3,05,984 कोटी रुपयांची सुधारित पुनर्रचित परिणामकारक वीज वितरण क्षेत्र योजना सुरू केली जाईल

हरित ऊर्जा स्रोतांमधून हायड्रोजन निर्माण करण्यासाठी 2021-22 मध्ये हायड्रोजन ऊर्जा मिशन सुरु करणार

नवी दिल्‍ली, 1 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थ आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री  निर्मला सीतारमण यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात आगामी 5 वर्षांसाठी 3,05,984 कोटी रुपयांची सुधारित पुनर्रचित,  परिणामकारक  वीज वितरण क्षेत्र योजना सुरू करण्याचा प्रस्ताव सादर केला. आर्थिक सुधारणांशी निगडीत प्री-पेड स्मार्ट मीटरिंग आणि फीडर वेगळे करणे, प्रणालीचे अद्ययावतीकरण इत्यादी सुविधांद्वारे पायाभूत सुविधांच्या निर्मितीसाठी ही योजना डिस्कॉमला सहाय्य करेल. सीतारमण यांनी यावेळी देशभरातील वितरण कंपन्यांच्या मक्तेदारीकडेही लक्ष वेधले आणि ग्राहकांना एकापेक्षा अधिक वितरण कंपन्यांमधील पर्याय निवडण्याची संधी देण्यासाठी  एक स्पर्धात्मक रचना तयार करण्याचा प्रस्ताव दिला.


हरित आणि शाश्वत भविष्यासाठी अर्थमंत्र्यांनी, नोव्हेंबर 2020 मध्ये पंतप्रधानांनी केलेल्या घोषणेची पूर्तता करणाऱ्या हरित उर्जा स्त्रोतांमधून हायड्रोजन निर्मितीसाठी 2021-22 मध्ये सर्वसमावेशक राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियान सुरू करण्याचा प्रस्तावही मांडला.