे, दादा गोरे, पुंडलिक अटकरे, रामचंद्र कांळुखे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. भुजबळ म्हणाले, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता संमेलनात कोरोनाविषयक सर्व काळजी घेण्यात येणार आहे. यासाठी महानगरपालिका व आरोग्य विभागाच्या सहकार्याने संमेलनस्थळी सॅनिटायझरची फवारणी करण्यात येणार आहे. येणाऱ्या प्रतिनिधींची आवश्यक असल्यास कोरोना चाचणी देखील करण्यात येणार असून यासाठी दातार लॅबचे सहकार्य घेण्यात येणार आहे. कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करण्यात येणार आहे. संमेलनाचे काम सुलभ व समन्वयाने व्हावे यासाठी 39 समित्यांद्वारे कामांची वाटणी करण्यात आली असल्याचे, श्री. भुजबळ यांनी सांगितले.

संमेलनाचे अध्यक्ष जयंत नारळीकर यांना प्रत्यक्ष निमंत्रण दिले आहे. तसेच मावळते अध्यक्ष फादर दिब्रेटो यांनाही मनोहर शहाणे यांनीही भेटून निमंत्रण दिले आहे. संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ शास्त्रज्ञ, विज्ञान कथालेखक जयंत नारळीकर असल्याने प्रकाशित करण्यात येणाऱ्या स्मरणिकेत गेल्या शंभर वर्षातील विज्ञान साहित्याचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच ज्या लेखकांना आपली पुस्तके व ग्रंथ संमेलनात मान्यवरांच्या हस्ते प्रकाशित करावयाची आहेत, अशासाठी प्रकाशन मंचाची स्थापना करण्यात येणार आहे. आजपर्यंत अकरा व्यक्तींनी पुस्तक प्रकाशनासाठी आपली पत्रे दिली असल्याची माहिती, पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी दिली.

ग्रंथ प्रदर्शन  आणि प्रकाशन महामंडळाच्या समितीच्यावतीने जीएसटीसह 6 हजार 500 इतके शुल्क घेण्याचे ठरविण्यात आले आहे. या निर्णयाला स्टॉल धारकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून आत्तापर्यंत 110 स्टॉलची नोंदणी झाली असून संमेलनात एकूण 400 स्टॉल उभारण्यात येणार असल्याचे , पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

असा असणार ग्रंथदिंडीचा मार्ग

26 मार्च रोजी सकाळी कवी कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाहून मुख्य ग्रंथदिंडी निघणार आहे.  या ग्रंथदिंडीला नाशिकरोड, सिडको, सातपूर, मखमलाबाद, पंचवटी आदी ठिकाणाहून येणाऱ्या दिंड्या डोंगरे वसतिगृहाच्या मैदानावर एकत्र येतील. त्यानंतर सर्व ग्रंथदिंड्या संमेलनस्थळी येणार असल्याचे श्री. भुजबळ यांनी सांगितले.