पोलिसांची प्रतिमा उंचावण्यासाठी सातत्याने प्रयत्न करा – गृहमंत्री देशमुख

  • एसएसएमएस क्यू आर स्कॅन प्रणालीचा गृहमंत्र्यांच्याहस्ते शुभारंभ
  • पोलिस आयुक्तालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा सन्मान
  • कमांड कंट्रोल सेंटर व ज्येष्ठ नागरिक मदत कक्षाला गृहमंत्र्यांची भेट

औरंगाबाद, दिनांक 29: औरंगाबाद शहर आयुक्तालयाच्यावतीने शहरातील जवळपास एक हजार ठिकाणी क्यूआर कोड स्पॉट फेंसिंग करून लावण्यात येत आहेत. या नवतंत्रज्ञानाचा वापर करून प्रतिमा उंचावण्याचा प्रयत्न करावा व रात्रगस्तीत याचा वापर चोखपणे करावा, अशा सूचना गृहमंत्री अनिल देशमुख यांनी यावेळी केल्या.

Displaying DSC_6371.JPG

पोलिस आयुक्तालयाच्या कमांड कंट्रोल सेंटर, ज्येष्ठ नागरिक मदत कक्षास भेट आणि एसएसएमएस क्यू आर स्कॅन प्रणालीचा शुभारंभ गृहमंत्री श्री.देशमुख यांच्याहस्ते झाला. यावेळी श्री. देशमुख बोलत होते. यावेळी आमदार अमोल मिटकरी, आमदार विक्रम काळे, माजी आमदार कैलास पाटील चिकटगावकर, पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता आदींची उपस्थिती होती.

मंत्री देशमुख म्हणाले, पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून राबविण्यात येत असलेले कमांड कंट्रोल सेंटर, ज्येष्ठ नागरिक मदत कक्ष आदी उपक्रम अभिनंदनास पात्र आहेत. या माध्यमातून पोलिसांची प्रतिमा अधिक उंचावण्यास मदत होते. नवतंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करून गुन्हेगारीवर आळा बसवण्यासाठी पोलिस प्रशासनाने सातत्याने प्रयत्न करावेत. सामाजिक माध्यमांचा वाढता वापर पाहता या माध्यमातून होणारे गैरव्यवहार यावरही सायबर पोलिस प्रशासनाने अधिक सजग राहून कारवाई करावी, अशा सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. त्याचबरोबर मुंबईच्या धर्तीवर सेल्फ बॅलंन्सिंग स्कूटर प्रकल्प औरंगाबादेतही लवकरच राबविण्यात यावा, त्यादृष्टीने कार्यवाही करावी. गृह विभागामार्फत पोलिसांना घरे उभारण्याबाबतही विविध प्रस्ताव व पर्यांयावर विचार सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

Displaying DSC_6405.JPG

गृहमंत्री देशमुख यांच्याहस्ते कोरोना कालावधीत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. याच कार्यक्रमात श्री. देशमुख यांच्याहस्ते एसएसएमएस क्यू आर स्कॅन प्रणालीचा क्यू आर कोड स्कॅन करून शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलिस आयुक्त डॉ. गुप्ता यांनी केले. यामध्ये त्यांनी आयुक्तालयाचे कामकाज, कमांड कंट्रोल रूममधून 750 सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरामध्ये कायदा व सुवस्था अबाधित राखण्यासाठी करण्यात येत असलेले प्रयत्न, ज्येष्ठ नागरिकांसाठी मदत कक्ष आदींबाबत सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन सुरेश वानखेडे यांनी केले, आभार निकेश खाटमोडे पाटील यांनी मानले.

कमांड कंट्रोल सेंटर,ज्येष्ठ नागरिक मदत कक्षाला भेट

सुरूवातीला औरंगाबाद स्माट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन आणि पोलिस आयुक्तालयाच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या कमांड कंट्रोल सेंटरची पाहणी मंत्री श्री. देशमुख यांनी केली. त्यानंतर ज्येय्ठ नागरिक कक्षाला भेट देऊन काही ज्येष्ठ नागरिकांच्या समस्याही स्वत: गृहमंत्री देशमुख यांनी कक्षाच्या दूरध्वनीच्या साहाय्याने संवाद साधत जाणून घेतल्या व पोलिस प्रशासनास योग्य त्या सूचनाही केल्या.