कोवीड- १९ च्या प्रतिबंधासाठी मार्गदर्शक सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्याचे जिल्हाधिकारी यांचे निर्देश

औरंगाबाद दि.१७- राज्यातील कोविड-19 रुग्णामध्ये पुनश्चः वाढ होऊन मृत्युदरात देखील भर पडत आहे.या पार्श्वभूमीवर कोविड-19 नियंत्रणाची कार्यवाही जनतेच्या सहभागातून आवश्यक आहे.यासाठी राज्य शासनाच्‍या सुचनेनुसार औरंगाबाद जिल्ह्यात कोवीड-१९ नियंत्रण व प्रतिबंधक उपाययोजना गांभीर्यपूर्वक व काटेकोरपणे राबविणे करीता आवश्यक सर्व विभागस्तरावरून एकात्मिक पणे कार्यवाही करणे अपेक्षित आहे. याबाबत सर्व खबरदारी व प्रतिबंधक उपाययोजनासाठी शासन स्तरावरून आवश्यक ती उपाययोजना राबविण्याचे आदेश शासनस्‍तरावरुन देण्‍यात आले आहेत.

तसेच विभागीय आयुक्त औरंगाबाद यांनी जिल्‍हयात याबाबत विशेष दक्षता घेऊन सतर्कपणे कार्यवाही करण्याच्या सक्त सूचना दिल्या आहेत. सदर कार्यवाही आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 व साथरोग अधिनियम 1897 कायदा अंतर्गत असल्याने जिल्ह्यात शासनाच्या मार्गदर्शक सूचनांची यशस्वी अंमलबजावणी करण्यासाठी खालील प्रमाणे तात्काळ कार्यवाही करावी असे जिल्हाधिकारी यांनी परिपत्रकाद्वारे निर्देशित केले आहे.

1) महानगरपालिका आयुक्त,उपविभागिय अधिकारी,तहसिलदार,मुख्य अधिकारी(न.प)यांनी त्यांच्या अधिकार क्षेत्रातील सर्व मंगल कार्यालये,कोचिंग क्लासेस,सर्व शाळा विद्यालये,महाविद्यालये ,बँक्वेट हॉल,हॉटेल्स,रेस्टॉरंट,नाट्यगृहे,चित्रपटगृहे,व्यायामशाळा,शॉपिंग मॉल्स,धार्मिकस्थळे,उद्याने,व इतर गर्दी होणारी ठिकाणी यास वेळोवेळी अचानक भेट देऊन तपासणी करावी. जास्त संख्येत लोक उपस्थित असतील,उपस्थित लोकांनी मास्क लावले नसतील, सॅनिटायझरची उचित व्यवस्था नसेल तर त्यांना प्रथम वेळी नोटीस देऊन उचित दंड आकारावा. याबाबत नोटीस देऊनही सुधारणा झाली नाही तर गुन्हा दाखल करण्यात येईल.असा स्पष्ट उल्लेख नोटीस मध्ये करावा. सूचना देऊनही अशीच परिस्थिती राहिली तर संबंधित आस्‍थापनांवर गुन्हा दाखल करणे किंवा 15 दिवसाची सील करण्याची कार्यवाही करावी.

2) भाजी मंडई,सर्व दुकानदार,अशा लोकांच्या ठराविक अंतराने नियामित कोरोना चाचण्या करण्यात याव्यात.

3) सर्व राजकीय पक्षांना राजकीय कार्यक्रम मेळावे घेताना शासनाने ठरवून दिलेल्या (SOP)प्रमाणेच कार्यवाही करणे बंधनकारक असेल.

4) सार्वजनिक ठिकाणी मास्क न लावल्यास त्याव्यक्तीस रु.500/-(रुपये पाचशे) दंड आकारावा. ज्या परिसरात कोरोनाचा रुग्ण सापडला असेल त्या ठिकाणी मायक्रोसिलिंग करावे. रुग्णाच्या कुटूंबातील रहिवास असलेल्‍या सर्वांची कोविड-19 तपासणी करण्याबाबत अनिवार्य करावे.

5) आपत्ती व्यवस्थापन,मदत व पुनर्वसन, मंत्रालय मुंबई, जागतिक आरोग्य संघटना(WHO) केंद्र व राज्‍य शासनाच्या आरोग्य विभागा मार्फत वेळोवेळी निर्गमित होणा-या मार्गदर्शक सूचनाचे पालन करावे.

6) जिल्ह्यातील जिल्हा शल्य चिकित्सक,जिल्हा आरोग्य अधिकारी,आरोग्य अधिकारी म.न.पा.यांनी अध्यक्ष इंडियन मेडिकल असोसिएशन यांचे समवेत सर्व खाजगी प्रॅक्टीस करणाऱ्या डॉक्टरांची बैठक आयोजित करून ज्या रुग्णांना सर्दी, ताप, खोकला अशी कोविड सदृष्य लक्षणे असतील व त्यांना असे वाटत असेल की रुग्णाला कोविड-19 रोगाची प्राथमिक लक्षणे दिसत असतील तर त्यांनी अशा रुग्णांना कोविड-19 ची टेस्ट करून घेण्यासंबंधीच्या सूचना द्याव्यात. तसेच जिल्ह्यात उपलब्ध असलेले सर्व व्हेंटीलेटर्स सुस्थितीत आहेत किंवा कसे याची खात्री करून घ्यावी. कोव्हीड -19 बाबत रुग्ण संख्या वाढीचा धोका लक्षात घेता RTPCR चाचणी करून घेणे रुग्ण संख्येच्या प्रमाणात वाढवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करावी. तसेच जिल्ह्यात सर्वत्र कोवीड-19चा फैलाव होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी सोशलडिस्टन्सीग, सॅनिटायझरचा वापर, मास्कचा वापर, अनावश्यक गर्दी टाळणे, इत्यादी नियमांचे कटाक्षाने पालन करावे.सर्व इन्सीडंट कमांडर यांनी त्यांचे अधिनस्थ असलेल्या DCH,DCHC,CCC सेंटर मधील कोविड-19च्या अनुषंगाने उपलब्ध झालेली साधन सामुग्री व व्हेंटीलेटर्स सुस्थितीत असल्याची खात्री करावी. उपरोक्त सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे,असे जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष , जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण औरंगाबाद यांनी परिपत्रकाद्वारे निर्देशित केले आहे.