उत्तराखंडमध्ये हिमकडा कोसळून ऋषी गंगा लघु जलविद्युत प्रकल्प वाहून गेला

केंद्र आणि राज्य सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे आणि एनडीआरएफच्या तीन तुकड्या घटनास्थळी दाखल

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021

हिमकडा कोसळल्यामुळे उत्तराखंड मध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीचा आढावा घेण्यासठी केंद्रीय सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीची (एनसीएमसी) बैठक झाली.  हिमकडा नदीत कोसळल्यामुळे ऋषीगंगा नदीच्या पाण्याची पातळी वाढू लागली ज्यामुळे 13.2 मेगावॅटचा ऋषी गंगा लघु जलविद्युत प्रकल्प वाहून गेला. अलकनंदा नदीची उपनदी असलेल्या धौलीगंगा नदीवरील तपोवन येथील एनटीपीसीच्या जलवाहिनीलाही या पुराचा फटका बसला आहे.  

केंद्रीय सचिवांनी संबंधित संस्थांना राज्य सरकारसोबत समन्वयाने कार्य करण्याचे आणि राज्य प्रशासनाला आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे निर्देश दिले. या पुरात वाहून गेलेल्या सर्वांचा शोध घेण्याची आवश्यकता असून बोगद्यात अडकलेल्यांना सोडविण्यासाठी लवकरात लवकर बचावकार्य सुरु करण्याची गरज व्यक्त केली. बचावकार्य पूर्ण होईपर्यंत आणि परिस्थिती सामान्य होईपर्यंत देखरेख ठेवण्याचे त्यांनी निर्देश दिले.

उत्तराखंडच्या मुख्य सचिवांनी समितीला व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून तेथील सद्य परिस्थितीची आणि सुरु असलेल्या कारवाईची माहिती दिली.

केंद्रीय जल आयोगाने (सीडब्ल्यूसी) दिलेल्या माहितीनुसार, सध्या पुराचा कोणताही धोका नाही आणि पाण्याच्या पातळीत वाढ होणे थांबले आहे. शेजारच्या खेड्यांनाही धोका नाही.

आयटीबीपीने बोगद्यात अडकलेल्या सुमारे 12 जणांची सुटका केली असून बेपत्ता झालेल्या व्यक्तींचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

एनडीआरएफच्या 2 तुकड्या घटनास्थळी पोहोचत असून हिंदनहून अतिरिक्त 3 तुकड्या रवाना झाल्या असून त्या रात्री घटनास्थळी पोहोचतील. भारतीय हवाई दला(आयएएफ) च्या विमानात / हेलिकॉप्टरमध्ये नौदलाचे डायव्हर्स  सज्ज आहेत.

पुढील दोन दिवस या भागात पावसाची शक्यता नसल्याचे आयएमडीने बैठकीत सांगितले.

पंतप्रधानांचा उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद, उत्तराखंडमधील दुर्दैवी परिस्थितीचा घेतला आढावा
SDRF personnel during rescue operation at the dam in Tapovan in Uttarakhand's Chamoli district

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री त्रिवेंद्रनाथ सिंह रावत यांच्याशी संवाद साधला आणि उत्तराखंडमधील परिस्थितीचा आढावा घेतला.

पंतप्रधान कार्यालाने ट्विटद्वारे म्हटले आहे की, “आसाममध्ये असताना पंतप्रधानांनी उत्तराखंड येथील परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी मुख्यमंत्र्यांशी  आणि अन्य उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यांनी सुरू असलेल्या बचाव आणि मदतकार्याचा आढावा घेतला. बाधितांपर्यंत शक्य तेवढी मदत पोहोचविण्यासाठी अधिकारी प्रयत्न करीत आहेत.”

अन्य एका ट्विटमध्ये पंतप्रधान म्हणाले, “उत्तराखंडमधील दुर्दैवी परिस्थितीवर मी सतत लक्ष ठेवून आहे. भारत उत्तराखंडबरोबर आहे आणि हे राष्ट्र तेथील प्रत्येकाच्या सुरक्षिततेसाठी प्रार्थना करीत आहे. माझा वरिष्ठ अधिकाऱ्यांशी सातत्याने संवाद सुरू आहे. आणि एनडीआरएफच्या तैनाती तुकड्या, बचावकार्य आणि मदतकार्याविषयी अद्ययावत माहिती घेत आहे.”

नरेंद्र मोदी सरकार राज्यातील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह
Header media

नवी दिल्ली, 7 फेब्रुवारी 2021


उत्तराखंड येथील जोशीमठ येथे आलेल्या नैसर्गिक आपत्तीच्या या काळात राज्याबरोबर नरेंद्र मोदी सरकार खांद्याला खांदा लावून उभे आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटले आहे. महाराष्ट्रात पत्रकारांशी बोलताना अमित शाह म्हणाले की, केंद्र आणि राज्य सरकारकडून बचाव आणि मदतकार्य सुरू आहे आणि राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाच्या (एनडीआरएफ) तीन तुकड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. ते म्हणाले की, अन्य तुकड्या देखील उत्तराखंडमध्ये जाण्यासाठी तयार आहेत. लवकरच बाकीच्या तुकड्या देखील तेथे दाखल होतील. आयटीबीपीचे जवान देखील घटनास्थळी पोहोचले आहेत, बरोबरच राज्यातील यंत्रणा देखील कार्यान्वित झाल्या आहेत, असे अमित शाह म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, जोशीमठाच्या जवळ हिमकडा आणि डोंगरकडा नदीमध्ये कोसळल्यामुळे पाण्याचा प्रवाह खूप वाढला आहे तसेच प्रथम ऋषी गंगा आणि त्यानंतर अलकनंदामध्ये पाण्याची पातळी वाढण्यास सुरूवात झाली आहे. शाह पुढे म्हणाले की, काही लोक वाहून गेल्याची प्राथमिक माहिती देखील हाती आली आहे. संकटाच्या या काळात सरकार उत्तराखंडच्या पाठिशी आहे आणि शक्य ती सर्व प्रकारची मदत तातडीने उपलब्ध करून लवकरात लवकर या संकटावर मात करून जनजीवन पूर्वीसारखे सुरळीत होण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असे केंद्रीय गृहमंत्री म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणे झाले आहे आणि हवाई दलालाही देखील सज्जतेची सूचना करण्यात आली आहे. अमित शाह म्हणाले की, पंतप्रधानांनी देखील दूरध्वनीवर एनडीआरएफच्या तुकडीला मार्गदर्शन केले आहे. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय हे गृह मंत्रालयाच्या एनडीआरएफच्या नियंत्रण कक्षात स्वतः उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. अमित शाह असेही म्हणाले की, ते उत्तराखंडच्या सर्व नागरिकांना हे आश्वास्त करु इच्छितात की, सर्व परिस्थिती लक्षात घेता, लवकरात लवकर दुर्घटनेची स्थिती नियंत्रणात आणली जाईल आणि या आपत्तीपासून बचावासाठी केंद्र सरकारच्या वतीने प्राथमिक स्वरूपावर आवश्यक असलेली सर्व मदत केली जाईल.