देशातील पहिला डिझेल-रुपांतरित सीएनजी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध

शेतकरी इंधनावरील खर्चात एक लाख रुपयांची बचत करू शकतील- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी


नवी दिल्ली, 12 फेब्रुवारी 2021

केंद्रीय रस्तेवाहतूक आणि परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी आज देशातील पहिला डिझेल-रुपांतरित सीएनजी ट्रॅक्टर शेतकऱ्यांसाठी उपलब्ध केला. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, पुरुषोत्तम रुपाला आणि निवृत्त जनरल व्ही के सिंग उपस्थित होते. या ट्रॅक्टरमुळे शेतकरी इंधनावर होणाऱ्या खर्चात वर्षाला एक लाख रुपयांपर्यंतची बचत करू शकतील आणि त्यामुळे त्यांच्या चरितार्थामध्ये सुधारणा होईल अशी अपेक्षा गडकरी यांनी व्यक्त केली. कार्बन आणि इतर प्रदूषकांचे अंश अतिशय कमी असल्याने सीएनजी हे अतिशय स्वच्छ इंधन आहे, असे त्यांनी सांगितले. त्यामध्ये शिशाचे प्रमाण शून्य असल्यामुळे ते स्वस्त आहे आणि ते गंजरोधक, विरल न करता येण्याजोगे आणि दूषित न होणारे असल्याने इंजिनचे आयुष्य वाढते आणि त्याचा देखभाल खर्च कमी होतो, असे गडकरी यांनी सांगितले. सातत्याने चढ उतार होणाऱ्या पेट्रोलच्या दरांपेक्षा सीएनजीचे दर स्थिर असल्याने ते खूपच स्वस्त आहे. तसेच सीएनजीमुळे डिझेल आणि पेट्रोलवर चालणाऱ्या वाहनांपेक्षा कमी इंधनात सरासरी जास्त अंतर कापता येते, असे सांगत त्यांनी सीएनजीचे महत्त्व अधोरेखित केले. 

वेस्ट टू वेल्थ चळवळीचा एक भाग म्हणून शेतीमध्ये कापणीनंतर वाया जाणारा घटक असलेल्या रोपांच्या शिल्लक खुंटांचा वापर बायो- सीएनजीचे उत्पादन करण्यासाठी करता येत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. यामुळे देखील शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असे त्यांनी सांगितले.

सीएनजी ट्रॅक्टरच्या देशातील उपलब्धतेबाबत बोलताना ते म्हणाले की, सध्या या ट्रॅक्टरची निर्मिती रॉमॅट टेक्नो सोल्युशन्स आणि तोमासेटो एचील इंडियाकडून संयुक्तपणे होत असून हा प्रायोगिक पथदर्शी प्रकल्प आहे आणि कालांतराने हे ट्रॅक्टर उपलब्ध होतील.

भारत हा जगातील सर्वाधिक इंधनाचा वापर करणारा तिसऱ्या क्रमांकाचा देश आहे पण जागतिक सरासरीमध्ये दरडोई इंधनाचा वापर केवळ एक तृतीयांश आहे असे पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सांगितले. देशातील इंधनाचा खप वाढत जाणार आहे आणि अपारंपरिक उर्जा स्रोत यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावतील, असे ते म्हणाले. काही वर्षातच पीएनजी आणि सीएनजीचा पुरवठा लोकसंख्येच्या 85-90 टक्के होईल, अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छ इंधनावर आधारित उर्जा मॉडेल तयार केले जात असून प्रदूषण कमी करण्यासाठी कॉप-21च्या वचनबद्धतेसाठी त्याची मदत होईल, असे ते म्हणाले.