विनामास्क, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळले तर दंडात्मक कारवाई करा-विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर

कोरोना बाबतच्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी यंत्रणांनी सतर्क राहावे

Displaying DSC_8092.JPG

औरंगाबाद, दि.18, :- कोरोनाबाबत सर्वत्र वाढत चाललेल्या निष्काळजीपणाला आळा घालण्यासाठी पुन्हा एकदा सर्व संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे आणि कोरोना नियंत्रणासाठी लागू असलेल्या नियमावलीची कडक पध्दतीने अंमलबजावणी करावी, असे निर्देश विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिले.

            विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली कोविड-19 टास्क फोर्सची बैठक पार पडली त्यावेळी ते बोलत होते. बैठकीस पोलीस आयुक्त डॉ.निखील गुप्ता, प्रभारी जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, महानगर पालिकेचे आयुक्त अस्तिककुमार पाण्डेय, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) मोक्षदा पाटील, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता डॉ.कानन येळीकर, आरोग्य उपसंचालक  डॉ.स्वप्नील लाळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुंदर कुलकर्णी, उपायुक्त (महसूल) पराग सोमण, उपायुक्त (सा.प्र.) जगदीश मिनीयार, महानगर पालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ.नीता पाडळकर, घाटीच्या डॉ.मीनाक्षी भट्टाचार्य, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.सुधाकर शेळके, आदीसह खाजगी रुग्णालयांचे डॉक्टर्स उपस्थित होते.

            मागील काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याची चिंता व्यक्त करीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी बैठकीत सर्व यंत्रणेचा सविस्तर आढावा घेतला. गर्दीचे ठिकाण, मंगल कार्यालये, कोचिंग क्लासेस, भाजीमंडई, मॉल, आठवडी बाजार, बसस्टँड, रेल्वेस्टेशन या ठिकाणी विशेष लक्ष द्यावे. सर्वत्र मास्क वापरणे बंधनकारक करा. विनामास्क, परवानगीपेक्षा जास्त लोक आढळले तर दंडात्मक कारवाई करा, अशा सूचना श्री.केंद्रेकर यांनी यावेळी दिल्या.

            सर्व संबंधित यंत्रणांनी आपआपसांत समन्वय ठेवण्याची सूचना करताना ते पुढे म्हणाले की, कोरोनाबाबतच्या ज्या समित्या आहेत त्यांच्या नियमितपणे बैठका घ्याव्यात. सर्व यंत्रणां प्रभावीपणे कार्यान्वित करा. आरोग्य विषयक सेवा देणारे मनुष्यबळ, औषधी, ऑक्सिजन आदींची उपलब्धता यांचा सविस्तर आढावा घ्यावा. यासाठी लागणाऱ्या निधीकरीता पाठपुरावा केल्या जाईल. महानगर पालिकेनेही विना मास्क, सुरक्षित अंतर न पाळणाऱ्यांवर कार्यवाही करावी. अडचणी आल्यास जिल्हाधिकारी कार्यालयाचे सहकार्य घ्यावे. कोविड केअर सेंटर, औषधी याचा नियमित आढावा घ्यावा. जिल्हा परिषदेने ग्रामीण भागात गांभीर्याने लक्ष द्यावे,  ग्रामीण रुग्णालय सुसज्ज ठेवावेत. तसेच मास्क वापरणे बंधनकारक करावे. उपविभागीय अधिकारी, तहसिलदार पोलिसांनी नियमित बैठका घेऊन समन्वयाने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रयत्न करावा. औद्योगिक क्षेत्रात कोरोना नियंत्रणाची नियमावली बंधनकारक करावी.  एसटी बसमध्ये प्रवाशांच्या होणाऱ्या गर्दीबाबत बोलताना श्री.केंद्रेकर म्हणाले की, बसमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रवाशांना बसवू नये. मास्कशिवाय बसमध्ये कोणालाच प्रवेश देऊ नये, विनामास्क आढळल्यास किंवा विरोध केल्यास गुन्हा दाखल करावा. तसेच बसस्थानकाच्या परिसरात होर्डिंगद्वारे कोरोनाबाबत जनजागृती करावी. लाऊड स्पीकरद्वारे वेळोवेळी सूचना कराव्यात, असे निर्देश त्यांनी एसटीच्या अधिकाऱ्यांना दिले.

            ऑटोरिक्शात क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवणाऱ्यांवर आरटीओंनी कार्यवाही करण्याची सूचनाही त्यांनी केली. महानगर पालिकेने  बसस्टँड, रेल्वेस्टेशन येथे तपासणी केंद्र सुरूच ठेवावेत, असे सांगतांना कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढवावे, कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिक भर द्यावा, कोविड लसीकरण मोहिमही प्रभावीपणे राबविण्यात यावी. अद्याप अनेक आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली नाही, त्यांनी तात्काळ लस घ्यावी. तसेच फ्रंटलाईनवर काम करणारे कर्मचारी आहेत त्यांनीही लस घ्यावी. जिल्हा प्रशासनाने नियमितपणे जिल्हा कोविड-19 टास्क फोर्सच्या बैठका घ्याव्यात. घाटीने बेड सज्ज ठेवावेत. औषधी, ऑक्सिजन, याची कमतरता भासणार नाही, याची दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालयांनी कोविड व नॉन कोविड असे भाग करुन कोविड रुग्णांसाठी पुरेसे बेड ठेवावेत. तसेच ऑक्सिजन निर्मिती युनिट बसवावे.

            यावेळी विविध विभागाचे अधिकारी, खाजगी डॉक्टर्स यांच्या सोबत श्री.केंद्रेकर यांनी चर्चा करुन करोनाची सद्यस्थिती व त्यावरील कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांचा सविस्तर आढावा घेतला.