शिवस्मारक व भीम पार्कसाठी ५० कोटींची राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांची मागणी

मतदारसंघाच्या विकासासाठी सुमारे १२० कोटींच्या निधीची मागणी

मुंबई, दि.५ : सिल्लोड – सोयगाव मतदार संघाच्या  विविध विकास कामांसाठी राज्याचे महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार मतदार यांनी निधीची मागणी केली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सुमारे १२० कोटींच्या निधीची मागणी केली आहे. तसेच यंदाच्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्याची विनंतीही यावेळी त्यांनी केली आहे.

सिल्लोड सोयगाव मतदार संघात असलेल्या जगप्रसिद्ध अजिंठा लेण्या बघण्यासाठी देश विदेशातून लाखो देशी-विदेशी पर्यटक दरवर्षी येत असतात. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांचा इतिहास कळावा. यासाठी फर्दापूर येथे शिवस्मारक आणि भीम पार्क उभारण्याचा मानस राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी व्यक्त केला आहे. त्यासाठी प्रत्येकी दहा एकर जागेची मागणी तसेच शिवस्मारकासाठी २५ कोटी आणि भीम पार्कसाठी २५ कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली आहे. यासंदर्भात ग्रामविकास मंत्री आणि सामाजिक न्यायमंत्री यांच्याकडे यापूर्वी निधीचा प्रस्ताव पाठवला आहे. या निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्याची विनंती अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केली आहे.

सरकारी कार्यालय व कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी निधीची मागणी

सिल्लोड सोयगाव येथील गृह विभागांतर्गत येणाऱ्या उप विभागिय पोलीस अधिकारी कार्यालय, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानासाठी सुमारे ३० कोटी रुपयांची मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच अजिंठा येथील ग्रामीण रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांना निवासस्थान आणि ग्रामीण रुग्णालयासाठी संरक्षण भिंत बांधण्यासाठी निधीची मागणी त्यांनी केली आहे.

अद्ययावत ट्रामा सेंटरसाठी केली मागणी

औरंगाबाद जळगाव महामार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अपघातातील जखमींना वेळीच उपचार मिळण्यासाठी सिल्लोड येथे अद्ययावत ट्रामा केअर सेंटर आणि दोनशे खाटांचे उपजिल्हा रुग्णालय उभारण्यासाठी निधीची मागणी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे. तसेच २०२१ च्या अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्याची विनंती केली आहे.

पाझर तलावाच्या दुरुस्तीसाठी निधीची मागणी

सिल्लोड सोयगाव मतदारसंघातील ५० पाझर तलावांचे यंदा झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पाझर तलावांच्या दुरुस्तीसाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे सुमारे सात कोटींच्या निधीची मागणी केली आहे. आणि या निधीची तरतूद यंदाच्या अर्थसंकल्पात करण्याची विनंतीही त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी १८ कोटींची मागणी

सिल्लोड नगरपरिषदेचा दर वर्षी ८० लाख रुपये विजेच्या देयकांवर खर्च होतो.  त्याची बचत करण्यासाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निश्चय अब्दुल सत्तार यांनी केला आहे. त्यासाठी सुमारे १८ कोटींची मागणी राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे त्यांनी केली. त्यात जलशुद्धीकरण, केंद्र शहरातील पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन आणि नगरपरिषदेची इमारत यासाठी या सौरऊर्जेचा वापर करण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील मोठ्या प्रमाणावर विजेचा प्रश्न यामुळे निकाली निघणार आहे.

रस्त्यांसाठी मागितला भरीव निधी

यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे सिल्लोड – सोयगाव मतदार संघातील रस्त्यांची स्थिती खराब झाली आहे. त्यामुळे या रस्त्यांवर अपघातांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या रस्त्याच्या खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी  निधीची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली. त्यांनीही यासाठी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे.