जालना नगरपालिकेचे सीईओसह चारअधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये ?औरंगाबाद खंडपीठाची विचारणा 

औरंगाबाद,३ फेब्रुवारी :जालना शहरातील मध्यवस्तीत असलेला बेकायदेशिर कत्तलखाना कायदेशीर असल्याचे भासवत त्यावर निधी खर्च केल्याने जालना नगरपालिकेचे  सीईओसह चारअधिकाऱ्यांवर कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्या. रवींद्र घुगे आणि न्या. बी. यु. देबडवार यांनी बुधवारी (३ फेब्रुवारी) केली. संबंधित कत्तलखाना पुन्हासुरू होता कामा नये असे आदेश बजावत पोलिस अधीक्षक जालना व संबंधित पोलिस ठाण्याचे प्रमुख यांनाही कत्तलखाना बंद राहिला पाहिजे असे बजावण्यात आलेआहे.

जालना येथील कत्तलखाना इतरत्र हलविण्यात यावा . शहराच्या मुख्य जागेवर असून संबंधित कत्तलखान्यास परवानगी नसल्याचे जनहित याचिकेद्वारे खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले होते. आरोग्याच्या दृष्टीने संबंधित कत्तलकाना हाणीकारक असून प्रदूषण नियंत्रण मंडळानेही यास परवानगी दिलेली नाही असेही खंडपीठाच्या निदर्शनास आणून देण्यात आले आहे.नगरपालिकेने २०१५मध्ये  निविदा काढून कत्तलखान्यावर निधी खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे.खंडपीठाने जालना नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल,पालिकेचे सीईओ  नितीन जनार्दन नार्वेकर, इतर अधिकारी राहूल विष्णू मापारी, अशोक शामराव देशमुख, देवानंद त्रिबकराव पाटील, रत्नाकर शंकरराव अडशिरे आदींनाउपस्थित राहण्याचे आदेश दिले होते. नगराध्यक्षा गोरंट्याल ह्या पतीच्या उपचारासाठी मुंबई येथे गेल्याचे सांगण्यात आले तर इतर तिघे कार्यालयीन कामानिमित्त हजर राहू शकले नाही. सुनावणीस  सीईओ नार्वेकर व मापारी यांची उपस्थिती होती. पोलिस अधीक्षकांनी माहिती घेतली असून संबंधितांना १४९खाली नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले. कत्तलखान्याच्या परिसरातदोन पोलिसांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती पोलिस अधीक्षकांच्या वतीने बुधवारी झालेल्या सुनावणीप्रसंगी देण्यात आली. खोटे शपथपत्र दाखल करून न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांवर न्यायालयाचा अवमान केला म्हणून कारवाई का करण्यात येऊ नये अशी विचारणा खंडपीठाने केली. सर्व अधिकारी यांना सोमवारी (६ फेब्रुवारी) रोजी खंडपीठासमोर उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.याचिकाकर्त्यातर्फे मिलींद पाटील बीडकर, शासनातर्फे सहाय्यक सरकारी वकील संजय घायाळ, प्रदूषम नियंत्रण मंडळातर्फे  पी. पी. मोरे यांनी काम पाहिले.