“न दिसणाऱ्या शत्रू संगे युद्ध आमुचे सुरु” – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

सायबर पोलीस ठाणे तसेच पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाचे उद्घाटन
मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा सार्थ अभिमान – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे गौरवोद्गार

मुंबई, दि.२६ : कोरोनाप्रमाणे गुन्हेगारी हा देखील एक प्रकारचा व्हायरस असून त्याला धडा शिकवणारी लस माझ्या मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांच्या रुपाने उपलब्ध आहे, आम्हा सर्वांना त्याचा सार्थ अभिमान आहे. सायबर क्राईम म्हणजे ई दरोडा, खिडक्या तुटल्या नाही, दरवाजे तोडले नाही पण तिजोरी लुटली आहे.  याला सायबर क्राईम म्हणतात. तो डोळ्यांना दिसत नाही. अशा या न दिसणाऱ्या शत्रू संगे आपले युद्ध अधिक सक्षमतेने आता सुरु झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

Image

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दक्षिण विभाग सायबर पोलीस ठाण्याचे प्रत्यक्षात उद्घाटन केले तर पूर्व, पश्चिम, उत्तर दक्षिण आणि मध्य विभाग सायबर पोलीस ठाण्याचे ऑनलाईन पद्धतीने उद्घाटन केले. याच कार्यक्रमात ९४ पोलीस ठाण्यातील स्वागत कक्षाचे ऑनलाईन उद्घाटनही करण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना मुख्यमंत्र्यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देऊन म्हटले की, या मुहूर्तावर राज्यघटनेचे, देशाच्या नागरिकांचे, कायदा सुव्यवस्थेचे रक्षण करणाऱ्या सर्वांना माझा सलाम आहे. मुख्यमंत्री लोकप्रिय होत असेल तर त्याचे मानकरी पोलीस सुद्धा आहेत, कारण कारभार कोण चालवतो यापेक्षा तो कसा चालतो याला जनता महत्त्व देते.

सायबर सेलसोबतची मूळ पोलीस ठाण्याची इमारत १०३ वर्षाची असली तरी ती मजबूत असल्याचे व तिच्यात आधुनिकतेकडे पाऊल टाकणारे सायबर पोलीस ठाणे आज सुरु केल्याने आधुनिकता आणि परंपरेचा मिलाफ झाल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, डोळ्यात तेल घालून काम करणे म्हणजे काय असते याची प्रचिती पोलिसांकडे पाहिल्यानंतर येते. पोलीस घड्याळ हातात घालून काम करतो पण त्याला काळ वेळेचे भान न ठेवता काम करावे लागते. गुन्ह्यांचे स्वरूप बदलते आहे. मोबाईल फोनचा दुरुपयोग वाढतो आहे, आपल्याच साधनांचा उपयोग करून गुन्हे करणारी टोळी कार्यरत होत आहे. जगाच्या पाठीवरचा कुणीही कुठेही बसून आपल्या घरातील माहिती, पैसे आणि इतर गोष्टींची चोरी या माध्यमातून करू शकतो, असे असले तरी या गुन्हेगारी विश्वात धाक बसवणारे मुंबई हे देशातील पहिले शहर असेल, याबद्दल मुंबई आणि महाराष्ट्र पोलिसांचा मला अभिमान आहे.

Image

कुणी कितीही बदनामी केली तरी बेचैन होऊ नका, त्यांचा बुरखा तुम्ही फाडला आहे असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, तुमचा अभिमान राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मलाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला आहे. सरकार म्हणून ताकतीने तुमच्या मागे उभे आहे. पोलिसांच्या घराचा प्रश्न आपण संपूर्णत: मार्गी लावणार आहोत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी जे जे करता येईल ते ते करण्यासाठी हे शासन कटिबद्ध आहे, यासाठीचे आवश्यक असणारे प्रस्ताव समोर आणा आपण त्याला मंजुरी देऊ, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

पोलीस स्वागत कक्षाच्या माध्यमातून  वेगळा अनुभव नागरिकांना अनुभवता येईल असे सांगून मुख्यमंत्री म्हणाले की, गुन्हेगार आणि गुन्हेगारीवर जरब बसवायची असेल तर नागरिकांना पोलिसांची भीती वाटू नये. दरारा आणि दहशत यामध्ये फरक आहे. गुंडाची असते ती दहशत आणि पोलिसांचा असतो तो दरारा. उंदराच्या बिळात लपलेल्यांना शोधून काढून फासावर लटकवण्याचे काम मुंबई पोलिसांनी केले आहे. हे काम जनतेचे आर्शीवाद घेण्याचे काम आहे. या आशीर्वादाच्या बळावर आपण असेच उत्तम काम करत रहा, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी आवाहन केले.

कार्यक्रमात दूरदृश्य प्रणालीद्वारे गृहमंत्री अनिल देशमुख, गृहराज्यमंत्री सतेज पाटील सहभागी झाले होते. याशिवाय मुंबई शहर पालकमंत्री अस्लम शेख, उपगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, खासदार अरविंद सावंत, आमदार मंगलप्रभात लोढा, पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांच्यासह पोलीस दलातील अनेक अधिकारी आणि कर्मचारीही कार्यक्रमास उपस्थित होते.

