डिझेल चाेरी प्रकरणातील आराेपींना २६ पर्यंत पाेलीस काेठडी

औरंगाबाद/प्रतिनिधी

पेट्राेलपंपावरून डिझेल चाेरी करणाऱ्या आंतरराज्यीय टाेळीतील १४ जणांना २६ फेब्रुवारीपर्यंत पाेलीस काेठडीत ठेवण्याचे आदेश  प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. एम. कादरी यांनी शनिवारी दिले. सहायक सरकारी वकील झरिना दुर्राणी यांनी आराेपींकडून केलेल्या आणखी काही गुन्ह्यांची माहिती समाेर येण्यासाठी पाेलीस काेठडी देण्याची विनंती केली हाेती.
पेट्रोल पंपावरुन डिझेल चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या आहेत. कन्नड तालुक्यातील शिवराई राष्ट्रीय महामार्ग क्र. 52 यावरील नवीन टोलनाका व झाल्टा फाटा येथे सापळा रचून 14 जणांना स्थानिक गुन्हेशाखेने अटक केली. त्यांच्याकडून तब्बल 98 लाख 49 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे टोळी विरोधात महाराष्ट्र, कर्नाटक आणि गुजरात राज्यात डिझेल चोरीचे एकूण 56 गुन्हे दाखल  आहेत. 
17 फेब्रुवारी रोजी प्रदीप प्रल्हाद राठोड (40) यांच्या पेट्रोल पंपावरून चोरट्यांनी तीन लाख 45 हजार रुपयांचे तीन हजार 480 लीटर डिझेल चोरुन नेले. प्रकरणात चिकलठाणा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हयाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने घटनास्थळास भेट देत घटनास्थळाची पाहणी केली. तपास सुरु असतांना तांत्रीक विश्लेषना आधारे स्थानिक गुन्हे शाखेला माहिती मिळाली की, हा गुन्हा तारखेडातील लक्ष्मीपेढी (ता.वाशी जि. उस्मानाबाद) येथील रेकॉर्डवरील गुन्हेगार नामे रामा पान्या पवार व त्याचे साथीदारांनी केला आहे. ही टोळी गुजरात राज्यातील तापी जिल्हयातून वाळू भरुन ती वाळू उस्मानाबाद जिल्हयात विक्री करतात. तसेच रात्रीच्या वेळी वेगवेगळया पेट्रोल पंपावर जाऊन डिझेलच्या टाकीतून प्लास्टीकच्या हातपंपा आधारेे डिझेलची चोरी करुन त्यांच्या जवळील वाळू वाहतूकीच्या ट्रकमध्ये टाकतात. व उरलेले डिझेल हे त्यांचे ओळखीच्या ट्रक चालक व मालक यांना स्वस्त दरात विक्री करतात.
माहिती आधारे स्थानिक गुन्हे शाखेने कन्नड तालूक्यातील शिवराई राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 52 वरील नवीन टोलनाक्यावर सापळा रचुन गुजरातकडून वाळू भरुन येणार्‍या गाड्यांची तपासणी केली ट्रक (क्रं. एमएच-04-ईबी-7689), (क्रं. एमएच-12-एचडी-8235) व  (क्रं. एमएच-25-यू-1540) मध्ये अंदाजे 35 ते 40 लिटर क्षमतेच्या डिझेल ने भरलेल्या एकूण 45 कॅन व 40 रिकाम्या कॅन मिळून आल्या. पोलिसांनी ट्रकवरील धनाजी महादेव पोळ (35), रामा सूबराव काळे (30), गुलाब उर्फ गुलच्या गणपु काळे (19), दशरथ लक्ष्मण काळे (19) रामा पन्या पवार (30), उध्दव बापु शिंदे (21), गणेश काळू पवार (23), लक्ष्मण पन्या पवार (40), विकास मचिंद्र काळे (21), राजेंद्र शहाजी काळे (19), नितीन बापु पवार, किरण अर्जुन काळे (सर्व रा. लक्ष्मीपेढी, तेरखेडा ता. वाशी जि. उस्मानाबाद) यांना ताब्यात चौकशी केली असता, डिझेल  चितेगाव शिवारातील पेट्रोल पंपावर चोरी केले असून चोरलेले  काही डिझेल ट्रक मध्ये टाकल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या डिझेल मधील काही डिझेल हे ट्रक (क्रं. एमएच-25-एजे-9898) चालक विनोद नानासाहेब बारकुले (27) आणि रोहित दिलीप मोरे (29, दोघे रा. येरमाळा ता. कळम जि. उस्मानाबाद) यांना विक्री करणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानूसार पोलिसांनी झाल्टा फाटा येथून बारकुले आणि मोरे या दोघांना अटक केली.
 * 98 लाखांचा ऐवज जप्‍त
आरोपींच्या ताब्यातून 4 चार ट्रक, 1 हजार 540 लिटर डिझेल, 03 हँडपंप, 42 हजार 700 रोख रक्कम, 8 मोबाईल असा एकुण 98 लाख 49 हजार 420 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.