मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय:नाशिक येथे नवीन वैद्यकीय महाविद्यालयासह ४३० खाटांच्या रूग्णालयास मान्यता

नाशिक येथे १०० विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्न ४३ खाटांचे रूग्णालय सुरु करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

केंद्र शासनाच्या मान्यतेनंतर वैद्यकीय महाविद्यालय सुरु करण्यात येणार आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक संलग्नित या महाविद्यालयात पदवी अभ्यासक्रमासाठीच्या पायाभूत सुविधांच्या आधारावर पदव्युत्तर पदवी संस्था स्थापन करण्यास तसेच त्यामध्ये १५ विषयांमध्ये एकूण ६४ पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमाच्या नवीन जागा निर्माण करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

हे वैद्यकीय महाविद्यालय व त्यास संलग्नित रुग्णालय महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक यांच्या अधिनस्त पूर्णत: स्वायत्त संस्था असणार आहे. या महाविद्यालय व रुग्णालयासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या मानकांप्रमाणे आवश्यक जागा महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परिसरामध्ये उपलब्ध करुन देण्यास मान्यता देण्यात आली.

महाविद्यालय व संलग्नित रुग्णालयासाठी सुमारे ६२७ कोटी ६२ लाख रुपये इतका खर्च अपेक्षित आहे. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ अधिनियमाच्या तरतूदीनुसार अभ्यासक्रमांचे व इतर शुल्क निश्चित करून आकारणी करण्यास देखील मान्यता देण्यात आली.

राज्याच्या लोकसंख्येत झालेली वाढ आणि वैद्यकीय शिक्षणाबाबत तसेच आरोग्य सुविधेबाबत निर्माण झालेली जागरुकता लक्षात घेऊन नवीन वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय सुरु करणे गरजेचे आहे. राज्यातील तसेच नाशिक जिल्ह्यातील उपलब्ध अपुऱ्या वैद्यकीय सुविधांचा विचार करता नाशिक जिल्ह्यात देखील अतिविशेषोपचार वैद्यकीय सुविधा उपलब्ध करणे आवश्यक आहे. नाशिक येथे 1999 मध्ये महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे. या विद्यापीठास राज्यातील सर्व आरोग्य विज्ञान अभ्यासक्रमाचे महाविद्यालय संलग्नीत आहेत. त्याअनुषंगाने आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अंतर्गत अध्यापन व संशोधन तसेच अतिविशेषोपचार सेवा उपलब्ध करण्यासाठी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.