शिवजयंतीची मानाची मिरवणूक रद्द,औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीचा निर्णय

औरंगाबाद: जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीच्या माध्यमातून 1970 साला पासून औरंगाबाद शहरात  संस्थान गणपती राजाबाजार येथून मानाची मिरवणूक निघते.  ह्या मिरवणुकीत शहरातील  असंख्य गाड्या, सजीव देखावे, ईतिहासकालीन युद्ध कौशल्य, तलवारबाजी, दांडपट्टा  यांचे प्रदर्शन करीत शिवप्रेमी मोठया संख्येने सहभागी होत असतात. हळूहळू शहर मोठे झाले त्यामुळे त्या-त्या विभागातील शिवप्रेमींना सोयीचे व्हावे  याकरिता विभागनिहाय मिरवुणका सुरू करण्यात आल्या होत्या.      

मागील अनेक महिन्यांपासून सर्वांवर कोरोनाचे संकट आहे त्यामुळे वर्ष भरापासून कुणीही कोणताही सण उत्सव साजरा करू शकले नाहीत. त्यामुळे ही जयंती उत्साहात साजरी करायचीच अशी सर्व शिवप्रेमींची भावना व तयारी होती. त्या अनुषंगाने तयारी देखील करण्यात आली होती. परंतु मागील चार दिवसांपासून राज्यात कोरोनाचे संकट परत गडद होत चालले आहे  व  कमी झालेली संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे शासन सतर्क झाले असून संभाव्य धोका टाळावा म्हणुन मिरवणुका, पोवाडे, व्याख्यान, वाहन रॅली असे काहीही न काढता साध्या पध्दतीने अभिवादन करून शिवजयंती साजरी करावी  असे शासनाने आदेश काढले आहेत.         परंतु मिरवणुक काढायचीच अशी शिवप्रेमींची भावना आहे त्या अनुषंगाने पोलिस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीची बैठक घेतली यावेळी संस्थापक अध्यक्ष पृथ्वीराज भाऊ पवार, समिती अध्यक्ष जगन्नाथ काळे, कार्यध्यक्ष प्रा. मनोज पाटील, संतोष कावले, आनंद वाघ प्रसिद्धी प्रमुख सचिन अंभोरे यांची उपस्थिती होती. 
        राज्यातील कोरोनाची वाढती परिस्थिती पाहता शासनाच्या आदेशाचे व मा. पोलिस आयुक्त यांनी केलेल्या विनंतीचा मान ठेवून दरवर्षी काढण्यात येणारी संस्थान गणपती, राजाबाजार येथून निघणाऱ्या मानाची मिरवणूक रद्द केल्याचे औरंगाबाद जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने केले आहे. तसेच सर्व शिवप्रेमींनी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करत साध्या पद्धतीने शिवजयंती साजरी करावी व सकाळी 9 वाजता क्रांती चौक येथे अभिवादानासाठी यावे असे आवाहन जिल्हा शिवजयंती महोत्सव समितीने केले आहे.