सायबर क्राईम सेक्युरिटी प्रकल्प लवकरच – गृहमंत्री अनिल देशमुख

माहिती तंत्रज्ञानाने जग व्यापल असताना ऑनलाईन माहितीची देवाण घेवाण, आर्थिक व्यवहार होतात. अनेक जिल्ह्यात आर्थिक व्यवहारांमध्ये फसवणूक होताना दिसते. दिवसेंदिवस सायबर गुन्ह्यात वाढ होत आहे. त्यांचे प्रमाण इतर गुन्ह्यांएवढे वाढत आहे. पाच ट्रिलियन डॉलरने सायबर गुन्हे जगभरात वाढत आहेत. महाराष्ट्रातही हे प्रमाण आणि प्रकार वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आल्याचा आनंद आहे. ९०० कोटींचा सायबर क्राईम सेक्युरिटी प्रकल्प हाती घेतला आहे. हा प्रकल्प लवकरात लवकर सुरु करू. यामाध्यमातून सायबर क्राईम थांबवण्याचा प्रयत्न होणार आहे.

समाज माध्यमाचा वापर करून पोलिसांना, राजकीय व्यक्ती किंवा महिलांना बदनाम करण्याचे काम, अफवा पसरवण्याचे, समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे काम केले जात असल्याचे दिसते. अशा घटना थांबवण्यासाठीही या ठाण्यांचा उपयोग होईल. फेक प्रोफाईल तयार करण्याचे प्रमाण ही खूप वाढले आहे त्याकडे लक्ष देता येईल. मुंबईत कायदा व सुव्यवस्था चांगली राहावी, गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे हा महत्त्वाचा विषय घेऊन महाराष्ट्र मुंबई पोलीस दल काम करत आहे. पोलिसांसाठी घरे हा महत्त्वाचा विषय आहे, एक लाख घरे पोलिसांसाठी बांधता येतील. हा अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे ते म्हणाले. जो कुणी नियमाच्या बाहेर जाऊन काम करील त्यांना धडा शिकवण्याचे काम मुंबई पोलीस करतच राहील असेही गृहमंत्री यावेळी म्हणाले. अँटी नार्कोटिक सेल अधिक सक्षम करण्याची गरज आहे, त्याचा प्रस्ताव तयार करून सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये स्वागत कक्ष निर्माण करून मार्गदर्शन करणार असल्याबद्दल मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी पोलिसांचे अभिनंदन केले. पोलीस स्टेशनला फक्त गुन्हा घडल्यावरच लोक येत नाही. त्यांच्या काही अडचणी प्रश्न असतात, त्यांना बसून सांगता येईल अशी जागा नव्हती. स्वागत कक्षामुळे हा प्रश्न सुटल्याचे ते म्हणाले जगभरात मुंबई पोलिसांचे नाव उंचावत ठेवण्यासाठी चे प्रयत्न कौतुकास्पद असल्याचेही त्यांनी सांगितले. शासन आपल्या सर्वांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

सायबर युद्धात आधुनिक तंत्रज्ञानासाठी पोलिसांच्या पाठीशी- आदित्य ठाकरे

संविधानानुसार देश कसा चालतो हे सांगणारे कोण तर ती खाकी. मला त्यांचा अभिमान वाटतो. अशा शब्दात मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी कौतुक केले. सायबर गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर सायबर पोलीस ठाण्याची भूमिका महत्त्वाची असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. स्वागत कक्षाच्या माध्यमातून मायेची आणि आपलेपणाची उब जाणवेल, असे सांगून त्यांनी या उपक्रमाला शुभेच्छा दिल्या.

लोकांनी सायबर गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे यावे – गृहराज्यमंत्री सतेज पाटील

मुंबई पोलीस तत्पर तपासासाठी जगभर प्रसिद्ध आहे. नवनवीन गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्यात आले असल्याचे सांगून लोकांनी सायबर गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे यावे, तुमचे गुन्हे सोडवण्यासाठी, तुमच्या अडचणी सोडवण्यासाठी पोलीस तुम्हाला तत्परतेने मदत करतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

तक्रारी नोंदवण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील – मुंबई पोलीस आयुक्त

मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंह प्रास्ताविक करताना म्हणाले, डिजिटल इकॉनॉमी विकसित होत असताना सायबर गुन्ह्यांचे प्रमाण वाढत आहे. त्याची व्याप्ती ही वाढत आहे. हे गुन्हे कुठेही बसून करता येतात. गेल्यावर्षी २५०० एफआरआर आणि १० हजार सायबर तक्रारी दाखल झाल्या. एकच सायबर पोलीस ठाणे बीकेसीत होते. या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानासह प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज होती. त्यामुळेच ही पाच सायबर पोलीस स्टेशन सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे ते म्हणाले. आज या शिवाय ९४ पोलीस स्टेशनला स्वागत कक्षाचे ही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्धाटन होत आहे. सर्वसामान्य माणसं जेंव्हा पोलीस स्टेशनला येतात तेंव्हा त्यांना त्यांचे प्रश्न व्यवस्थित मांडता यावेत यासाठी स्वागत कक्ष तयार करण्यात आला आहे यात प्रामुख्याने प्रशिक्षित महिला कर्मचाऱ्यांचा समावेश आहे हा कक्ष त्यांना त्यांच्या तक्रारी नोंदवण्यासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करील, असे त्यांनी सांगितले.