सान्या सामर्थ्य प्रिमियर लीग:रेयॉन, साई ॲडव्होकेटस् यांच्यात अंतिम सामना 

उपांत्य सामन्यात एएसआर इंडस्ट्री, आरके वॉरिअर्सचा पराभव 

औरंगाबाद, दिनांक 20 :​ सान्या सामर्थ्य प्रिमियर लीग ​’मध्ये शनिवारी उपांत्य सामन्यात एएसआर इंडस्ट्री विरुद्ध रेयॉन सामर्थ्य वॉरिअर्स संघाने पाच गडी राखून तर, आर.के. वॉरिअर्स विरुद्ध साई ॲडव्होकेटस् डॉमिनेटर्स संघाने ५२ धावांनी विजय मिळवला. आशिष गाडेकर, निखील घनवट यांनी सामनावीराचा बहुमान पटकावला. रेयॉन आणि साई संघांनी अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. रविवारी सकाळी नऊ वाजता अंतिम सामना होणार आहे. 


एमजीएमच्या क्रिकेट मैदानात स्पर्धा सुरू आहे. एएसआर इंडस्ट्रीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात सहा बाद १३८ धावा काढल्या. यात सलामीवीर गजानन भानुसे यांनी ४५ चेंडूत ४९ धावा केल्या. विजय हंडोरे (३७), संदीप खोसरे (२०) यांनी साथ दिली. रेयॉन सामर्थ्य वॉरिअर्सच्या आशिष गाडेकर आणि विशाल सोनवणे यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. प्रत्युत्तरात फलंदाजी करताना डॉ. अमित राजळे यांनी ५२ चेंडूत ६७ तर, आशिष गाडेकर यांनी ४५ चेंडूत ४७ धावा काढल्या. १८ षटकातच १३९ धावा करत अंतिम फेरी गाठली. 


दुसऱ्या सामन्यात आरके वॉरिअर्स विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना साई ॲडव्होकेटस् डॉमिनेटर्स संघाने २० षटकात चार बाद १९० धावा काढल्या. सलामीवीर अजय शितोळे यांनी ३९ चेंडूत ६४ धावा काढल्या. मनोज शिंदे यांनी नाबाद ३८ धावा, निखील घनवट (२६), अमोल काकडे (२७), ज्ञानेश्‍वर पाटील (१८), संदीप देगावकर यांनी नाबाद ११ धावा काढल्या. प्रत्युत्तरात आरके वॉरिअर्सचा संघ १३८ मध्येच सर्वबाद झाला.

शशांक चव्हाण (४० धावा), संतोष तुपे (२३), गोपाल सुर्यवंशी (२०), दिनेश कुंटे (१६), जे. एस. कदम (१५) यांनी विजयासाठी प्रयत्न केले. मात्र, जगदीश घनवट यांनी चार आणि मनोज शिंदे यांनी तीन गडी बाद करत सहज विजय मिळवला.